सरसेनापती म्हाळोजी घोरपडे यांना ३३४ व्या स्मृतिदिन त्रिवार मानाचा मुजरा

म्हाळोजी घोरपडे एक अद्भुत सरसेनापती

 हिंदवी स्वराज्याचा सरसेनापती होणं हे काही खायचं काम नव्हतं, यासाठी अफाट शौर्य, निस्सीम त्याग ,स्वामिनिष्ठा अन अथांग असा पराक्रम गाजवावा लागतो. 

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शेवटची लढाई ही सातारा जिल्ह्यातील वाईजवळ. या युद्धात सर्जाखान याचा त्यांनी दारुण पराभव केला होता ,परंतु हंबीरराव मोहिते यांना त्या लढाईत तोफेचा गोळा लागला व रणधुरंदर सरसेनापती हंबीरराव मोहिते हे धारातीर्थी पडले. १६ डिसेंबर १६८७ साली हंबीरराव मोहिते धारातीर्थी पडले. आणि स्वराज्याच्या माळेतील एक स्वामीनिष्ठ असा मोती निखळला. कधीही भरून न येणारे नुकसान त्यावेळी झाले. संभाजी राजांना लहानपणापासून वडीलधारी म्हणून असलेला आधार मावळला. वाईच्या लढाईत दुर्दैवाने सरलष्कर हंबीरराव मोहिते यांचा काळ झाला अन स्वराज्याचे सरसेनापती हे पद पुन्हा एकदा रिक्त झाले. त्यानंतर संभाजी राजांनी *_म्हाळोजी घोरपडे यांसी सरंजामी देऊन मुखत्यारी सांगून त्यांना सरनोबतीची वस्त्रे दिली.आणि म्हाळोजी बाबा स्वराज्याचे पाचवे सरसेनापती म्हणून रुजू झाले._*

तत्पूर्वी म्हाळोजी घोरपडे शहाजीराजां सोबत आदिलशाहीत सरदार होते. त्यांना वतन वगैरे मान आदिलशाहीकडून मिळाला होता. पण जेव्हा शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करायचा ठरवलं तेव्हा शहाजीराजांसोबत संगनमताने म्हाळोजीबाबां त्यांच्या तिन्ही कर्तबगार पुत्रांसमवेत शिवरायांच्या स्वराज्यात रुजू झाले. 

 *शिवरायांच्या अनेक युद्ध मोहिमांमध्ये म्हाळोजीबाबा तसेच त्यांचे तिन्ही पुत्र संताजी - बहिर्जी - मालोजी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली पण दुर्दैवाने इतिहासकारांकडून त्यांचे योग्य ते मूल्यमापन नक्कीच होऊ शकले नाही ही खूपच खेदाची गोष्ट म्हणावी लागेल.* 

