*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१३ जानेवारी

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ जानेवारी १६८०*
छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूराजे यांची पन्हाळ्यावर ऐतिहासिक भेट. तसेच संभाजीराजेंची सरसुभेदार म्हणून पन्हळ्यावर नेमणूक करून छत्रपती शिवराय रायगडास परतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ जानेवारी १६८०*
महाराजांचे_अखेरचे_पत्र....
इ.स. १६८० फेब्रुवारी-मार्च दरम्यान शिवाजी महाराजांनी व्यंकोजीराजांना हे पत्र पाठवलेले आहे.
महाराजांनी पाठवलेले कदाचित हे शेवटचे पत्र असावे.
या पत्रात महाराजांनी दि १८ ऑगस्ट १६७९ ते १३ जानेवारी १६८० दरम्यान झालेल्या युद्धासंबंधीत घटनांची माहिती व्यंकोजीराजांना दिलेली आहे.
मृत्युच्या पायरीवर उभे असलेले महाराज येथेही स्वराज्यरक्षण, शत्रूच्या दारुण परभवानंतर मनाला वाटणारे समाधान, मुघलांकडून परत आलेल्या शंभुराजांकडून आशावाद, व्यकोजीराजांप्रति आत्मीयता असे सर्व भाव या पत्रातून उत्घृत झालेले दिसतात. 

श्रियासह चिरंजीव अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य राजश्री महाराज व्यंकोजी राजे यासी प्रति सिवाजी राजे आशीर्वाद येथील कुशल जाणून स्वकुशल लेखन करणे. ऊपरी तुम्ही पत्र पाठविले ते पावले. तुमचे कुशल कळोन संतोष वाटला. असेच क्षणक्षण आपले कुशल लेखन करुन पाठवीत जाणे. विशेष ए प्रांतीचे वर्तमान: दिलेलखान विजापुरची पातशाही कमकुवत देखोन जोरावरी धरून विजापूर यावे याय मतलबें विजपुरावरी चाल केली. भीमा नदी उतरून शहरानजीक एऊन भिडला. हे वर्तमान खान अलीशान मसऊदखान यानी आम्हास लिहीले की, गनीमे जोरावरी बहुत धरली आहे. एऊन मदत केली पाहिजे. त्यावरून आम्ही तेच क्षणी स्वार होऊन मजली दर मजली पनाळियास आलो. सारी कूळ जमती जमा करुन खासा लष्करानिशि विजापुरा सन्निध गेलो. विचारे पाहता गनीम कट्टा; त्याहीमध्ये पठाण जाती, हट्टी, याशीं हुन्नरेच करुन खजील होऊन नामोहरम होय तो हुन्नर करावा. म्हणून ऐशी    तजबीज केली की, त्याचे मुलकात फौजाचा पैसावा करुन ओढा लावावा. त्यावरून दिलेरखानास ती गावाचे अंतरे सोडून भीमा नदी उतरून तहद जालनापूर पावेतो मुलूख ताख्तताराज करीत चाललो. जालनापूरास जाऊन चार दिवस मुक्काम करुन पेठ मारिली. बहुत मालमत्ता (हाती) लागली. जालनापुरास म्हणजे औरंगाबादेहून चार गांवे ते जागा शहाजादा असता त्याचा हिसाब न धरिता पेठ लुटली. सोनें रुपे हत्ती घोडे याखेरीज मत्ता बहुत सापडली. तो घेऊन पठा-गड तरकीस स्वार होऊन कूच करुन एता, मध्ये रणमस्तखान व आसफखान व जाबीतखान असे आणीक पाचसात उमराऊ आठ दहा हजार स्वारानशी आले. त्यास शाहाबाजीच्या हुन्नरे जैशी तंबी करुन ये तैशी तंबी करुन घोडे व हत्ती पाडाव करुन पटियास आलो. मागती लष्कर मुलकांत धुंदी करावयास पाठविले; व राजश्री मोरोपंत