सह्याद्रीतील गड-कोटावर मारुतीराया चे स्थान*

🚩🚩 *जय हनुमान* 🚩🚩


*सह्याद्रीतील गड-कोटावर मारुतीराया चे स्थान*

        दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टीचे मैदान दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे.
उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्राला समांतर अशी ही श्रेणी पसरली  आहे. 
    सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्र्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. याला सह्य पर्वत असेही म्हणतात. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. सु. १५० द.ल. वर्षांपूर्वी गोंडवनभूमी या महाखंडाचे विभाजन झाले. त्यावेळी दख्खनच्या पठाराचेही विभाजन झाले असावे. त्यामुळे आजच्या पश्र्चिम किनारपट्टीला समांतर अशी विभंगरेषा निर्माण झाली असावी. या विभंगरेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे पठाराच्या पश्र्चिम कडेला उंची प्राप्त झाली असावी. भारतीय व्दिपकल्प पठाराची ही पश्र्चिम कडा म्हणजेच पश्र्चिम घाट होय.
     सह्याद्रीचे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे दोन भाग पडतात. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस निलगिरी पर्वत पुंजापर्यंतची श्रेणी उत्तर सह्याद्री व तेथून प्रामुख्याने पालघाट खिंडीपासूनची (खंड) दक्षिणेकडील पर्वतश्रेणी दक्षिण सह्याद्री म्हणून ओळखली जाते. पालघाट खिंडीमुळे सह्यादीची सलगता खंडित झाली आहे. उत्तर सह्याद्रीचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात येतो. महाराष्ट्रातील या पर्वतश्रेणीमुळे कोकण व देश (पश्र्चिम महाराष्ट्र) हे दोन स्वाभाविक विभाग अलग झाले आहेत.
   सह्याद्रीत काही ठिकाणी सपाट माथ्याचे, पठारासारखे भाग आढळतात, त्यांना घाटमाथा असे म्हणतात. येथपासून कोकण व देश यांना जोडणारे अनेक घाट सुरू होत असल्याने त्यांना ‘ घाटमाथा ’ असे संबोधले जात असावे.
    सह्याद्री च्या रांगेत अनेक गड-किल्ले येतात.
   हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला रायरेश्वर येथे  स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यामुळे या मंदिराला मराठा रियासतीच्या इतिहासात याला खूप पवित्र स्थान आहे.
    सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात छ. शिवाजी महाराजांनी २६ एप्रिल १६४५ या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती. सिंहाची छाती असणार्‍या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची आण घेतली.

      शिवकालीन महाराष्ट्राचं भौगोलिक, राजकीय वैशिष्टय़ असलेल्या गडकिल्ल्यांवरही मारुतीची आवर्जून स्थापना केलेली असल्याचं आढळतं.
महाराष्ट्र देश म्हणजे गड-किल्ल्यांचा देश. महाराष्ट्रात गिरिदुर्ग, वनदुर्ग, उदंड आहेत या गडकोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या व त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा शोधत असताना आपणास अनेक समाध्या व देवदेवतांची मंदिरे पाहावयास मिळतात. या देवांमध्ये दोन देवतांचे प्राबल्य आढळते. त्यातील एक देव आहे  शंभुमहादेव तर दुसरा देव आहे बजरंगबली अर्थात मारुती.
हा देव म्हणजे मूळचा प्राचीन यक्षकुळीचा वीर देव होय. गावांचा संरक्षक क्षेत्रपाल म्हणून जवळजवळ प्रत्येक गावात याची स्थापना केलेली आढळते. हनुमान महाकाय, शक्तिशाली, वज्रअंग व बलाढय़ असल्याने पृथ्वी, अंतरिक्ष, मेघमार्ग, स्वर्ग व उदक यांपैकी कोठेही त्याची गती कुंठित होत नाही. असुर, गंधर्व, नाग, मनुष्य, देवता, सागर आणि पर्वत हे सारे लोक या देवतेच्या परिचयाचे आहेत.
वायूप्रमाणेच हनुमानाची गती, तेज व त्वरा आहेत. त्यामुळे १६-१७ व्या शतकात मराठय़ांचे प्राबल्य असलेल्या गडांवर हनुमंताची मंदिरे वा घुमटय़ा स्थापन केलेल्या आपणास आढळतात. त्या वेळच्या रयतेच्या मनात मारुती शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारच्या भुतांचा अथवा शक्तींचा स्वामी आहे अशी दाट श्रद्धा होती.या श्रद्धेतून मराठय़ांनी गडावरील माचीच्या टोकाशी, गडावरील तळ्या टाक्यांच्या शेजारी, गडाच्या महाद्वाराच्या घुमटीत, बालेकिल्ल्यात मारुतीरायाची स्थापना केली. पुढे समर्थ रामदासांनी मारुतीच्या बहुजन समाजातील लोकप्रियतेचा फायदा घेऊन बजरंगबलीच्या निमित्ताने समाजात बलोपासना वाढावी म्हणून वीर मारुतीची उपासना सुरू केली.
 जनमानसात खोलवर रुजलेली अशी ही देवता  सर्वच स्तरांमध्ये दिसून येते.हनुमान हे एक लोकप्रिय दैवत आहे. उपदेवतांमध्ये त्याची गणना होत असते. श्रीरामाचा प्रमुख सेवक म्हणून तो ओळखला जातो. तो शक्ती, भूत, प्रेत, पिशाच्च यापासून सुटका करणारा मानला जातो. तंत्रात त्याला स्थान आहे. हनुमान, अंजनेय, महावीर, महाबली इत्यादी त्याची नावे  आहेत. गावोगावी आणि गावाबाहेर झाडाखाली आणि ओटय़ावर शेंदूरचर्चित अशी मारुतीची मूर्ती सामान्यत: महाराष्ट्रात सर्वदूर पाहायला मिळते. मारुतीचं महत्त्व लोकप्रिय करण्याचं काम उत्तरेत तुलसीदासांनी आणि दक्षिणेत समर्थ रामदासांनी केलं.
वाल्मीकी रामायण, महाभारत, पुराणे इत्यादी साहित्यग्रंथांतून मारुतीची माहिती उपलब्ध होते. पण प्रत्येक ग्रंथात त्याच्या मूर्तीचं वर्णन आलेलं असतंच असं नाही. हनुमानाचं वर्णन आलेलं असतं, त्याच्या जन्माच्या कथा आलेल्या असतात. अशा कथा सर्वसामान्यपणे आपणास माहीत असतात. त्याचे आई-वडील अंजनी आणि केसरी यांचा तो पुत्र. पण ही पुत्रप्राप्ती त्यांना वायूपासून किंवा शिवापासून झाली आहे अशी कल्पना आहे. त्याला हनुमान का म्हणायचे, तर इंद्राशी त्याची झटापट झाली, तेव्हा इंद्राचं वज्र हनुमानाच्या हनुवटीला लागून तुटलं असं मानलं जातं. भागवत पुराणात त्याला किन्नर म्हटलं आहे. शरीर मानवी आणि चेहरा माकडाचं म्हणून कदाचित असं म्हटलं गेलं असावं. त्याला ताम्रमुख असंही म्हटलं गेलं आहे कारण त्याचं तोंड तांबडं असावं अशी कल्पना आहे.मारुती हा मल्लयुद्धात, गदायुद्धात निष्णात होता. तो विज्ञान होता आणि संगीततज्ज्ञही होता असा पद्मपुराणात उल्लेख आहे. त्याच्या पराक्रमाच्या अनेक कथा आहेत. जन्मत:च तो सूर्यावर झडप घालतो अशीही कथा आहे. राम रावण युद्धात लक्ष्मणाला जीवदान देण्यासाठी त्याने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला अशीही कथा आहे. 
मारुतीच्या प्रतिमा नाण्यावरदेखील पाहता येतात. कलचुरी, चंडेल यांच्या नाण्यावर ११ व्या शतकात मारुतीचे अंकन झालेले आहे. पृथ्वीदेव कलचुरीच्या नाण्यावर चतुर्भुज, गदाधारी असा हनुमान आहे. यादवांच्या राजमुद्रेवर हनुमान तर  आहे. तसेच कदंब, होयसळ यांच्या राजचिन्हावर हनुमान आहे. विशेष म्हणजे अर्काटचा मुस्लिम राजा महमद अली वलजा यानेदेखील हनुमान चिन्हाचा उपयोग केला होता.
मूर्तीकलेत जो हनुमान पाहायला मिळतो तो इसवीसनाच्या पाचव्या-सहाव्या शतकानंतर मिळतो. 
गुप्त काळ आणि गुप्तनंतरच्या काळात दिसतो तो देवगड, नचनाकुठार, चौसा (बिहार) या ठिकाणी शिल्पांकित केलेल्या रामकथांमधून. पण पूजावह अशी मूर्ती आठव्या शतकात मिळते. ज्या मूर्तीची पूजा व्हायला लागली अशी मूर्ती तेव्हा प्रत्यक्षात आली. तो प्रतिहार राजांचा काळ आहे. म्हणजेच आठव्या शतकातला. इस ९२२ च्या खजुराहो येथील शिलालेखात मारुतीच्या मूर्तीचा उल्लेख आहे. नंतर मग वर उल्लेखलेल्या राजांच्या काळात नाण्यांवरील मूर्ती दिसते.
उत्तर मध्ययुगीन काळातील मूर्ती ११-१२ व्या शतकात दिसून येते. त्या काळातील मारुतीच्या मूर्तीच्या गळ्यात वनमाला आहे, क्वचित यज्ञोपवीत आहे, लांब गुंडाळलेलं शेपूट आहे आणि ही मूर्ती चपेटदान मुद्रा स्वरूपात आहे. चपेटदान मुद्रा म्हणजे हात उंचावलेला, चापट मारण्याच्या स्थितीतील मूर्ती. अशा मूर्तीच्या पायाखाली राक्षस असतो, तर काही ठिकाणी त्याच्या पायाशी राक्षसीणदेखील दिसून येते. याबद्दल असे म्हटले जाते की ती लंकेची ग्रामदेवता आहे. तिला मारून मारुतीने लंकेवर स्वारी केली. बंगालमध्ये, पन्हाळ्याच्या पायथ्याला, बीड येथे अशा मूर्ती आहेत. या राक्षसीणीला तिथे पनवती म्हणतात. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगालमध्ये साडेसातीला पनवती शब्द आहे. हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे ती राक्षसीण दाखवलेली आहे असे मानले जाते. वस्तुत: शनिवार आणि मारुतीचा काहीही संबंध नाही. पण मग शनिवारी का मारुतीची पूजा करतात, तर मारुती साडेसातीला पायाखाली ठेचतो, नियंत्रण करतो म्हणून त्याची पूजा केली जाते.
दक्षिणेला काही ठिकाणी मारुतीच्या शेपटीला लोणी लावतात. लंकादहनाच्या वेळी त्याचं शेपूट भाजलं असणार, तो दाह कमी व्हावा म्हणून लोणी लावण्याची प्रथा असावी असे मानले जाते. नाशिकला गंगाघाटावर राजेबहाद्दरांचं मारुतीचं देऊळ आहे. त्यात मारुतीच्या शेपटीत एका महिलेला गुंडाळलेलं दाखवलं आहे. ती हीच पनवती म्हणजे राक्षसीण.

मारुतीचे मूर्ती प्रकार
*वीर मारुती* – वीरासनात बसलेला, एक गुडघा जमिनीला टेकवलेला आणि एक उंच केलेला. पटकन उठता येईल अशा पोजमध्ये बसलेला असतो. त्याच्या हातात गदा असते.
*दास मारुती* – हात जोडून उभा असलेला. सेवेसी तत्पर असा दक्ष हनुमान.
*रामसेवक मारुती* –  दोन्ही खांद्यावर राम लक्ष्मणाला घेऊन निघालेला असतो. रामाची सेवा करतो म्हणून दास मारुती. कधी कधी केवळ रामच खांद्यावर असतो.
*मिश्र मूर्ती*– पाय जुळवलेले आणि हात जोडलेले, म्हणजे हा भक्त मारुती झाला. त्याला दोनच हात असले तरी त्याला धनुष्यबाण, ढाल, तलवार दाखवलेले असते. वीर आणि भक्त मारुतीची सांगड घालणारी ही मूर्ती.

*योगी मारुती – योगांजनेय (अंजनी + योगी)*
वार्ता विज्ञापन करणारा हनुमान – वार्ताहर हनुमान म्हटलं तरी चालेल. विमानअर्चनाकल्प ग्रंथाच्या २१ व्या अध्यायात याचा उल्लेख आहे. उजवा हात तोंडावर ठेवून, डाव्या हातात वस्त्राचा काठ धरून उभा असतो आणि श्रीरामाला बातमी सांगत असतो. गुप्तपणे एखादी बातमी सांगण्याचा जो आविर्भाव असतो तसा आविर्भाव या मूर्तीत असल्यामुळे तो तोंडावर हात ठेवून उभा असतो.
*वीणा पुस्तकधारी हनुमान* – मारुतीला संगीत आणि गायनाचीदेखील देवता मानले जाते.  मारुती चांगला संगीत-गायनतज्ज्ञ होता. या मूर्तीच्या उजव्या हातात वीणा आणि डाव्या हातात पोथी असते. हा दक्षिणेत आंध्रात पाहायला मिळतो. आंध्रात चतुर्भुज मारुतीची मूर्ती पाहायला मिळते.
*पंचमुखी मारुती* – हा महाराष्ट्रातदेखील अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. मुख्य तोंड वानराचे, सिंह, गरुड एका बाजूला आणि  दुसऱ्या बाजूला वराह आणि अश्व यांचे मुख असते. या संदर्भात एक कल्पना अशीही आहे की वैकुठांची मूर्ती आहे त्यालादेखील सिंह, वराह, अश्व, गरुड यांचे तोंड असते. मधले तोंड हे वासुदेवाचे असते. येथे वानराचे आहे. त्यामुळे यावरून या मूर्तीची संकल्पना घेतलेली असावी असा समज आहे.
      महाराष्ट्रातील मारुतीची देवळं सर्वसाधारणपणे लहान असतात. आंध्र आणि कर्नाटकात खूप मोठमोठी मंदिरं आहेतच, पण मारुतीची मूर्तीदेखील ५० फुटापर्यंत उंच असते. या मूर्तीना लिंबाचा हार घातला जातो. दक्षिणेत हनुमानाचा इतका प्रसार होण्यामागे आणि इतक्या भव्य मूर्ती असण्याचे ठोस असे कारण मिळत नाही. पण असा अंदाज मांडता येतो की मारुती हा दक्षिणेतला आहे. विजयनगरचे जे साम्राज्य होतं, त्यातील हंपीजवळ किष्किंधानगरी आजही दाखवली जाते. त्या ठिकाणी मारुतीची आणि रामाची भेट झाली असे वर्णन आहे. राम-लक्ष्मण जेव्हा सीतेच्या शोधात भटकत होते, तेव्हा वालीने त्या दोघांचा कानोसा घेण्यासाठी मारुतीला पाठवलं होतं. मारुती हा राजकारणचतुर असा होता. त्याची रामाची ती पहिली भेट. रामायणातील मारुतीचे सारं कथानक हे दक्षिणेतच घडलं आहे. त्यामुळे जेथे त्याने कर्तृत्व गाजवले तेथे त्याचा सन्मान होणं साहजिकच म्हणावं लागेल. उत्तरेत तुलसीदासांनी मारुतीला महत्त्व आणून दिलं. पण तेथील देवळंदेखील लहानच आहेत.
मारुतीच्या मूर्तीचं ठळक वैशिष्टय़ मूर्तीशास्त्रानुसार काय मांडता येईल, तर मारुतीच्या मूर्ती एक तर ती वानरमुखी असते, कमरेला गुंडाळलेलं शेपूट असतं. या दोन गोष्टी दुसरीकडे कोठेच येत नाहीत. त्याशिवाय वेगळं असं काही वैशिष्टय़ नाही. एखाद्या ठरावीक काळातील मूर्ती ही त्याच्या हातातील शस्त्राच्या काळानुसार ती मूर्तीचा काळ ठरवता येतो. म्हणजे जर त्याच्या कंबरेला जंबिया खुपसलेला असेल तर ती अकराव्या- बाराव्या शतकातील मूर्ती असे म्हणता येईल.
शेंदूर फासलेला मारुती ही प्रतिमा आपल्याकडे खोलवर रुजली आहे. शेंदुरचर्चित प्रथा कोठून आली, असा एक प्रश्न पडू शकतो. शेंदुराबाबत फार चर्चा करता येणार नाही. शेंदरामागे कारण असे असावे की मारुती, गणपती, देवीचे तांदळे आणि म्हसोबा यांचे केवळ दगड ठेवणं असं स्वरूप राहू नये. त्याला एक विशिष्ट स्वरूप यावं, एक रूप यावं म्हणून त्या काळी जो रंग उपलब्ध होता त्यापासून हे रूप प्राप्त झालं.
   मारुतीची मंदिरं स्थापन केली त्यापूर्वी मारुती होताच. पण साहित्य आणि शिल्पांमध्ये जेव्हा ते प्रकर्षांने जाणवायला लागते तेव्हाच ते लोकांपर्यंत पोहचते. समर्थानी त्याला बलोपासक म्हणून त्यावर भरपूर लिखाण केलंय. तसंच उत्तेरत तुलसीदासांनी भक्त मारुतीचं वर्णन केलं आहे.
आपल्या समाजात मारुतीचं स्थान अगदी सर्व स्तरांवर पोहचलेलं आहे. पण वेशीवरचा किंवा गावाबाहेरचा गावाचा रक्षणकर्ता मारुती यामागे नेमकं काय हे पाहावे लागेल. मूर्तिशास्त्रानुसार योग, भोग, वीर आणि अभिचारिक अशा चार प्रकारच्या मूर्ती असतात. त्यातील वीर प्रकारची मूर्ती असते ती मारुतीची, महिषासुरमर्दिनीची असते. गावाच्या रक्षणासाठी वीर प्रकारचीच मूर्ती असावी लागते.
थेट जनमानसात खोलवर रुजलेली अशी ही देवता आहे. तसाच तो सर्वच स्तरांमध्ये दिसून येतो. त्याची थोडक्यात कारणमीमांसा अशी आहे की, त्याला रुद्रावतारातील ११ वा रुद्र मानतात, त्यामुळे तो शैव झाला. रामपंचायतनातदेखील तो असतो, त्यामुळे तो वैष्णवांचादेखील आहे. गावाच्या बाहेर किंवा वेशीवर असल्यामुळे त्याला जातीपातीचे सोवळ्याओवळ्याचे काही बंधन नाही. शिवाय तो जनसामान्यांचा देव आहे. ज्यांना सामर्थ्य  प्राप्त व्हावं असे वाटत असते,  त्यांचा देखील तो देव आहे. तो गावाचा रक्षक असल्यामुळे सारेच त्याची पूजा करतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मारुतीची उपासना सर्वदूर पसरलेली आहे.

पुणे शहरातील  मारुतीची मजेशीर नावे व आख्यायिका.

*डुल्या मारुती:*
   पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या  या मंदिरात पेशवे नेहमी दर्शनास येत असत.या मंदिराला डुल्या मारुती नाव का पडले, या मागे एक आख्यायिका आहे.पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा दारूण पराभव झाला आणी या युद्धाच्या यातनेत मारुतीची मूर्ती जागेवरून कलंडली.तेव्हापासून लक्ष्मी रोड पुणे स्थित या मारुतीला डुल्या मारुती नावाने ओळखले जाते.
*पासोड्या मारुती:*
बुधवार पेठ येथील मंदिराच्या बाजूला ब्लँकेट, रग, चादर , घोंगड्या विकणारा बाजार असायचा.ऊब देणाऱ्या या वस्त्रांना पासोड्या म्हणत असल्याने येथील मारुतीला पासोड्या मारुती म्हणून ओळख पावला.

*भिकारदास मारुती :*
   सदाशिव पेठेत भिकारदास सराफ राहत असे , ते गरिबांना अन्न दान करीत असे.त्यांचा बंगला मंदिराच्या बाजूला च असल्याने त्यांच्या नावाच्या प्रित्यर्थ सदाशिव पेठ येथील मंदिराला भिकारदास मारुती नावाने ओळखले जाऊ लागले.
*बटाट्या मारुती:*
ब्रिटिशांच्या कालात या परिसरात बटाट्याचा मोठा बाजार भरला जायचा तेव्हापासून या मारुतीला बटाट्या मारुती म्हटले जाते.
*भांग्या मारुती :*
बुधवार पेठेत पेशव्यांच्या काळात या ठिकाणी भांग मोठ्या प्रमाणात विकली जायची , म्हणुन या मारुतीला भांग्या मारुती नाव पडले.
*पोटशुळ्या मारुती :*
इथे ऐकायला मिळणारी आख्यायिका अशी आहे आहे कि येथे मारुतीला नमस्कार केल्यास पोटदुखी थांबते , म्हणुन याला पोटशुळ्या मारुती म्हणतात.
*पत्र्या मारुती:*
 ब्रिटिश काळातील ससून रूग्णालय बांधणीच्या वेळी आणलेले छताचे काही पत्रे उरले.हे उरलेले पत्रे मारुती मंदिरा साठी वापरण्यात आले तो झाला पत्र्या मारुती.

*खरकट्या मारुती :*
तुळशीबागे जवळच्या या मंदिराच्या समोर भाविक आपल्या बरोबर आणलेली शिदोरी खात असतं.त्यामुळे या मारुतीला खरकट्या मारुती हे नाव पडले.


*जिलब्या मारुती :

शनिपाराकडून मंडई कडे जाताना हे मंदिर लागते.या भागात असलेला हलवाई या मारुतीला रोज एक जिलब्याचा हार घालत असे , तेव्हापासून या मारुतीला हे नाव पडले , व आजही रोज मारुतीला जिलबी चा नैवद्य दाखविला जातो.
*सोन्या मारुती:*
लक्ष्मी रस्त्यावर असणाऱ्या या मंदिरा शेजारी असणाऱ्या सोन्या-चांदीच्या दुकानांमुळे या मारुतीला सोन्या मारुती म्हटले जाते.
*विसावा मारुती :*
शास्त्री रस्त्यावर असलेल्या या मंदिराविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते. मुत  व्यक्तीला तिरडीतून अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात असताना लोकं इथं विश्रांती घेत म्हणुन या मारुतीला विसावा मारुती हे नाव पडले.
     आता आपण या लेखाच्या निमित्ताने  विविध  गडांवरील मारुतीरायाचे महत्व व त्या ठिकाणी मंदिरे किंवा मूर्ती ची स्थापना का केली असावी याची माहिती घेऊयात.
*राजगड:*
राजगड गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ किमी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही गड मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा गडाचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा गड  सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेला बालेकिल्ला म्हणजे पृथ्विनी स्वर्गावर केलेली स्वारी होय.
शिवछत्रपतींनी आपल्या आयुष्यातील तब्बल २५ वर्षांचा कालखंड राजगडावर घालविला. त्यामुळे इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीने राजगडचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. *या राजगडाच्या सुवेळा माचीवर हनुमंताची घुमटी आहे. तर संजीवनी माचीच्या तटावर मारुतीची मूर्ती कोरलेली आहे. राजगडावर जननीदेवी, पद्मावतीदेवी, ब्रह्मर्षी हे मुख्य देव आहेत. पण हे देव गडाच्या मध्यभागी असल्याने दूरवरच्या माचीच्या टोकावर पहारा देणाऱ्या मावळ्यांना रात्री-अपरात्री देवाचा आधार वाटावा म्हणून सुवेळा व संजीवनी माचीवर हनुमानाची स्थापना करण्यात आली.*

*रायगड:*
 रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्र सपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १६ व्या शतकात  याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर गड  हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे.या गडा चे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल१६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड गडाचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते.
    *रायगडावर नाना दरवाजात, हिरकणी बुरुजावर हनुमान टाक्यावर व जगदीश्वराच्या मंदिरात हनुमंताची मूर्ती आहे. जगदीश्वराच्या कूर्ममंडपातील विशालकाय मूर्ती ही शिवकालात स्वतंत्र मंदिरात होती. पण सिद्दीच्या अमलात हे मंदिर नष्ट झाल्याने ही मूर्ती कदाचित पेशवेकालात जगदीश्वराच्या मंदिरात आणून ठेवलेली असावी. पेशवे दप्तरातील कागदपत्रात मारुती जन्मसेवा पूर्वी या मूर्तीस लावण्यासाठी तेल व शेंदूर यांचा खर्च दाखविण्यात आला आहे. रायगडावरील दुसरा मारुती बाजारपेठेच्या शेजारील चांभार टाके किंवा हनुमान टाक्यावर खोदलेला आहे. शिवकाळात या टाक्यावर सकाळ-संध्याकाळ स्त्रिया पाणी भरण्यासाठी येत असत. त्या स्त्रियांनी पाणवठय़ावरील अनामिक दुष्ट शक्तींनी त्रास देऊ नये म्हणून अनिष्ट निवारण करणारा हनुमंत या टाक्यावर खोदण्यात आला आहे. रायगडावरील तिसरा मारुती हिरकणी बुरुजावर आहे. हा बुरुज गडावरील मानवी वस्तीपासून खूप लांबवर असल्याने येथे पहाऱ्यास असलेल्या सैनिकांना आधार वाटावा म्हणूनच त्याची येथे स्थापना करण्यात आली. याशिवाय नाना दरवाज्यात छोटी पण सुबक अशी हनुमंताची मूर्ती आहे. याच रायगडावर ३ एप्रिल १६८० ला हनुमान जयंतीच्या दिवशीच शिवरायांचे निधन झाले. आजही रायगडावर हनुमान जयंतीच्या दिवशी शिव- पुण्यतिथीचा कार्यक्रम होतो.*

*वसंत गड :*
कराड - चिपळूण रस्त्यावर अनेक गड आहेत. त्यापैकी वसंतगड हा  त्याच्या पायथ्याशी, तळबीड गावात असलेल्या सेनापती हंबीरराव मोहीते यांच्या समाधीमुळे प्रसिध्द आहे. 
या गडा ची बांधणी १२ व्या शतकात शिलाघर राजा भोज याने केली. इ.स. १६५९ मध्ये शिवरायांनी गड  स्वराज्यात आणला. गडाजवळच मसुरला सुलतानजी जगदाळे रहात होता. अफजलखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी जगदाळे त्यास जाऊन मिळाला. अफजल वधानंतर मराठ्यांनी अचानक छापा घालून जगदाळेस पकडून वसंतगडावर आणले व त्याचा शिरच्छेद केला. पुढे जिंजीहून परतल्यावर राजाराम महाराज काही दिवस या गडा वर मुक्कामाला होते. २५ नोव्हेंबर १६९९ रोजी औरंगजेबाने हा गड जिंकला  व त्याचे नाव ठेवले ‘किली द फतेह’ म्हणजे यशाची किल्ली असे ठेवले. नंतर १७०६ मध्ये मराठ्यांनी परत हा गड  जिंकला. इ.स. १८१८ मध्ये वसंतगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. 
तळबीड गावातून गडावर जाणार्‍या पायवाटेने गड माथ्यावर प्रवेश करतांना भग्न अवस्थेतील उत्तराभिमुख प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या तटबंदित गणेशाची सुबक मुर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या कातळात कोरलेल्य पायर्‍य़ा चढून गेल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होते. गडमाथा प्रचंड मोठा आहे त्यामुळे गडावरील सर्व अवशेष व्यवस्थित पाहाण्यासाठी तटबंदीवरुन गडाला संपूर्ण फ़ेरी मारावी त्यानंतर किल्ल्याच्या मधल्या भागातील अवशेष पाहावेत.
*प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश केल्यावर डावीकडची वाट धरावी, समोरच मोठे हनुमानाचे मंदिर आहे.* त्याच्या पुढे एक विहीर आहे. हे पाहून तटबंदीच्या दिशेने जावे. गडाची तटबंदी आणि बुरुज बर्‍यापैकी शाबूत आहेत. तटबंदीवरुन पुढे गेल्यावर एक भव्य बुरुज दोसतो. या बुरुजावर चढण्यासाठी पायर्‍य आहेत. बुरुजावरुन किल्ल्यच्या बाहेर आ्णि आत दोन्ही ठिकाणी लक्ष ठेवता येते. बुरुजा जवळ एक कातळात कोरलेले टाक आहे. थोडे पुढे चालत गेल्यावर तटबंदीतील शौचकुप पाहायला मिळते. तटबंदीवरुन पुढे गेल्यावर आपण गडाच्या दक्षिण टोकावरील बुरुजापाशी पोहोचतो. बुरुजावरुन दुरवरचा परिसर दृष्टीक्षेपात येतो. 
*ढवळ गड :*
महाराष्ट्राची ओळखच मुळात गडकोटांचा प्रदेश अशी आहे. तरीही असे कितीतरी गडकोट आहेत जे अजून काळाच्या पडद्याआड विस्मृतीत गेले आहेत. असाच एक गड म्हणजे 'ढवळगड'.
गडावर ढवळेश्वर सुप्रसिद्ध मंदिर आहे. तसेच तटबंदी, ढासळलेला दरवाजा, पाण्याच्या 4 टाक्या, चुन्याचा घाना, मेटाचे अवशेष शिल्लक आहेत. अशा या गडावर जाण्यासाठी दोन मार्ग असून त्यातला पहिला मार्ग सासवडहून चौफुला गावापासून वाघापूर ते आंबळे असा आहे. तर आंबळे गावातून गडाच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. दुसरा मार्ग पुणे-सोलापूर मार्गावरील उरुळीकांचन येथून असून डाळिंब गावातून ट्रेकिंग करत जावे लागते.
पुरंदर तालुक्यात सासवड घाटरस्त्याचे रक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे 'ढवळगड.' या गडाला फारसा इतिहास नसल्याने अनेक वर्षे इतिहासकार आणि किल्लेप्रेमींकडून तो दुर्लक्षितच राहिला.
घाटमार्गावर गस्त ठेवण्यासाठी या किल्ल्याचा प्रामुख्याने वापर केला जात होता. या किल्ल्याप्रमाणेच मल्हारगड. भुलेश्वरच्या डोंगरावर असलेला दौलतमंगळ हे किल्लेही शिवकाळात गस्त ठेवण्यासाठी प्रामुख्याने वापरले जात होते. अशी इतिहासात नोंद आहे.
   पेशव्यांचे घोडदळाचे सरदार दरेकर यांचा वाडा येथे पहाता येतो. कच्च्या रस्त्याच्या शेवटी आपली गाडी जिथे थांबते तिथे एक पाण्यासाठी खोदलेली कुपनलिका असुन या कुपनलीकेच्या वरील बाजूस एक बांधकामाचा चुना मळण्याचा घाणा दिसुन येतो. या घाण्याचे चाक मात्र येथे नाही. या घाण्याशेजारी एका वास्तुचे अवशेष दिसुन येतात. येथुन ढवळगडाचा आज शिल्लक असलेला एकमेव बुरुज व तटबंदी तसेच त्याखाली असलेली माची नजरेस पडते. बुरुजाच्या वरील बाजुस काही प्रमाणात विटांचे बांधकाम केलेले आहे. *येथुन पायवाटेने पुढे आल्यावर एका बांधीव चौथऱ्यावर हनुमान मुर्ती दिसुन येते. या मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे एकाचा दगडावर दोन बाजुला दोन मुर्त्या कोरल्या असुन जणु या मुर्त्या येणाऱ्या जाणाऱ्यावर लक्ष ठेवत असाव्या.* चौथऱ्याच्या पुढील भागात गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तटबंदी उजवीकडे ठेवत या पायऱ्या गडाच्या दरवाजात येतात. या वाटेत डावीकडे वळणावर एका घुमटीत गणपतीची मुर्ती दिसुन येते. दरवाजा समोर गडाची माची वाटावी असे लहान पठार असुन त्यावर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. दरवाजाची अर्धवट कमान आजही शिल्लक असुन या कमानीत दगडी बिजागर व अडसर घालण्याची जागा दिसुन येते.
*पुरंदर:*
सह्याद्रीच्या पुरंदर गडावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे.हे या गडाचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे . दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगडआहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट किंवा बापदेव घाट किंवा दिवे घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. गडाच्या चौफेर माच्या आहेत. गड  पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर,  तर सासवडच्या नैर्‌ऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे.
पुरंदर गड तसा विस्ताराने मोठा आहे. गड मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.
    पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे 'इंद्रनील पर्वत'. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत.
   वज्रगडावरील मारुती  शंभूराजांचे जन्मस्थान असणाऱ्या पुरंदर गडाच्या बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजाबाहेर हनुमंताची घुमटी आहे. अत्यंत देखण्या अशा मूर्तीच्या डाव्या पायाखाली राक्षस असून मारुतीच्या डाव्या हातात खंजीर आहे. ‘पुच्छ ते मुरडिले माथा’ या न्यायाने हनुमंताची भली मोठी गुंडाळलेली शेपूट या मूर्तीच्या  मागे आहे.
याशिवाय पुरंदरचा जोडकिल्ला असणाऱ्या वज्रगड ऊर्फ रुद्रमाळ या गडावरही मारुतीरायाची एक छोटी मूर्ती आपणास पाहायला मिळते.

