*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*६ जानेवारी १६६४*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ जानेवारी १६६४*
सुरत लुटीचा पहिला दिवस
सकाळी आकरा वाजता लूटीला सुरूवात झाली. अहोरात्र लूट चालली होती. आख्खी जकात लूटली गेली. सुरतचा खुबसूरत सुभेदार इनायद खान “बहाद्दर” शेपूट घालून किल्ल्यात लपून बसला. रक्षणासाठी त्याने काहीही केले नाही. उलट भरपूर लाच खाऊन सुरतच्या नामांकित व्यापार्यांना सहकुटूंब किल्ल्यात घेतले. आक्रमणातही इनायतखानाने लाच खायची संधी सोडली नाही. पूर्ण सुरतेची पळता भूई थोडी झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ जानेवारी १६६५*
रुस्तमेजन हा महाराजांना विजापूर दरबाराच्या गुप्त बातम्या पाठवण्याचे काम करीत असे, हुबळीच्या लुटीच्या वेळी त्याने मोठी कामगिरी पार पाडली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ जानेवारी १६६५*
राजमाता जिजाऊंची सुवर्णतुला....
श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात छत्रपती
शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली. या दिवशी सूर्यग्रहण होते.
स्नानादि विधी झाले आणि एका पारड्यात आईसाहेबांना बसविण्यात आले. दुसर्या पारड्यात सोन्याच्या मोहरा-पुतळ्या टाकण्यास सुरूवात झाली. शास्त्री पंडीत तुलादानविधीचे मंत्र म्हणत होते. आईसाहेबांना या सोहळ्यापेक्षा शिवबाचेच कौतुक वाटत होते. माझा मुलगा ! केवढा रम्य आणि संस्मरणीय प्रसंग हा !
उंचच उंच सह्याद्रीचे ते वृक्षाच्छादित शिखर. तेथे ते प्राचीन शिवमंदिर. जवळच पंचगंगांच्या उगमधारा खळखळताहेत.
ब्राह्मण वेदमंत्र म्हणताहेत. एका पारड्यात आई बसलेली आहे आणि एक मुलगा दुसर्या पारड्यांत ओंजळीओंजळीने सोने ओतीत आहे. मातृदेवो भव ! पितृदेवो भव ! आचार्य देवो भव ! राष्ट्राय देवो भव !
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ जानेवारी १६७३*
अनाजीपंत व कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळगडच्या मनसुब्यासाठी रायगड सोडला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मोहिमेच्या आधीच कोंडाजी फर्जंदांच्या हातात सोन्याचे कडे चढवून सर्फराजी केली. आता गड मारण्याशिवाय पर्यायच नव्हता. विजयाच्या आधीच बक्षीस मिळाले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ जानेवारी १७५१*
ईश्वरसिंगराजे यांचा प्राण गेला. जयपुरात ही बातमी कळल्यावर सर्वत्र हाहाःकार झाला. मराठ्यास हे वृत्त समजल्यावर त्यांनी ईश्वरसिंगास अग्नी देण्याची व्यवस्था केली आणि त्याचा धाकटा भाऊ माधोसिंग ह्यास जयपुरात आणून तक्तावर तारीख २९ नोव्हेंबर १७५० रोजी बसविले. जयाप्पा शिंदे तारीख ६ जानेवारी १७५१ रोजी जयपुरास येऊन होळकरास मिळाले. माधोसिंगानी मराठ्यांस जयपुरच्या राज्याचा तिसरा हिस्सा निदान चौथा हिस्सा तरी द्यावा हे अगोदर ठरले होते. त्याप्रमाणे मराठ्यांनी माधोसिंगापाशी मागणी केली. मराठ्यांच्या ह्या मागणीस राजा माधोसिंगानी विरोध करावा म्हणून रजपूत मांडलिक व शेखावत रजपूत वीर माधोसिंगाभोवती जमा झाले. माधोसिंगास ह्यामुळे मराठ्यांचा नक्षा उतरविण्यास नवीनच जोम चढला. त्यास कपट आठवले. मराठ्यास सोमलखार मिश्रीत पक्वान्ने करून पिण्याच्या पाण्यात विष घालून जेवणास बोलावून मारावे असा बेत केला. परंतु जयाप्पानी जेवणास जाण्याचे नाकारिले. त्यामुळे मराठे सरदार वाचले. पुढे तारीख १० जानेवारी १७५१ रोजी सुमारे पाच हजार मराठे जयपूर शहर पहाण्यास बोलाविल्यावरून गेले. त्यात शिंद्यांकडील मातबर सरदार बरेच होते. शहरांत मराठे आल्यावर माधोसिंगाच्या हुकूमाने शहरचे दरवाजे बंद करण्यात आले. आणि मराठ्यांच्या कत्तलीस सुरवात झाली. दोन प्रहरपासून प्रहर रात्रीपर्यंत तीन हजार मराठे लोक कापून काढिले. एक हजार मराठे जखमी झाले. जयाप्पा शिंदे यांजकडील मातबर सरदार वगैरे फार मारले गेले. जे मराठे गांव कुसावरून उड्या घालून आले त्यांचे पाय व कमर मोडली असे वर्तमान झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ जानेवारी १७७२*
