बालमटाकळी येथील गढी

बालमटाकळी येथील गढी
बालमटाकळीमध्ये एक गढी होती. त्या गढीचे भग्नावशेष शिल्लक आहेत. गढी दीड-दोन एकर परिसरात होती. गढीला सात बुरुज होते. गढीच्या सुरुवातीलाच भव्य पूर्वाभिमुखी दगडी कमान होती. कमान तेथून स्थलांतरित केली. पुन्हा ती कमान बालंबिका देवीच्या मंदिराचा मुख्य दरवाजा म्हणून स्थापित करण्यात आलेली आहे. तेथून साधारण पंचवीस-तीस फूट उंच चढून गेल्यानंतर गढीचा पहिला टप्पा होता. त्याला जुन्या काळी वरवाडा असे नाव होते. वरवाड्याच्या सुरुवातीला गढीचा आणखी एक कमान दरवाजा होता. तेथून पुढे उत्तरेकडील अर्ध्या भागात देशमुख मंडळींची काही घरे होती. गढीची मुख्य तटबंदी दक्षिणेकडील अर्ध्या भागात होती. तटबंदीला पूर्व दिशेला तीन, दक्षिण दिशेला तीन तर वायव्य कोपर्‍यात एक असे सात बुरुज होते. तटबंदीची व बुरुजांची उंची जमिनीपासून सुमारे शंभर फूट होती. मुख्य तटबंदीला असलेला भव्य कमान दरवाजा काळाचे घाव सोसत उभा आहे. गढीवरून खाली उतरण्यासाठी दक्षिण दिशेलाही एक रस्ता व कमान दरवाजा होता. तसेच, मालवाहतुकीसाठी तटबंदीच्या उत्तर भिंतीच्या बाहेरून एक रस्ता पश्चिम दिशेकडून होता. पूर्व दिशेच्या तटबंदीच्या व मुख्य द्वाराच्या साधारण वीसेक फूट बाहेर वीस फूट उंचीची आणखी एक तटबंदी दक्षिणोत्तर बांधलेली होती. त्या तटबंदीलाही मजबूत दरवाजा होता. गढीच्या दक्षिणेकडील तटबंदीपासून एक भुयारी मार्ग दक्षिण दिशेला गेलेला होता. तो भुयारी मार्ग अडीच-तीन किलोमीटर अंतरावरील बाडगव्हाण या गावातील गढीपर्यंत गेलेला होता. या दोन्ही गढ्यांच्या मधील भागात केल्या जाणार्‍या खोदकामाच्या वेळी भुयारी मार्गाचे अवशेष अधुनमधून आढळून येत असतात. गढीचे बांधकाम नेमके कधीचे होते हे निश्चित होत नसले तरी ती गढी संरक्षण दृष्टया इतरत्र आढळणार्‍या गढ्यांपेक्षा मजबूत होती. गढीची मालकी गरुड देशमुख घराण्याकडे होती.

बालमटाकळीची पाटीलकी व परिसरातील काही गावांची देशमुखीची वतनदारी तेथील गरुड देशमुख घराण्याकडे होती. गरुड देशमुख यांच्याकडे नेमक्या किती गावांची देशमुखी होती याचे पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु शेवगाव परगण्यातील सत्तावीस गावांची देशमुखी गरुड देशमुख यांच्याकडे होती, असे जुन्या पिढीतील लोकांकडून सांगितले जाते. परिसरातील काही गावांमध्ये गरुड देशमुख यांचे वंशज राहतात, त्यावरून या वतनदारीतील गावांचा अंदाज लावता येतो. येथील गरुड देशमुख यांना नाईक अशीही पदवी होती. या घराण्याचे ज्ञात मूळ पुरुष सोमजी गरुड हे शिवकालीन होते. तेथील गरुड देशमुख घराण्याची एक शाखा ग्वाल्हेरच्या शिंदे यांच्या सैन्यासोबत रणांगण गाजवत होती. मुघलांविरूद्ध दिल्लीला झालेल्या 1757 च्या लढाईत सरदार शंकररावबाबा गरुड देशमुख यांच्या नेतृत्वातील सैन्याने मोठे शौर्य गाजवले होते. गरुड देशमुख यांची पथके पानिपतच्या 1761 मध्ये झालेल्या रणसंग्रामामध्ये शौर्याने लढली होती. मराठ्यांनी त्यानंतर दहा वर्षांनी, 1771 मध्ये दिल्ली शहर जिंकले, त्यावेळीही सरदार गरुड देशमुख यांचे पथक आघाडीवर होते. त्या अगोदर मराठ्यांनी राजस्थानातील कोटा राज्यावर विजय मिळवला होता असा उल्लेख 1745 सालच्या कागदपत्रांमध्ये सापडतो. त्यावेळी सरदार गरुड यांची पथके मराठ्यांच्या सैन्यात होती. ग्वाल्हेरमध्ये सैन्याच्या तळामुळे तेथे ‘लष्कर’ हा भाग विकसित झाला. त्यावेळी गरुड देशमुख यांची एक शाखा तेथेच स्थायिक झाली. ती शाखा ‘लष्करवाले’ म्हणून ओळखली जात असे. त्या शाखेतील वंशज रणजितसिंह गरुड देशमुख हे औंध (पुणे) येथे स्थायिक झाले आहेत. रणजितसिंह गरुड देशमुख हे सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्तान आणि हिंदवी स्वराज्य महासंघ, पुणे या संस्थांच्या कार्यकारी मंडळावर मानद सदस्य आहेत. त्यांच्याकडे असलेल्या पूर्वजांच्या शस्त्रसाठ्यामध्ये 1757 च्या विजयानंतर सरदार शंकरराव बाबा गरुड यांना मिळालेली दिल्लीचा बादशहा आलमगीर दुसरा याची सोन्याची मूठ असलेली तलवार आहे. त्या सोबतच गोवळकोंड्याचा तानाशहा अबुल हसन कुतुबशहा याचीदेखील एक तलवार आहे. त्या दोन्ही तलवारींवर शंकरराव बाबा गरुड असे सुवर्णाक्षरात लिहिलेले आहे. गरुड देशमुख यांचे सैन्य शिंदे यांच्या सैन्यासोबत काही लढायांमध्ये पुढील काळातही सहभागी होते. या ‘लष्करवाले’ गरुड देशमुख यांच्या देवघरामध्ये मागील सात-आठ पिढ्यांपासून बालंबिका देवीची एक पूर्णाकृती लाकडी मूर्ती आहे. त्या मूर्तीची पूजा केल्याशिवाय त्यांच्या घराचा दिनक्रम सुरू होत नाही. त्यांच्या घरी पिढ्यान् पिढ्या सांगितल्या जाणार्‍या बालंबिका देवीच्या कथेनुसार बालंबिका देवीच्या स्थापनेच्या काळाचा अंदाज लावता येऊ शकतो.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...