  म्हाळोजी घोरपडे जेव्हा आदिलशहाच्या पदरी होते तेव्हा त्यांच्याकडे वाई परगण्यातील विटा,भांगी ,भाळवणी या गावांची सरदेशमुखी होती. ही वतने त्यांच्याकडे वंशपरंपरेने चालत आलेली होती. म्हाळोजी घोरपडे यांचे वास्तव्य भाळवणी येथे होते, शिवरायांच्या काळात म्हाळोजीबाबा हे पन्हाळ्यावर तटसरनौबत म्हणून काम पाहत होते. साधारण १६७९ साली जेव्हा शिवरायांच्या युद्धनितीनुसार संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले आणि नंतर जेव्हा ते परत पन्हाळगडावर आले तेव्हा शिवाजी महाराजांनी संभाजीराजे यांची पूर्ण जबाबदारी म्हाळोजी बाबांवर सोपवली होती. म्हाळोजी बाबा हे शिवरायांच्या अत्यंत विश्वासू लोकांपैकी एक होते.
शिवाजी महाराजांच्या पश्चात आता १६८८ पर्यंत संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचा वारू हा चौफेर उधळत होता. सर्वच शत्रूंना मराठा फौजेने पाणी पाजले होते. औरंगजेबाने सर्व प्रयत्न करून पाहिले पण तो सपशेल अपयशी ठरला होता. मैदानी लढाईत आपण संभाजी राजांना पराभूत करू शकत नाही. हे जणू औरंगजेबाला पटले होते, आणि त्याने कपटाने शंभूराजांना कैद करण्याचा डाव आखला, त्यासाठी त्याला काही मराठा सरदारांची साथ हवी होती, त्यामुळे त्यांने काही नाराज सरदारांना सत्तेचे आमिष दाखवून आपल्या सोबत करून घेतले होते . त्यावेळी औरंगजेबाला स्वराज्यातील एक किल्ला सुद्धा घेता आला नव्हता ,त्यावेळी त्याने आपला सरदार मुकर्रबख खान म्हणजेच शेख निजाम त्याचा मुलगा ईखलास खान याला २५००० ची खडी जंगी फौज देऊन पन्हाळा भागात पाठवले होते, त्याचवेळी काही नाराज मराठा सरदारांना सुद्धा पाठवलं होतं. त्यावेळी औरंगजेबाचा एकच उद्दिष्ट होतं की सर्वप्रथम पन्हाळा काबीज करायचा कारण फौजी हालचालीसाठी हा किल्ला एकदम मोक्याच्या ठिकाणी होता. एकदा का पन्हाळा ताब्यात आला की मग मागचं मसाईचं पठार ,दूरची घोडेखिंड अन मग विशाळगड ते आंबा घाट हा सारा मुलुख सहजपणे मोघली अधिपत्याखाली येणार होता .
 संभाजी महाराजांना बातमी मिळाली की पन्हाळ्याच्या किल्ल्याभोवती मुकर्रबखान आणि त्याच्या फौजा वेढा घालणार आहेत, ते लागलीच कवी कलश आणि आपल्या निवडक फौजेनीशी पन्हाळ्याच्या दिशेने रवाना झाले. गडाखाली असणाऱ्या मोगली फौजा त्यांनी कापून काढल्या आणि फितुरांना गिरफ्तार करून गडावरन त्यांचा कडेलोट सुद्धा केला आणि पन्हाळा वाचवला .
पन्हाळा हातचा गेल्याचे दुःख काही शेखनिजामाच्या मनातून जात नव्हते, औरंगजेबाने देखील खरमरीत पत्र लिहून त्याची चांगलीच कान उघडणि केली होती . त्यानंतर काही दिवस शांततेत गेले इकडे संभाजी महाराजांनी पन्हाळ्याचे बांधकाम करून घेण्याचं काम सुरू करवून ते तडक रायगडाला जाण्यासाठी निघाणार वाटेत कसबा-संगमेश्वर या ठिकाणी सरदेसाईंच्या वाड्यामध्ये एक न्याय निवाडा करण्यासाठी थांबणार होते ही माहिती कशी काय जणू शेख निजाम यास कळाली होती. तो लागलीच संगमेश्वरच्या दिशेने कूच करत निघाला होता . 

शेख निजामच्या या हालचालीची माहिती पन्हाळ्यावर म्हाळोजी बाबांना हेरांकरवी समजली. म्हाळोजी बाबा सुद्धा त्यांचे पुत्र संताजी- बहिर्जी -मालोजी आणि आपले निवडक 500 मावळ्यांची फौज घेऊन संगमेश्वरच्या दिशेने निघाले होते.
 संभाजी राजे सरदेसाई यांच्या वाड्यात न्यायनिवाडा करून मुक्कामी थांबले होते. राजांना एक खबर मिळाली 'राजे घात झाला गनिम चालून येतोय स्वारांचा लोंढा संगमेश्वराकडे येतोय.' तेवढ्यात म्हाळोजी बाबा देखील संगमेश्वरात येऊन पोहोचले आणि म्हणले " राजं तुम्ही निघा, नावडी जवळ करा ,गनिमानी गाव येरबाढलाय. राजं आम्ही लढतो गनिमाशी , तुम्ही रायगड जवळ करा . लाख मेलं तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ,राजं निघा तुम्ही, भांगा करा" पण राजांनी सेनापतींना स्पष्ट नकार दिला आम्ही लढाईपासून पळणार नाही. आम्ही इथेच झुंजू, इथेच मरू, पण रण सोडून कधी पळणार नाही . त्याचवेळी मुकर्रबखानाची फौज संगमेश्वराच्या वेशीला येऊन भिडली. इकडे विखुरलेले मावळे पटापट आपल्या घोड्यांवर बसले. राजेही चंद्रावत या घोड्यावर बसले व लढाईसाठी सज्ज झाले . सोबत म्हाळोजी बाबा त्यांची तिन्ही मुलं कवी कलश, खंडोबल्लाळ, धनाजी जाधव व रंगनाथ स्वामी इत्यादी मातब्बर होतेच .
म्हाळोजी बाबांच्या डोळ्यात तर जणू आगच पेटली होती .इतक्याच समोरच्या झाडीतून आरोळी ऐकू येऊ लागल्या ,दीन दीन-अल्लाहू अकबर आणि मोघलांची घोडी दिसू लागली.

