शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*
**********************************
*१३ एप्रिल इ.स.१६६३*
*(चैत्र वद्य प्रतिपदा, शके १५८५, संवत्सर शोभन, वार सोमवार)*

महाराज कुडाळ मोहिमेसाठी किल्ले राजगडावरून रवाना झाले. 
           महाराज मोहिमेसाठी कुठेही आणि कधीही वेळ दवडत नसत. अफजलखानाचा (३२ दाताच्या राक्षसी बोकडाच्या) कोथळा बाहेर काढून त्याला यमसदनी धाडल्यानंतर पुढील महिनाभर महाराजांनी आदिलशाहीवर मोहिमा काढून आदिलशाहीस सळो की पळो करून सोडले. आजही महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे तोडल्यावर कुठलाही उत्सव साजरा न करता आठवडाभरातच नव्या मोहिमेची आखणी केली. ४ हजार घोडदळ, आणि १० हजार पायदळासह महाराज राजापुर मार्गे कुडाळ मोहिमेसाठी वेंगुर्ला भागाकडे निघाले. मात्र महाराजांच्या आगमनाच्या भितीमुळे पोर्तुगिजांची चांगलीच धावपळ झाली. डिचोली आणि साखळीचे हवालदार महाराजांच्या स्वारीच्या भयाने पळून गेले. महाराज मात्र, राजापुरास जाऊन तीरथे राहुजी सोमनाथ यांना सोबत घेऊन कुडाळसाठी पुढे निघून गेले. 

*१३ एप्रिल इ.स.१६६५*
दिलेरखानाने मोठ्या जिद्दीने अबदुल्लाखान, फतेलष्कर आणि हाहेली ह्या तोफा टेकड्यांवर चढवल्या. दि. १३ एप्रिल १६६५ ला मध्यान्हीं दिलेरखानाने या वज्रगडावर निर्णायक आक्रमण केले.
शेवटी तोफांच्या माऱ्याने वज्रगड ढासळू लागला व मावळ्यांना आतल्या बाजला जावे लागले. संध्याकाळपर्यंत मुरारबाजीच्या मूठभर मावळ्यांनी निकराने युद्ध केले पण संख्याबळ व सामग्री यांच्या समोर त्याचें काही न चालून त्यांना शेवटी शस्त्र खाली ठेवावे लागले. ८० लोकांचे बळी देऊन व १०९ लोकांच्या जखमांकडे पाहत दिलेरखानाने वज्रगड जिंकला आणि मोगली ध्वज फडकू लागला. 
शरण आलेल्या मावळ्यांना निशस्त्र केले गेले पण त्यांना जयसिंगाने अभयदान दिले.

*१३ एप्रिल इ.स.१७००*
छत्रपती राजारामराजे जाऊन महिना होऊन गेला तरी बादशाहस अजिंक्यतारा काही दाद देत नव्हता. १३ एप्रिलच्या पहाटे मोगलांनि किल्ल्याच्या तटाखाली दोन भुयारे खणली. आणि त्यात सुरुंग पेरून त्यांस बत्ती लाविली. एक सुरुंग फुटला आणि अनेक मराठे त्या खाली गाडले गेले, खुद्द प्रयागजी सुद्धा ढीगाऱ्यात अडकले पण सुदैवाने ते बचावले. तट फुट्ल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले, अनेक मोगल किल्ल्यात घुसले. तेवढ्यात अचानक दुसरा सुरुंग उडाला आणि तट चढ़णारे हजारो मोगल त्या खाली गाढले गेले. कित्येक मोगल तर उंच फेकले गेले. आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले आणि त्यांना साफ़ कापून काढले. गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनी तब्बल साडेचार महीने औरंगजेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला, 
तेव्हा गडावरच्या मराठ्यानी २१ एप्रिल १७०० रोजी शरणागती पत्करली.

*१३ एप्रिल इ.स.१७३१*
छत्रपती शाहू महाराज व छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरकर यांचेमध्ये दि.१३ एप्रिल १७३१ रोजी तह झाला. हाच तह "वारणेचा तह" म्हणून ओळखला जातो. या तहामध्ये एकूण नऊ कलमे आहेत. ती पुढीलप्रमाणे :
"तहनामा चिरंजीव राजेश्री संभाजीराजे यांसी प्रती शाहूराजे यांनी लिहून दिले सुll
१) इलाखा वारुण महाल तहत संगम दक्षिणतीर कुल दुतर्फा मुलुख दरोबस्त देखील व किल्ले तुम्हास दिले असत.
२) तुंगभद्रेपासून तहत रामेश्वरदेखील निम्मे आम्हाकडे ठेऊन तुम्हाकडे करार दिला असे.
३) किल्ले कोप्पल तुम्हाकडे दिला. त्याचा मोबदला तुम्ही रत्नागिरी आम्हाला दिला.
४) वडगावचे ठाणे पाडून टाकावे.
५) तुम्हाशी जे वैर करतील त्यांचे पारिपत्य आम्ही करावे. आम्हासी जे वैर करतील त्यांचे पारिपत्य तुम्ही करावे. तुम्ही आम्ही एकविचारे राज्यभिवृद्धी करावी.
६) वारणा व कृष्णेच्या संगमापासून दक्षिणतीर तहद निवृत्तीसंगम तुंगभद्रेपावेतो दरोबस्त देखील गड ठाणी तुम्हांकडे दिली असत.
७) कोकण प्रांत साळशीपलीकडे तहद पंचमहाल अंकोलेपावेतो दरोबस्त तुम्हांस दिली असत.
८) इकडील चाकर तुम्ही ठेवू नये. तुम्हाकडील चाकर आम्ही ठेवू नये.
९) मिरज प्रांत, विजापूर प्रांताची ठाणी देखील अथणी, तासगाव वगैरे तुम्ही आमचे स्वाधीन करावी.

एकूण कलमे नऊ करार करुन तहनामा दिला असे. सदरहूप्रमाणे आम्ही चालू. यास अंतराय होणार नाही."
या कराराप्रमाणे सर्वच गोष्टी पुढे प्रत्यक्षात आल्या असे नाही. कलम एक व दोननुसार संपूर्ण दक्षिण व तुंगभद्रेपर्यंतचा प्रदेश संभाजीराजेंस मिळाला मात्र तुंगभद्रेच्या पलीकडे शाहू महाराज व पेशव्यांच्या अनेक मोहिमा झाल्या. त्यामध्ये संभाजीराजेंनी सहभाग घेतला नाही. कलम तीन व चार पूर्णतः पाळले गेले. कलम पाचसुद्धा सामान्यतः पाळले गेले. कलम सहाप्रमाणे असणारा संभाजीराजेंचा मुलुख सोडून उर्वरीत काहीसा मुलुख शाहू महाराज व पेशव्यांनी जिंकून घेतला. त्यातील हिस्सा संभाजीराजेंना दिला नाही. कलम सात पूर्णतः पाळला गेला नाही. कलम आठ काही अंशी पाळला गेला. कलम नऊप्रमाणे मिरज, अथणी तासगाव वगैरे भाग संभाजीराजेंनी शाहू महाराजांच्या स्वाधीन केला नाही.

*१३ एप्रिल इ.स.१७३९*
सावंतांनी गोव्याच्या जनरलला पाठविलेल्या पत्राची नोंद!
         पोर्तुगिजांच्या संगनमताने सावंतांनी बार्देश व्यापिले होते, कारण मराठे बार्देश घेतील अशी भीती पोर्तुगिजांना वाटल्याने, पोर्तुगिजांनीच सावंतांना बार्देश घेण्यास सांगितले होते. ह्या संदर्भात जयराम सावंत व रामचंद्र सावंत या दोघांनी गोव्याच्या गव्हर्नर जनरलला पाठविलेले पत्र बोलके आहे. त्यात ते दोघे म्हणतात, "व्यंकटराव यांची फौज वरघाटी जाईस्तोवर बार्देश आम्हाकडे असावा, तद्नंतर ते तुमचे स्वाधीन करू".

  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
           जय गडकोट
       !! हर हर महादेव !!

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...