आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१२ मार्च

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ मार्च १६३५*
मयुर सिंहासन - 
शहाजहाननें हें प्रसिद्ध सिंहासन तयार करविलें. त्यानें मोंगल खजिन्यांतून सुमारें ८६ लाख किंमतीचीं चांगली रत्नें निवडून काढिलीं; आणि १ लक्ष तोळें सोनें (किंमत १४ लाख रुपये) खरेदी करून कसबी सोनार कामावर बसविले; आणि बेबादखान याच्या देखरेखीखालीं हें नवीन मयूरसिंहासन तयार करविलें. हें काम सात वर्षें चाललें. सिंहासनाची लांबी सव्वा तीन, रुंदी अडीच व उंची ५ यार्ड होती. त्याला बारा कोन व बारा खांब होते. वर मधोमध एक लहानसें झाड असून प्रत्येक खांबाच्या शिखरावर दोन दोन मोर होते. एवढयाचवरून त्यास मयूरसिंहासन नांव पडलें. वर जाण्यास तीन रत्नखचित पायऱ्या असून, अकरा बाजू कठडे बसवून बंद केलेल्या होत्या. बारावी बाजू प्रवेशाची असून उघडी होती. आंतल्या बाजूस एका फारशी कवीची वीस कवनें कोरविलेलीं होती. ह्या सिंहासनास लागलेल्या साहित्याची किंमत एक कोट रुपये असून, त्याशिवाय मजुरी निराळी होती. ता. १२ मार्च स. १६३५ रोजी ह्या सिंहासनावर शहाजहान प्रथम बसला. नादीरशहानें परत जातांना हें सिंहासन इराणांत नेलें. त्याच्या नंतरच्या शहांनीं कांहीं दिवसांनीं तें मोडलें. लॉर्ड कर्झन जेव्हां इराणांत गेला होता तेव्हां त्यानें याचा तपास केला. सांप्रत याच्यापैकीं कांहीं रत्नें इराणच्या राजाच्या कोशागारांत आहेत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ मार्च १६६४*
सुरतकरांनी कंपनीस एक पत्र पाठविले ते असे :
"...छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता व सामर्थ्य वाढत असून सर्वांना त्याचे भय वाटते... आज त्यांच्या ताब्यात काही नाही तरी आठ नऊ महत्त्वाची बंदरे आली आहेत. या प्रत्येक बंदरातून इराण, बसरा, मक्का या बाजूला त्याची निदान दोन तीन गलबते व्यापारानिमित्त बाहेर पडतात...."
या व्यापारार्थ बाहेर पडणाऱ्या महाराजांच्या गलबतांना पकडून इंग्रजांना आपल्या वखारीच्या लूटीची भरपाई करुन घ्यायची होती त्यासाठी टपून बसले होते.
छत्रपती शिवरायांनी आता मोठ्या आरमारी स्वारीचा बेत आखला होता. त्याचे नेतृत्व ते स्वतः करणार होते त्यानुसार फेब्रुवारी १६६५ रोजी छत्रपती शिवराय मालवण येथील सिंधुदूर्गाहून ८५ लहान गलबते व ३ मोठी गलबते घेऊन बार्सिलोर (बसनूर) वर निघाले त्यांच्या बरोबर ४००० सैन्य होते. बसनूर हे शहर छत्रपती शिवरायांनी लुटले. या स्वारीचे वर्णन सभासद बखरकार करतो - " शहरांचे लोक बेहुशार होते. एकाएकी जहाजांतून मराठे उतरले, शहर मारिले एक दिवस शहर लुटून फन्ना केले. जैशी सुरत मारुन मालमत्ता आणली त्याप्रमाणे बसनूरची मालमत्ता, अगणित माल, जडजवाहीर, कापड जिन्नस घेऊन देशास आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ मार्च १७०१*
स्वातंत्र्यसौदामिनी स्वराज्याची मुत्सद्दी महाराणी ताराबाईंवर
बादशहाने जोरदार आक्रमणे सुरु केली. याकाळात ताराराणींनी कुशल युद्धनीतीने मात केली. बादशहाच्या फौजेने वेढा दिलेला किल्ला जास्तीत जास्त काळ लढवायचा पावसाळा जवळ येईपर्यंत किल्ला लढवायचा व नंतर वाटाघाटी करून रोख रक्कम घेऊन किल्ला बादशहाच्या ताब्यात द्यायचा ही रणनीती वापरली. वेढ्यातल्या सैन्यावर मराठे आक्रमण करतच याचबरोबर धनाजी जाधव, हणमंतराव निंबाळकर, नेमाजी शिंदे मोगली मुलखात धुमाकूळ घालत यांना रोखण्यासाठी बादशहा दाऊदखान, राव दलपत बुंदेला, शहजादा बेदरबख्तत, जुल्फिरखान यांना पाठवत. औरंगजेबाचा चरित्रकार भीमसेन सक्सेना म्हणतो, एकट्या जुल्फिरखानाला १७०० च्या मोहिमेत २००० कोसांच्या हालचाली कराव्या लागल्या. सातारा, परळी दोन किल्ले घेतल्यानंतर बादशहा माणदेशात सरकला. पुढे त्याने पन्हाळा-पावनगडास वेढा घातला या परिस्थिती मराठे जोमाने लढत होते. विठोजी केसरकरांनी गडाबाहेर पडून मोर्चा मारल्यानंतर त्यांचे कौतुक करणारे पत्र ताराराणींनी लिहिले त्यातून त्यांनी जिद्द व आत्मविश्वास वाढविला "तुम्ही हमेशा कस्त करून गनिमास नजिता पावविता. एक दोन वेळ मोर्चा मारिला. औरंगजेबाला तरी ठेचगा द्यावा अशी उमेद धरता, म्हणून हे वर्तमान देवजी रघुनाथ व फडणीस यांनी विदित केले त्यावरून तुमचा मुजरा झाला. ऐसियास तुम्ही एकनिष्ठ सेवक तैसेच राहा. याउपरी औरंगजेब आला आहे तरी त्याचा हिसाब न धरता स्वामींची जागा जतन करणे. स्वामी उर्जित हरबाब करतील. दिलासा असो देणे." १२ मार्च १७०१. बादशहा विशाळगडाकडे येतोय हे समजताच ताराराणी व शिवाजीराजे प्रतापगडावर पोहचल्या. या प्रसंगी ताराराणींनी मराठा सरदार प्रतापराव मोरे यांना लिहलेले एक पत्र उपलब्ध आहे ज्यावरून त्यांचे लढाईचे धोरण, सरदारांशी वागणूक, शत्रूशी लढण्याचा निर्धार दिसून येतो. त्यातील एक वाक्य असे "औरंगजेब विशाळगडास बिलगला याजकरिता त्याचे कविलावाड मारून हमेशा गोटावर हल्ले करावेत, तरीच तो बलकुबल राहतो. याजकरिता तुम्ही लोक आपले अवघे एकदील होऊन औरंगजेबास जडून राहणे. तुम्ही स्वामींचे एकनिष्ठ सेवक, मायेचे विश्वासू आहा.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ मार्च १७०३*
कडक पडलेल्या उन्हाळ्यात सिंहगडचा किल्लेदार बंधजी जाधव याचा मृत्यू. त्यानंतर औरंगजेबाचा वेढा हळुहळू पुढे सरकू लागला. 