प्रधान यास बागलाण व खानदेश प्रांती सत्तावीस किल्ले मोगलांचे आहेत ते व मुलूख कबज करावयास पाठविले. आणि आम्हीं पटियास मुक्काम केला. तो खान अलीशानाची किताबती आली की, तुम्ही कितेक गनिमाचे मुलकांत स्वारी करुन खराब केला ओढा लाविला. परंतु या जागाहून गनीम उखळत नाही. बहुतच बळ धरून कोटानजीक भिडला आहे. ए समयी एऊन मदत करुन पातशाही राखिली पाहिजे. त्यावरून मागती स्वार होऊन मजली दर मजली पनाळियास आलो कितेक द्रव्याने व सेनेने पहिले सहाय्य केले व मागतीहि द्रव्य मबलग पाविले व सेना गनिमाचे मुलकांत पैसली होती ते बोलावून आणून दिलेल खानावरी पाठविली. त्यानी जाऊन कहीकाबाड मारुन कूल सामान वाब धरून आरोखून धरीला. त्याचे मदतीस औरंगाबादेहून रणमस्तखान व बाजे उमराऊ अलीखान घेऊन सात आठ हजार स्वारानिसी येत होते त्यासहि मारीत गर्देस मेळवीत पिटीत औरंगाबाद पावेतो नेले. कितेक शहरे लुटीत देश खराब करीत परतोन येऊन गनिमास घेरोन बैसले. हे वर्तमान व राजश्री मोरोपंत त्या प्रांती पाठविले होते त्याणी अहिवंत किल्ला घेतला. अहिवंत म्हणजे काही पनाळा; त्याचेबरोबरी समतुल्य आहे. दुसरा नाहवा गड, बागलाणच्या दरम्यान मुलकात आहे; तो कठीण तोहि घेतला. हे दोनी किले नामोशाचे पुरातन जागे कबज केले. त्या किल्यावरहि बहुत मालमत्ता सापडली व त्याजबरोबर जमेत होती ते मुलकात पाठऊन धामधूम केली. कितेक मुलूक कबज केला. हे वर्तमान व पहिले आम्ही स्वारी केली. जालनापूर मारिले रणमस्तखान नामोहरम केला हे वर्तमान वरचेवर पादशहास बाकीबाहाल जाला. पातशाहि बहुत खजिल होऊन आहादीवर आहादी दिलेलखानास आले. ये जातीने मुलूख खराब करुन गड  कोट व देश कबज व करुन वोढा लाविला; आणि लवाजमा धरून वरच्यावरी कहीक मारुन गनीम जेर केला. दिलेलखानासहि ऐसे कळोन आले की, येथे राहिल्याने आपली शाही कुल बुडवितील हे पुर्तेजाणून विजापूर सोडून दिवसास कोस दोन कोस मजली करुन चालिला. ऐसा गनीम जेरजेर करुन खट्टा करुन उखळिला व खान अल्लीशानेहि बहुतच शर्त केली. जैसा कोट राखावयासी शर्थ करुन ये तैसी करुन कोट राखिला. आम्ही या प्रकारे विजापुरीचे साहाय द्रव्याने व सेनेने करुन ज्या उपाये गनीम उखळून ये त्या उपाये उखळून विजापुरीचे आरिष्ट दूर करुन विजापूर रक्षिले. ते प्रसंगी खान अलीशानाचा सलुखा जाला. त्या करारबाबेमध्ये होसकट व बगरुळ व अरणी व चंदाऊर आदी करुन तुमीचे निसबती आम्ही आपणासीच लाऊन घेतली पेशकसी तोफा तुम्ही निराळा घ्यावा (?) सतत निसबती तुम्हासी लागावी ऐसे केले नाही आवघे आम्हीच मान्य केले. तोफा आम्हीच तुम्हादेखील घ्यावा ऐसा तह ते प्रसंगी करुन करारबाब करुन सला केला. या उपरी दिलेलखान आदवानी कारबळ (कोपळ?) प्रांताकडे गेला होता. आमचीहि सेना पाठीवरी गेली व आम्ही विजापुरास जातो. कारवळ प्रांताकडे राजश्री जनार्दनपंत ठेविले. त्याणी तिकडे कितेक पुंड पाळेगारानी फिसाहती केली होती त्यास