 त्याचबरोबर म्हाळोजी घोरपडेही बेंबीच्या देठापासून ओरडले "हर हर महादेव" आणि त्याचबरोबर संताजी व धनाजी सारख्या पोरांनी सुद्धा गर्जना केली "छत्रपती शिवाजी महाराज की जय" 
घोडी घोड्यांना भिडली , तलवारी खणाणू लागल्या, त्या आवाजाने झाडांवरील पाखरे फडफडू लागली, घोडी खिंकाळू लागली, काळोख थरारला , रात्र थरारली.
 रुंद पाठीच्या एका घोड्यावर मुकर्रबखान उर्फ शेख निझाम बसलेला, तीन चार दिवसाच्या प्रवासाने तो पुरता वैतागला होता.आता त्याच्या डोक्यात एकच विचार होता की संभाजी राजांना कैद करून बादशहाकडे घेऊन जायचा. बघता बघता मोगल सैन्यांनी वाड्याला वेढा दिला तसेच नदीकडे जाणारी वाट सुद्धा अडवली. लढाईत सुरुवातीपासूनच मुगल सैन्य वरचढ होते, त्यामुळे त्यांना खूपच चेव चढलेला. एवढा बलाढ्य राजा आता आपल्या तावडीत सापडणार या कल्पनेनेच मोघली सैन्य हरखुन गेले होते. सपासप तलवारी चालत होत्या ,इकडे शंभूराजांची तलवार सुद्धा गनिमाच्या नरडीचा घोट घेत होती.
 अनअपेक्षित झालेल्या हल्ल्यामुळे मराठे सुरुवातीला गडबडले होते पण त्यांना जाणीव झाली की आपल्या प्रणाहून प्रिय अशा राजाचा जीव धोक्यात आहे अन मराठे पेटून उठले.
 संताजी , बहिर्जी, मालोजी, धनाजी आणि खंडोबल्लाळ यांना तर भयंकर चेव चढला होता. आपल्या राजाला वाचवायचे उद्देश धरून मराठे एवढ्या त्वेषाने लढू लागले की मराठ्यांचा दंगा, मोठ्या आवाजात आरोळ्या चालू झाल्या. खानाला मराठ्यांचे सैन्य आपल्या सैन्याच्या दुप्पट असल्याचा भास झाला. हे पाहून मुकर्रबखान स्तब्ध झाला.
इकडे ६०-६५ वर्षांचे वृद्ध म्हाळोजी बाबा दोन्ही हातात समशेर घेऊन लढत होते , जो मध्ये येईल त्याला सभासप कापत होते. संभाजी राजे सुद्धा त्वेषाने लढत होते. म्हाळोजी बाबा अत्यंत शौर्याने लढत होते. संभाजी राजांनी त्यांच्याकडे पाहिले अन राजांना जणू कोंढाण्यावर लढणाऱ्या शेलार मामांची आठवण आली," ऐसा म्हाळोजी लढत होता, जणू भासे शेलारमामा समयाला " 