मुगलांच्या बातमीपत्रात किल्लेदाराचे नाव बंधजी असे दिले आहे. तो धनाजी जाधवच्या भाऊबंधांपैकी होता, असे म्हटले आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ मार्च १७६६*
दुसरे संभाजीराजे (करवीर) व त्यांची पत्नी राणी जिजाबाई यांनी बुद्धिपुरस्सर पेशव्यांशी (बाळाजी बाजीराव) सलोख्याचे संबंध ठेवण्याच्या दृष्टीने करवीर सरकारकडून सतत पत्रव्यवहार चालू ठेवला होता. हेतू असा की पेशव्यांनी गुप्तरीत्या केलेल्या कराराचा त्यांना विसर पडू नये. याच संदर्भात छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर (१७४९) जिजाबाईंनी सदाशिवरावभाऊंना लिहिलेल्या पत्रात कराराची आठवण देऊन त्वरा करण्याचे सुचीविले आहे. त्या लिहितात, ‘‘अविलंबे कार्ये दृष्टीस पडावे, लौकिक उत्तम दिसोन, यशास पात्र तुम्ही व्हावे. साहेबी सर्वाविसी येख्तयारी आपणावर टाकावी, ऐसे कित्येक मनोदय साहेबी कल्पून गत वर्षांपासून वेदशास्त्रसंपन्न राजश्री भटजीस लागोपाठ रवाना केले. ऐसे असता साहेबाचे प्रत्ययास गोष्ट दिसू नये. तेव्हा साहेब मध्यस्थ होऊन हुजूर वचन गुंतविले, याचा लौकिक कोणा प्रकारचा होणार? हा अर्थ चित्तात आणून तदनुरूप या उपरी पूर्व संदर्भाच्या (गुप्त कराराच्या) विचारानरूप अंगेजणी करून स्वराज्यकर्तव्यार्थ.’’
जिजाबाईंचे राज्यकारभारात बारीक लक्ष असे. एखाद्या सेवकाने गैरकृत्य केले वा टंगळमंगळ केली आणि कामास नकार दिला, तर त्या त्यास योग्य धडा देत.
पश्चिम किनाऱ्यावर इंग्रजांचे प्राबल्य वाढत होते. त्यांनी काही तरी कुरापत काढून सिंधुदुर्ग मे १७६५ रोजी घेतला. करवीर राज्याचा हा किनाऱ्यावरील प्रमुख किल्ला पडल्यानंतर इंग्रजांना पायबंद घलण्यासाठी जिजाबाईंनी आपल्या परीने अथक प्रयत्न केले. कोंकणातील अन्य किल्लेदारांना पत्रे लिहून सावधनतेचा इशारा दिला; तरीसुद्धा यानंतर इंग्रजांनी पुन्हा एक किल्ला यशवंतगडही ताब्यात घेतला. या घटनेबद्दल जिजाबाईंनी सावंतवाडीकरांचा कारभारी जिवाजी विश्राम यास दि. १२ मार्च १७६६ रोजी एक पत्र पाठवून नापसंती व्यक्त केली आहे. या पत्रात त्यांनी ‘कोवळा मोड आहे तो मोडल्याने उत्तम, भारी जाहलेने सर्वाचे वाईट होईल,’ असा इशारा दिला आहे. इंग्रजी सत्ता पुढे वरचढ होईल, याची जाण त्यांना होती; म्हणून त्यांनी हा इशारा त्या वेळी दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ मार्च १७७३*
समशेर बहाद्दर सरदार खंडेराव बर्गे
यांनी १२ मार्च १७७३ रोजी राजधानी रायगड
किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. साताऱ्याचे छत्रपती महाराज यांनी ही जबाबदारी जुने विश्वासू,
लढवय्ये सरदार म्हणून खंडेराव यांचे वर सोपवली
होती. त्या बद्दल महाराजांनी समशेर बहाद्दर हा खिताब दिला तसेच इनाम वतन त्यांना दिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ मार्च १८३३*
वीर बाबुराव सेडमाके - १८५७ च्या उठावातील गोंडवनाचा तेज:पुंज क्रांतीसूर्य यांचा जन्म
मोलमपल्लीचा जमीनदार बाबूराव सेडमाके (शेडमाके) यांचा जन्म गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील किष्टापूर गावात १२ मार्च १८३३ रोजी झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...