डफळापूर संस्थान
दिल्लीचा बादशहा औरंगजेबने साम्राज्य विस्तारापोटी इ.स. १६८१ ला दक्षिणेत येऊन १६८६ साली विजापूरची आदीलशाही जिंकून घेतली त्यावेळी विजापूरच्या दरबरातील बरेचसे सरदार औरंगजेबच्या (मोगल) आश्रयास गेले पण सटवाजीराव हे औरंगजेबाच्या प्रलोभनाला बळी न पडता स्वतंत्र वृत्तीने वृत्तीने रहाण्याचा निर्णय घेतला. जवळपास ५ वर्षे त्यांनी स्वतंत्र राज्यसत्ता उपभोगली. जत सारख्या पठारी प्रदेशावर मोगलांना तोंड देणे फार कठीण होते.सटवाजीरावांनी आपल्या फौजेमध्ये बंदूकधारी सैनिकांची भरती केली होती त्या काळात बंदूक चालवणे म्हणजे आधुनिकतेचे प्रतीक होते. या सैनिकांना काला प्यादा बर्कंदाज असे संबोधले जात होते. सर जदुनाथ सरकार यांच्या मते सैन्याची संख्या जवळपास १०,००० पर्यंत होती तर व्ही. एस. श्रीवास्तव्य यांच्या मते ही संख्या १६००० पर्यंत होती असे दोन्ही इतिहासकारांनी मान्य केले आहे. या बर्कंदाज फौजेचे सटवाजीराव चव्हाण नेतृत्व करत होते. मोगलांना सटवाजीरावांच्या सैन्यापासून फार नुकसान होऊ लागले परिणामी औरंगजेब यांनी सटवाजीरावास जिवंत अथवा मृत पकडण्यास आदेश दिले. डफळापूर मध्ये सटवाजी यांचे लहान बंधू धोंडजीराव चव्हाण यांस मोघलांनी पकडून नेले. पुढे डफळापूरची ठाणेदारी अमानुल्लाखान याला देण्यात आली. सटवाजीरावांनी मोगली ठाण्यावर मोठे हल्ले करून ठाणेदारांवर चांगली भीती निर्माण केली होती.
औरंगजेबाच्या लष्करी डाव पेचातील महत्वाचे घटक म्हणजे ठाणे व ठाणेदार.
एखादा प्रदेश ताब्यात आला की त्याच्या बंदोबस्तासाठी मोगल तिथे ठाणी (मिलिटरी पोस्ट) कायम करीत.ठाण्यात पडकी गढी असलयास दुरुस्त करीत,नसलयास बांधून काढत. ठाणेदाराच्या दिमतीला पाच पन्नास स्वारांपासून पाचशे पर्यंतही स्वार असू शकत.ठाण्यावर मराठ्यांचे हल्ले झाले तर वेळेवर मदत पोहोचविण्यासाठी बादशाही छावणीतून पथके जात अगर पाच पंचवीस मैलाच्या आत मोगल सरदारांचे तळ असत तेथून मदत पोहोचे. किंवा मोगलांचे फिरते सेनापती (जुल्फिकारखानासारखे) ठाणेदारांच्या दारांच्या मदतीला धावून जात.जेथे मोगल मराठा संघर्षाची शक्यता कमी तिथे ठाणी अगदी कमी असत. उदारणार्थ हैद्राबाद सुभ्यात चार पाचच्यावर ठाणी नव्हती.त्याउलट कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे या भागात दर पाच दहा मैलावर तरी एखादे ठाणे असेच.
सांगली जिल्हा ठाणे व ठाणेदार :
१)आटपाडी:नागोजी माने
२)संख (जत):अली
३)डफळापूर (जत):अमानुल्लाखान
४)मलाबाद (अथणी) :मुहंमद हुसेन
५)खानापूर:आवजी आढळराव
६)उमदी(जत) :हिदायतुल्ला
*सटवाजीराव चव्हाण यांच्या महत्वपूर्ण लढाया* -
जून १६९०- साताऱ्याजवळील खटाव व पिलीव भागात सटवाजीराव चव्हाण यांचे लुत्फुलखानावर आक्रमण. १६०० सैन्याचे नेतृत्व सटवाजीराव यांनी केले.जवळपास दिवसभर हि लढाई चालू होती.सायंकाळी सरसेनापती संताजी घोरपडे यांनी स्वतः या युद्धात भाग घेतला होता.परिनामी लुत्फुलखानास आपला मोर्चा पुढे सरकता आला नाही.
जून १६९२ - कृष्णा नदी ओलांडत असताना रहिमतपूरजवळ लुत्फुलखानाशी सटवाजीराव चव्हाण यांची मोठी लढाई.
१६९५ दोड्डेरीची लढाई-या लढाईमध्ये १०-१२ कसलेले व शूर सरदार-सेनापती आणि ३५ हजार सैन्य होते तर या उलट सरसेनापती संताजी घोरपडे यांच्याकडे सगळी मिळून १२ हजार फौज होती,यात सुद्धा २ हजार सटवाजी चव्हाण यांचे कर्नाटकी बर्कान्दाज होते.
१ ऑगस्ट १६९९ बादशहांनी तरबियतखानाला मध्यरात्री बोलविले फातिया पढून त्याला सटवाजी चव्हाण डफळे याच्या परिपत्यासाठी रवाना केले.
२ ऑगस्ट १६९९ गढीसंख (संख,जिल्हा सांगली ) येथील ठाणेदार अली याने कळवले की : सटवाजी चव्हाण-डफळे हा गढीला वेढा घालण्यासाठी येत आहे. चारशे बंदूकची आणि कोणीतरी अधिकारी पाठवून येऊन माझे सहाय्य करावे. विनंती मान्य करण्यात आली आणि खानजहानची माणसे व शेख गुलाम महंमद,मुशरफ कौलार हैदराबादी यांना हिकडे (संखकडे) पाठवण्याची आज्ञा झाली.
२४ मार्च १७०१ मोगलांच्या काफिल्यावर डफळापूर (जत तालुका सांगली जिल्हा ) जवळ सटवाजी चव्हाण यांचा हल्ला.
हरकाऱ्यांच्या तोंडून कळले ते असे. ‘ब्रह्मपुरीच्या तळावरून प्रवाशांचा काफीला बादशाही छावणीकडे येत होता. त्यांच्याबरोबर बलुची सैनिक होते. काफिला डफळापूरच्या अलीकडे आला, सटवाजी चव्हाण हा सैन्य घेऊन त्यांच्यावर चालून आला. बलुच्यांपैकी अनेक माणसे ठार अगर जखमी झाली. याच सुमारास मुगलखानचे मुगल सैनिक मुर्तजाबाद मिरजेहून त्या स्थळी पोहचले.शत्रू पळून गेले.बलुची सैनिक व काफिला हे मुर्तजाबाद मिरजेला पोहचले आहेत.
@ डफळापूर संस्थान
Comments
Post a Comment