पैठणचे तीर्थखांब
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
पैठणचे तीर्थखांब
शककर्ता शालिवाहन सम्राटांनी दक्षिण भारतावर विजय मिळवल्यानंतर त्या विजयाचे प्रतीक म्हणून तत्कालीन राजधानीचे शहर पैठणनगरीत भव्यदिव्य तीर्थखांब उभा केला होता. आजही ‘शालिवाहन’ इतिहासाची साक्ष देत हा तीर्थखांब (विजयस्तंभ) दिमाखात उभा आहे.
प्राचीन पैठणनगरीच्या गतसंपन्नतेचा साक्षीदार असलेला हा तीर्थस्तंभ पाहण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून येत असतात. सातवाहन घराण्याच्या मराठी साम्राज्याचा हा दीपस्तंभ संपूर्णपणे दगडात बनविण्यात आला आहे. यादवकालीन शिल्पकलेचा अजोड नमुना असलेले हे शिल्प ४ स्वतंत्र कप्प्यांद्वारे उभारण्यात आलेले आहे. स्वर्ग, नरक व पाताळ, अशी रचना ३ टप्प्यांत कोरलेली आहे. दक्षिण काशीचा मान व एकेकाळी धर्मपीठाचा अधिकार गाजवणाऱ्या पैठण येथील गोदावरी नदीत दशक्रिया विधी करण्याची परंपरा आहे. प्रतिष्ठाननगरी ही मोक्षधाम म्हणूनही ओळखली जाते. अशा पवित्र तीर्थक्षेत्री स्वर्गाचे प्रतीक म्हणून हा स्तंभ उभारण्यात आला असावा, अशीही आख्यायिका आहे.
शहराच्या सर्वात उंच असलेल्या भूभागावर स्तंभ उभारला असून, त्याची उंची ५० फूट आहे. दगडी खांब व टोकदार कमानी तत्कालीन शिल्पकलेची उंची व दर्जा यावर शिक्कामोर्तब करतात. तळावरच्या मातृकामंडळाचे कोरीवकाम करताना शिल्पकाराने संपूर्ण कसब पणाला लावले आहे. भैरवनाथ व त्याच्या गळ्यातील मुंडमाळ, त्यातून स्रवणारे रक्त अन् ते चाटणारा कुत्रा यांचे बारकावे व गूढ संकेत अभ्यासकांना मोलाचे ठरत आले आहेत. स्तंभाच्या मध्यभागी मृत्युलोक आहे. तेथे कोरलेली मैथुनशिल्पे दिसून येतात. मकरमुखाचे अष्टकोनी वर्तुळ व मूर्तीवर कमालीच्या कलाकुसरी आता अंधुक झाल्या आहेत. स्तंभाच्या वरचा भागही शिल्पकलेच्या उच्च दर्जेदारीवर शिक्कामोर्तब करणारा आहे.
श्रीदेवी, भूदेवी, गणेश व सप्तमातृका यांच्या दुर्मिळ शैलीतील या नितांत सुंदर मूर्ती येथे बघावयास मिळतात. मात्र, काळाच्या ओघात व दुर्लक्षामुळे तीर्थस्तंभाची झीज होत आहे. विशेष, म्हणजे हा इतिहासाचा साक्षीदार असलेला तीर्थस्तंभ राज्य संरक्षित स्मारक असल्याचे घोषित केले ( सभारः विशाल खरगे )
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Comments
Post a Comment