मारुन काढिले व हुसेनखानाचा भाऊ कासीमखान दोन तीन हजार स्वारानिसी आला होता त्यास व त्याचे कबिला व हुसेनखानाचे दोघे लेक असे दस्त केले व हत्ती पाच व घोडे पाचसे पाडाव केले या खेरीज पुंड पाळेगारांचा मुलूक व गड व कोट कबज करुन ठाणी बैसविली फते केली. याउपर दिलेलखान सर्जाखान व हुसेनखान येतो हे कळोन हेहि पाच साहा हजार स्वारानिसी गनिमावर गेले. मधे गनीम घालून जिकडे गनीम जाय तिकडे जाऊन जागा जागा गनिमास गोषमाला देऊन तिकडूनहि मारुन काढिला. सांप्रत भीमानदी उतरून पेडगावास आपले मुलकात गेला. गनिमास ऐसे केले जे मागती विजापूरची वाट न धरावी ऐसा खट्टा केला; व चिरंजीव राजश्री संभाजीराजे मोगलाईत गेले होते त्यास आणावयाचा उपाय बहुत प्रकारे केला; त्यासहि कळो आले की ये पातशाहीत अगर विजापूरचे अगर भागानगरचे पातशाहीत आपले मनोगतानरूप चालणार नाही. ऐसे जाणोन त्यानी आमचे लिहिण्यावरुन स्वार होउन आले. त्याची आमची भेट जाली. घरोब्याचे रीतीने जैसे समाधान करुन ये तैसे केले. हे सविस्तर वर्तमान तुम्हास कळावे म्हणोन लिहिले असे. कळले असावे. 'मोर्तबसूद'

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ जानेवारी १७०९ (किंवा १७१०)*
शिवरायांचे अंगरक्षक वीर जीवाजी महाले (संकपाळ)
यांची पुण्यतिथि.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ जानेवारी १७६०*
श्रीमंत सदाशिवराव भाऊसाहेब यांचे गोविंदपंत बुंदेले यांना पत्र
स्वतः निजाम विरुद्धच्या स्वारीवर असतांना दिनांक १३ जानेवारी सन १७६० रोजी गोविंदपंत बुंदेले यांना लिहिलेल्या पत्रात ते येथील खबर त्यांना देतानाच उत्तरेतील घडामोडीं काय आहेत याची विचारणा करतात. निजामाचा फैसला लवकरच होईल याबत आत्मविश्वासाने लिहितात.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ जानेवारी १७६१*
पानिपतचा रणसंग्राम
डिसेंबर-जानेवारी मधे अन्नाविना मराठ्यांची बरीच जनावरे, घोडे मेले. १३ जानेवारी रोजी उपाशी पोटी सर्व सैन्य रनांगणावर लढाईसाठी उतरले. सैन्य पूर्ण खचलेले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ जानेवारी १७७८*
महादजी शिंद्याचे छत्रपतींविरुद्ध आक्रमण
कोल्हापूरच्या छत्रपतींचे पारिपत्य करण्यासाठी पेशव्यांनी त्यांचे सरदार महादजी शिंद्यास पाठवले. जानेवारी १७७८ साली केवळ कोल्हापूर शहरच नव्हे तर संपूर्ण करवीर राज्यच ताब्यात घेण्याच्या उद्देशाने तीस हजारांची प्रचंड फौज घेऊन पेशव्यांचा सरदार महादजी छत्रपतींच्या राजधानीवर चालून आला. यावेळी कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ वीस वर्षांचे होते. त्यामुळे राज्याची संपूर्ण लष्करी जबाबदारी येसाजी शिंदे यांच्यावर होती. महादजीच्या तीस हजार फौजेशी युद्ध करणे प्रचंड नुकसानकारक ठरणार होते. त्यामुळे छत्रपतींचे सेनापती येसाजी शिंदे यांनी महादजींकडे बोलणी लावली. दोन लाख रुपये देऊन महादजीला