सरसेनापती संभाजीराजांना संरक्षण देत लढत होते, झुंजत होते ,गनिमाला कापत होते. मुकर्रबखानाने ते पाहिलं आणि त्याला कळलं की ह्या म्हाताऱ्याला अडवल्याशिवाय आपण संभाजी राजाला पकडू शकत नाही आणि त्यांने आरोळी ठोकली 'इस बुढ्ढे को पहले लगाम डालो, घेर डालो इस बुढ्ढे को' अन जवळच सगळं यवनी सैन्य म्हाळोजी बाबांच्या भोवती गोळा झालं.जसं चक्रव्यूहात सापडलेला अभिमन्यू. सर्व मुघलांचे वार पेलत म्हाळोजी बाबा लढत होते. साठ वर्षांचं रटाळ शरीर, पण आपल्या राजासाठी जीव ओतून लढत होतं. हर हर महादेव ची डरकाळी फोडत म्हाळोजी बाबा फिरत होते , पहिली फळी कापून काढली होती .गनिमाच्या रक्ताच्या चिळकांड्या उडवत होते , प्रेतांचे थर साचू लागले होते. अरे तो जोशच वेगळा तो आवेशच वेगळा आणि म्हाळोजी बाबांचं हे शौर्य पाहून खान सुद्धा हैराण झाला त्याला जणू समजलं की वाघ कसा असतो, असला ढाण्या वाघ पाहून मुकर्रबखानाने कमानमाराला बोलावलं आणि म्हाळोजी बाबांवर निशाणा साधायला सांगितलं .
पहिला बाण उजव्या दंडात लागला तशी समशेर खाली पडली आणि दुसरा बाण त्यांच्या कंठात घुसला तशी दुसरी समशेरही खाली पडली, बाबा निशस्त्र झाले तसे गुळाच्या ढेपीला मुंग्यांनी आक्रमण करावं तसे मोघली सैन्य म्हाळोजीबाबांवर तुटून पडला आणि शरीरावरची एक जागा अशी शिल्लक ठेवली नाही जिथे जखम झाली नव्हती . 

म्हाळोजी बाबा पूर्ण रक्त बंबाळ होऊन मातीत पडले त्यांच्या श्वासाने माती उंचच उडाली आणि त्या उंच उडवलेल्या मातीला म्हाळोजी बाबा जणू सांगत होते की" *सांगा माझ्या राजाला म्हाळोजी गेला....... पण मातीत मेला...... नुसता मातीत नाही मेला....... तर मातीसाठी मेला......"* 
अरे मातीत मरणारे तर कित्येक असतात पण मातीसाठी मरणारे हे फक्त मराठे असतात अशा योद्धाने मातीसाठी प्राण सोडले 
युद्धात मराठ्यांचा सेनापती पुन्हा एकदा पडला मराठ्यांचा सेनापती फक्त राणातच पडू शकतो हे म्हाळोजी बाबांच्या रूपाने पुन्हा एकदा सिद्ध झालं होतं. नेसरी असो किंवा वाई असो वा संगमेश्वर सगळे लढाईतच कामी आले . अन म्हाळोजी नावाचा बुरुज ढासळला. राजांच्या डोळ्यात पाणी आले, आपला बाप पडलाय कळतात संताजी बहिर्जीने मालोजी यांना देखील खूपच दुःख झाले पण सगळे त्याच त्वेषाने लढत राहिले त्यांना जिकडे वाट फुटेल तिकडून ते रायगडाजवळ पोहोचले पण या धामधुमीत कवी-कलशांना बाण लागल्यामुळे संभाजी महाराज त्यांना वाचवण्यासाठी माघारी फिरले आणि दुर्दैवाने ते पकडले गेले . 
याच दिवशी १ फेब्रुवारी १६८९ ला स्वराज्याच्या इतिहासाला काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली.

 अशा या महापरिक्रमी स्वराज्याच्या शिलेदाराला माझा मानाचा मुजरा ,म्हाळोजी बाबा तुमचा पराक्रम , शौर्य आणि बलिदान आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील.
अश्या या सरसेनापती म्हाळोजी घोरपडे यांना ३३४ व्या स्मृतिदिन त्रिवार मानाचा मुजरा

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...