पानिपतच्या पराभवानंतर जाट, रोहिले व राजपूत यांनी मराठ्यांच्या विरूद्ध उठाव केले होते. त्या उठावांचा बीमोड करण्यासाठी माधवरावाने तुकोजी होळकर, महादजी शिंदे, रामचंद्र गणेश कानडे व विसाजी कृष्ण बिनीवाले यांस उत्तरेत पाठविले. त्यांनी रोहिले व जाट यांजकडून खंडण्या वसूल केल्या. विशेषत: शाह आलम बादशाहास दिल्लीच्या तख्तावर आणून बसविण्यासाठी दिल्लीवर स्वारी करून नजीबखानाचा पुत्र झाबितखानास हाकलून लावून मराठ्यांनी दिल्ली ताब्यात घेतली व अलाहाबाद येथील इंग्रजांच्या रक्षणाखाली असलेल्या बादशाहास दिल्लीस आणून ६ जानेवारी १७७२ रोजी तख्तार बसविले. झाबितखानाचा दुआबात पाठलाग करून त्याचा पुर्ण पराभव केला. रोहिलखंड ताब्यात घेतले आणि पानिपत युद्धात सापडलेली व दडवून ठेवलेली संपत्ती परत मिळवून पानिपतच्या पराभवाचा सूड घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ जानेवारी १७५४*
स्वामी दर्याचे, तुळाजी आंग्रे
तुळाजी आंग्रे ह्यांनी मिळवलेला मलबार कोस्ट वरील विजय ह्या बातमीचा दरारा बटावीया (इंडोनेशिया), बाली, नेथेरलँड्स युरोप पर्यंत पोहोचलेला.
६ जानेवारी १७५४ रोजी ३ व्हीओसी जहाजे- विमॅनम, व्रेडे आणि जॅकात्रा हे तुळजी आंग्रे विरुद्ध मलबार समुद्रा जवळ झुंज देत होत्या, आणि तेव्हा तुळाजी आंग्रे ह्यांच्या जवळ मराठा आरमारात फ्लीटमधून ३६ जहाजे अगदी VOC ला धैर्याने तोंड देत मलबार किनारपट्टीवरील विजयदुर्गजवळ संघर्ष करत होती. दोन्ही बाजूंनी २ दिवस संघर्ष चालू होता, शेवटी तुळाजी आंग्र्यांनी ह्या तीन भल्या मोठ्या जहांजांवर विजय मिळविला आणि ही ३ डच जहाजे जी नष्ट होत गेलेली ती तुळाजी आंग्र्यांनी ताब्यात घेतली आणि दुरुस्त करून आपल्या सत्तेच्या मालकीची करून घेतली आणि त्यातील चालकांना पळवून नेण्यात आले.
कमीतकमी एक डच नागरिक निसटला आणि त्याने व्हीओसीकडे परत प्रवास केला तो परत तुळाजी आंग्र्यां सोबत लढायला परत आलाच नाही.
त्यानंतर ह्यात तुळाजी आंग्र्यांनी मिळवलेल्या विजय ह्याची बातमी बटाविया ( इंडोनेशिया), बाली, नेथेरलँड्स मधे एवढी पसरली की ती युरोप पर्यंत पोहोचली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ जानेवारी १७९९*
यशवंतराव होळकर राज्याभिषेक
पेशव्यांनी जप्त केलेले आणि दौलतराव शिंदेंनी बळकावलेले होळकरांचे राज्य महाराजा यशवंतराव होळकर यांनी अनेक लढाया करीत डिसेंबर १७९८ मध्ये जिंकून घेतले आणि ६ जानेवारी १७९९ रोजी राज्याभिषेक करुन घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ जानेवारी १८१८*
होळकर-ब्रिटिश तह
तिसरे मल्हारराव (कार. १८०७–३३) यांनी हिस्लॉपच्या नेतृत्वा-खालील ब्रिटिश सैन्याविरुद्ध पराक्रमाचे दर्शन घडविले (डिसेंबर १८१७). त्यांची विधवा भगिनी भिमाबाईंनीसुद्धा शौर्याने प्रतिकार केला. तसेच हरिराव (विठोजींचा मुलगा) यांनीही जीवाचे रान केले; परंतु ब्रिटिशांच्या सुसज्ज तोफखान्यासमोर त्यांना मोहदपूर येथे शरणागती पतकरावी लागली. इंग्रजांच्या हाती होळकरांच्या ६३ तोफा आणि दारूगोळा पडला. अमीर खान आणि गफूर खान यांनी होळकर व ब्रिटिश यांमध्ये मध्यस्थी करून तहाची बोलणी केली. तात्या जोगांनी दिवाण माल्कमबरोबर होळकरांच्या-वतीने मंदसोर येथे ६ जानेवारी १८१८ रोजी तह केला. त्यानुसार संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक राज्य होऊन तेथे तैनाती फौज व एजंट राहू लागला. तैनाती फौजेसाठी होळकरांना बुंदीच्या उत्तरेकडील व सातपुडा पर्वताच्या दक्षिणेकडील प्रदेश खर्चासाठी द्यावा लागला. गफूर खानाला जावराची जहागीर बक्षीस मिळाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment