श्री मोरया गोसावींच्या परम भक्तीमुळेच त्यांचे नाव श्री गणेशाबरोबर जोडले गेले व संपूर्ण जगात जयघोष सुरु झाला ....

🌹 *चिंचवडचे श्री मोरया गोसावी* म्हणजेच आपले गणपती बापा मोरया मधले *मोरया* 🌹

श्री मोरया गोसावी महाराज हे १४ व्या शतकातील गाणपत्य संप्रदायातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला. त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची आराधना केली. अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात येते. ते संत एकनाथ महाराज यांचे समकालीन होते. त्यांनी पुण्यातील चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली. 
असे म्हटले जाते की,गणपतीने मोरयास असा सक्षात्कार करून दिला की "मी (गणपती) तुझ्या पूजे करीता चिंचवड येथे प्रकट होणार आहे.मोरया गोसावी महाराज यांना कऱ्हा नदीच्या पात्रात तांदळा स्वरूपातील गणेश मूर्ती (मंगलमूर्ती) प्राप्त झाली.त्यानंतर मोरया गोसावी महाराज मोरगावहून चिंचवड येथे जाऊन स्थायिक झाले.तेथे त्यांनी गणपती मंदीर उभारले व त्यात कर्हेत प्राप्त झालेल्या गणेशमुर्तीची (मंगलमूर्तीची ) स्थापना केली काही कळाने मोरया गोसावी महाराजांनी संजीवन समाधी घेतली. श्री मोरयांना चिंतामणी नावाचा मुलगा होता,तो गणेशावतार होता. चिंचवड येथील मोरया गोसावी महाराजांची समाधी आणि त्यांनी ऊभारलेले गणेश मंदीर गणेशभक्तांचे प्रमुख आकर्षण आहे.

*श्री मोरया गोसावी*

कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात शाली नावाचे गाव आहे. त्यात वामनभट्ट शाळिग्राम आणि पत्‍नी पार्वतीबाई नांदत होते. देशस्थ ऋग्वेदी, हरितस गोत्राचे वैदिक वामनभट्ट श्रुतिस्मृतिपुराणोक्‍त गृहस्थाश्रमाचे काटेकोर पालन करत होते. अर्धे अधिक आयुष्य लोटले तरी पुत्रसंतान नाही म्हणून उदास झालेले वामनभट्ट घर सोडून निघाले. पत्‍नी बरोबर मजल दर मजल प्रवास करत मोरगावला आले. कऱ्हेच्या पठारावर विराजमान झालेल्या मोरयाला पाहून त्यांचे चित्त विराले. मनोरथ पूर्ण होईल अशी त्यांना आशा वाटू लागली. पोटी पूत्र व्हावा म्हणून त्यांनी खडतर तपश्चर्या केली. शेवटी मोरया प्रसन्न झाला आणि त्यांच्या पोटी अजन्मा जन्माला आला. पुढे आठव्या वर्षी उपनयन झाले. वेदाध्ययन संपले. मोरयाच्या भेटीसाठी तळमळणाऱ्या मोरयाला योगिराज नयनभारती गोसावी भेटले. त्यांच्या उपदेशाने मोरयाने मुळामुठेच्या काठी थेऊरच्या जंगलात चिंतामणीची घोर तपश्चर्या केली. बेचाळीस दिवसांच्या कठोर अनुष्ठानाने चिंतामणी प्रसन्न झाला. मोरया गोसावी बनले. ’गो’ म्हणजे इंद्रिये, त्यांच्या स्वाधीन झाली. मन मोरयात रमले. शमदम संपन्न गोसावी अष्टसिद्धी प्राप्त करून मोरगावला आले. त्यांच्या सिद्धी गोरगरिबांच्या, दीन दुबळ्यांच्या संकट निवारणासाठी राबू लागल्या. ’बहुत जनासि आधारू’ झालेल्या त्यांच्या पायाशी येऊन लोक कृतकृत्य हो‍ऊ लागले. मोरया गोसावींचा सगळीकडे मोठा बोलबाला झाला. पण यात जनाची उपाधि वाढली. ध्यानधारणेला वेळ मिळेना. एक दिवस अचानक मोरगाव सोडून मोरया गोसावी चिंचवड जवळच्या किवजाईच्या जंगलात आले. एकांतात ध्यानधारणा करू लागले. पण नियती काही वेगळीच होती. चिंचवडकरांनी त्यांना गावात आणले. आजचा वाडा आहे त्या ठिकाणी त्यांना झोपडी बांधून दिली. त्यात राहून मोरया गोसावी सेवा करू लागले. प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवड सोडत व मजल दर मजल करत मोरगावला जात. चतुर्थीला मयूरेश्वराची पूजा करत. पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत. एकदा कऱ्हेला पूर आला. पाण्याला जबर ओढ होती. एका कोळ्याच्या पोराचे रूप घेऊन मयूरेश्वर आला. मोरया गोसाव्यांना त्याने कऱ्हेपार केले. पण उशीर झाला. देऊळ बंद करून पुजारी घरी गेले होते. मोरया गोसावींची पूजा -दर्शन यात खंड पडायची पाळी आली. मोरया गोसावी तरटीपाशी बसून मयूरेश्वराला आळवू लागले. त्यांची भक्ति बघून श्रीगणेश प्रसन्न झाले. मंदिराची कुलुपे गळून पडली .मयूरेश्वर स्वतः त्यांच्या साठी बाहेर आले व त्यांना दर्शन दिले. मोरया गोसाव्यांनी मयूरेश्वराची यथासांग पूजा केली.वाढत्या वयामुळे त्यांना मोरगांवला पोहोचायला उशीर झाला त्याची खंत त्यांनी श्री मयूरेश्वरासमोर व्यक्त केली, तेव्हा मयूरेश्वरांनी मी स्वतः तुझ्यासाठी तुझ्याबरोबर चिंचवडला येईल असा त्यांना वर दिला, दुसऱ्या दिवशी सकाळी कर्हेच्या तिरी सूर्याला अर्ध्य देत असताना श्री मयूरेश्वर तांदळा रुपात त्यांच्या हातात प्रकट झाले - तोच श्री मंगलमूर्ती , त्यांनी त्याची स्थापना चिंचवडला श्री मंगलमूर्ती वाडयात केली.
पुढे हळूहळू चिंचवडचा पसारा वाढला. श्री मोरया गोसावी अन्नदानाला फार महत्त्व देत. अन्नसत्र, सदावर्त, यात्रा, उत्सव, पूजा-अर्चा यामुळे चिंचवड नेहमी गजबजू लागले.  त्यांच्या घरण्याला श्री छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांचा राजाश्रय ही मिळाला. श्री मोरया गोसावींचे माहात्म्य खूप वाढले होते. अनेक प्रकारचे लोक दर्शनाला येत. जनसंपर्कामुळे तपश्चर्येत व्यत्यय येत होता. त्यांनी मयूरेश्वराचा धावा केला. त्या क्षणीच मयूरेश्वराने प्रगटून विचारले, "बोल तुझी काय इच्छा आहे?" मोरया गोसावी म्हणाले, मयूरेश्वरा, मला आता गुप्तवास करण्याची, समाधी घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे मला अखंड अद्वैत अवस्था भोगता येईल." मयूरेश्वर म्हणाले "अरे तू आणि मी वेगवेगळे नाहीत. आपण एकच आहोत. मी अखंड तुझ्या हृदयात निवास करीन. जा, तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडतील." असा आशीर्वाद देऊन मयूरेश्वर अंतर्धान पावले. गेली काही वर्षे मोरया गोसावी देहीच विदेही अवस्था भोगत होते. ते अखंड आत्मानंदात रमलेले असत. समाधानाने व तृप्तीने त्यांनी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपला विचार आपल्या मुलाला चिंतामणीला सांगितला. त्यांना अतिशय दुःख झाले. वडिलांच्या आज्ञेप्रमाणे पवना नदीच्या काठावर एक पवित्र भूमी पाहून त्या ठिकाणी समाधीसाठी गुंफा तयार केली.  मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके १४८३, साल १५६१ हा उत्तम दिवस पाहून श्री मोरया गोसावी घरून निघाले. देवळी आले. त्यांच्या बरोबर चिंतामणी महाराज, दोन सुना, नातवंडं असा परिवार होता. गावातले अनेक लोक आधीच घाटावर येऊन बसले होते. सगळीकडे मोरया नामाचा गजर चालू होता. मोरया गोसावींनी स्नान केले. पूजा केली. धौतवस्त्र परिधान केले. मोरया गोसावी गुंफेत उतरले. एक-दीड परस खोलीची गुंफा होती. दहा हात लांब, दहा हात रुंद चिरेबंदी पाषाणांनी बांधून काढलेली. मधोमध पाषाणाचा चौरंग, त्यावर आसन, पुढे आणखी एक चौरंग, त्यावर गणेशपुराण, दोन्ही बाजूला दोन समया तेवत होत्या. मोरया गोसावी आसनावर बसले. चिंतामणी महाराजांनी त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घातला. सुनांनी औक्षण केले. सगळेजण पाया पडत होते. बघता बघता मोरयांची समाधी लागली. नजर दोन भुवयात स्थिरावली.
शरीर ताठ झाले. प्राण ब्रह्मरंध्रात येऊन राहिले. चित्त चैतन्याकार करून ते आत्मानंदात निमग्न झाले. चिंतामणी बाहेर आले. एक प्रचंड शिळा उचलून त्यांनी गुंफेवर ठेवली. चितामणी महाराजांनी समाधीवर सिद्धिबुद्धिसहित मोरयाची मूर्ती बसविली. समाधीकडे जायचा रस्ता होता, त्यावर अर्जुनेश्वराची मोठी शाळुंका स्थापन केली. हे समाधिस्थान जागृत आहे. आजही अनेक भक्‍तांना साक्षात्कार होतो. प्रचीती येते 🙏🏽🙏🏽🙏🏽

श्री मोरया गोसवींना थेऊरच्या श्री चिंतामणि ने दिलेल्या वरदाना नुसार, श्री चिंतामणिने त्यांच्या पोटीं जन्म घेतला तेच श्री चिंतामणि महाराज.
त्यांनी समाधी श्री मोरया गोसावींच्या समाधी समोरच आहे ( झोपलेला गणपती ).
तसेच श्री मोरया गोसवींच्या पुढच्या सात पिढयामधे श्री गणेशाचा वास होता .... त्या सप्त पुरुषांच्या समाधी सुद्धा मंदिर परिसरातच आहेत म्हणून या क्षेत्राला प्रति अष्टविनायक सुद्धा म्हणतात. श्री मोरया गोसावी, श्री चिंतामणी महाराज व श्री धरणीधर महाराज ( श्री मोरया गोसवींचे नातू ) यांनी श्री गणेशाला स्मरण करुण लिहिलेली पदे (अभंग ) ही खुप सुंदर व श्रवणीय आहेत. लतामंगेशकरानी गायलेले सुप्रसिद्ध पद (गाणे )- प्रथम तुला वंदितो हे त्यापैकी च एक.

श्री मोरया गोसावींच्या परम भक्तीमुळेच त्यांचे नाव  श्री गणेशाबरोबर जोडले गेले व संपूर्ण जगात जयघोष सुरु झाला ....

*गणपती बाप्पा मोरया ...... मंगलमूर्ती मोरया*

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४