वाटेतूनच पुण्याला परत पाठवून द्यावे असा येसाजींचा बेत होता. मात्र महादजीने हि बोलणी धुडकावून लावत तब्बल तीस लाख रुपयांची मागणी केली. हि मागणी पाहून जास्त काही न बोलता सेनापती येसाजींनी कोल्हापूर राज्याची फौजच तयार ठेवली. दि. १३ जानेवारी १७७८ रोजी महादजीची फौज कोल्हापूरच्या वेशीवर पोहोचली. मात्र कोल्हापूरची बुरुजबंद तटबंदी भेदून शहरात घुसणे त्यांना अशक्य होते. त्यामुळे महादजीने कोल्हापूरास वेढा घातला. राजमाता, छत्रपती महाराज व संपूर्ण राजकुटूंब शहरातच होते. त्याचदिवशी छत्रपतींचे सरदार सटवाजी भोसले तीन हजार फौजेसह गनिमी काव्याने वेढ्यावर हल्ला करुन शहरात परतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ जानेवारी १७७९*
वडगावचा तह
रघुनाथरावाशी संपूर्णपणे वाकडे धरू नये, असे तुकोजी होळकर, मोरोबादादा फडणीस आणि सखारामबापू यांना वाटत होते. यातूनच बारभाईत मतभेद वाढू लागले. सखारामबापू आणि मोरोबादादा फडणीस यांनी पेशवाईचा मालक सवाई माधवराव पण रघुनाथरावाने वडिलकीच्या नात्याने कारभार करावा, असा बेत करून १७७८ च्या मार्चमध्ये पुणे ताब्यात घेतले; पण महादजी शिंदे फौजेनिशी पुण्यास येऊन दाखल झाले व मोरोबाच्या कटाची इतिश्री झाली; मोरोबास कैद करून पुढे १८०० पर्यंत तुरूंगात ठेवण्यात आले. याच सुमारास मुंबई कौन्सिलने पुरंदर तहाच्या विरूद्ध कंपनीच्या संचालकांकडे तक्रार करून युद्ध चालू ठेवण्याचा हुकूम मिळविला. रघुनाथरावाला घेऊन कंपनीची छोटी फौज पुण्याच्या दिशेने निघाली. तळेगावजवळ तिला वेढण्यास येऊन वडगावचा अपमानकारक करार १३ जानेवारी १७७९ रोजी मान्य करावा लागला. यावेळी सखारामबापूंचा शत्रूपक्षाशी झालेला पत्रव्यवहार उघडकीस आला आणि बापूंना कैद झाली. नाना फडणीसांना सर्वाधिकार प्राप्त झाले. पुढे कलकत्त्याहून सेनापती टॉमस गोडार्डच्या हाताखाली दुसरी फौज सुरतला येऊन दाखल झाली. युद्धास पुन्हा तोंड फुटले आणि १७८२ च्या मे महिन्यात सालबाईच्या तहाने ते थांबले. रघुनाथरावास सालिना तीन लाख रु. देऊन त्याने कोपरगावी रहावे असे ठरले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ जानेवारी १८३७*
फोंड सावंत तांबुळवाडीकर यांनी दादीबाई सावंत वाडीकर यांना सामील होऊन, बंड माजवून राजे खेम सावंत भोसले, सावंतवाडीकर यांच्या इलाख्यातील महादेवगड, मनोहरगडाच्या गडकऱ्यांनीही धामधूम माजविली. त्याचा उल्लेख एका पत्रात आहे. या बंडखोरांपैकी काहींनी सामानगड, पारगड, हेरे अशा वेगवेगळ्या ठिकाणी आश्रय घेतल्याचे उल्लेख आहेत.
अशापैकी मनोहरगड परिसरात धामधूम माजविलेले काही फरारी पारगड परिसरात आले. त्याची माहिती पाठविल्याबद्दल डनलॉप साहेब-पोलिटिकल एजंट, कर्नाटक यांनी छत्रपती शहाजी उर्फ बुवासाहेब महाराज यांना १३ जानेवारी १८३७ रोजी पाठविलेले हे पत्र आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४