*दातेगड:*
पाटण जवळील दातेगड हा गड प्रेक्षणीय असून देखील उपेक्षित राहिलेला आहे. चारी बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्गवैशिष्ट्य म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केल्या आहेत.
 दातेगडास शिवाजी महाराजांच्या काळात सुंदरगड असेही नाव होते. दातेगडावरील खडकात खोदलेली विहीर व टाकी यावरून हा गड पूर्व काळातला असल्याचे स्पष्ट होते. गडावर शिवाजी महाराज स्थापित कचेरी व कायमची शिबंदी होती. या शिबंदीकरता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देण्यात आल्या होत्या. पुढे हा गड  काही काळ मोगलांच्या अधिपत्याखाली होता. मे १८१८ मध्ये कॅप्टन ग्रॅट याने हा गड  न लढताच जिंकला.
    सातारा जिल्ह्यतील पाटण तालुक्यात असणारा हा गड फारसा कोणास माहीत नाही. या गडाचे सुंदर स्थान पाहून खुद्द शिवरायांनी या गडाचे नामकरण केले ‘सुंदरगड’. *या गडाच्या प्रवेशद्वारा शेजारचे खडकात खोदलेले मारुतीचे उठावदार शिल्प महाराष्ट्रातील गडावरील सुंदर मारुती शिल्पांपैकी एक आहे. डोक्यावर मुकुट, कमरेला कमरपट्टा, हातापायात तोडे, गळ्यात माळ व डोक्यावरून वळवलेली शेपूट असे या मारुतीचे देखणे शिल्प आहे. पाटणापासून चालत दीड तासावर हा गड असून येथील मारुतीची, गणपतीची मूर्ती दुर्गप्रेमींनी आवर्जून पाहावी.*

*विशाळगड:*
  विशाळगडाची उभारणी इ.स. १०५८ मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. हा गड *किल्ले खेळणा* या नावाने देखील ओळखला जातो. साधारण इ.स.१४५३ च्या सुमारास बहामनी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला. हा सरदार म्हणजे मलिक उत्तुजार होय, त्याने प्रथम पन्हाळा गडावरील शिर्क्यांना जेरीस आणले. शिर्क्यांनी मलिक उत्तुजाराला विशाळगडाचे आमिष दाखवले. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलिक उत्तुजारची सात हजाराची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलिक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेल्या मलिक उत्तुजारला सात हजार सैन्यासकट त्यांच्या आक्रमणापासून मुक्त केला. या सैन्यातील एक सरदार मलिक रैहान होता. त्याचीच कबर विशाळगडावर आहे असे जाणकारांचे मत आहे.
पुढे शिवाजी महाराजांनी इ.स. १६५९मध्ये हा गड  जिंकला व याला विशाळगड हे नाव ठेवले. हा गड  मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार आहे. आदिलशाही सरदार सिद्दी जौहर याने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून शिवाजी राजांनी करून घेतलेल्या सुटकेमुळे या गडा चे नाव अजरामर झाले. आणि यासाठी अवघे ३०० मावळे घेऊन आठ तासांहूनी अधिक काळ हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणारे वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमामुळे या गडाचे नाव झाले. पुढे शिवाजी राजांचा मृत्यूनंतर संभाजीराजांनी विशाळगडावर बराचसा काळ व्यतीत केला.
    *विशाळगडावर मारुतीटेक नावाची टेकडीच असून या टेकडीवर हनुमंताचे भक्कम दगडी मंदिर उभे आहे. गडाच्या दक्षिण टेपावरील मारुतीचे हे मंदिर अनिष्ट निवारणासाठी सीमारक्षक देवतेच्या स्वरूपात बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात आपणास शेंदूर फासलेली पाच फूट उंचीची मूर्ती पाहायला मिळते. विशाळगडावर वेताळ टेकडी नावाचीही एक टेकडी असून पूर्वीच्या काळी दर अमावस्येला वेताळ टेकडीहून मारुती मंदिरापर्यंत वेताळची पालखी काढली जात असे.*
*पन्हाळा:*
   पन्हाळ्याला साधारण १,२०० वर्षांचा इतिहास आहे.हा गड  प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा गड  पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव पन्नग्नालय होते. 
    २ मार्च १६६० ला गडास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० मावळ्यांना बरोबर घेऊन  पन्हाळयावरून विशाळगडाकडे निसटले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी महाराज बनून व बाजी प्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले.
१६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी परत गड ताब्यात घेतला. पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर १८४४ मध्ये गड  इंग्रजांच्या ताब्यात गेला.
   पन्हाळगडावर मारुतीच्या खूप मूर्ती असून त्यातील पहिले मंदिर तीन दरवाजांतून आत आल्यावर लागते. या छोटय़ा मंदिरातील मारुतीची मूर्ती सुंदर असून मूर्तीवर दगडी प्रभावळ व मध्यभागी व्यालमुखे कोरण्यात आलेली दिसते. पन्हाळगडावरील हुजूर गल्लीच्या कोपऱ्यावर दुर्मीळ असे पंचमुखी हनुमान मंदिर आपणास पाहायला मिळते. ताराराणीच्या वाडय़ाच्या मागेही इतिहासकालीन हनुमंताचे मंदिर आहे. याशिवाय चार दरवाजाच्या खाली एका मोठय़ा शिळेवर खालच्या बाजूला एक शिलालेख कोरण्यात आला आहे. ही मूर्ती मूळची चार दरवाजातील असावी. पण १८४४ मध्ये इंग्रजांनी चार दरवाजा तोडल्यानंतर ही मूर्ती या ठिकाणी आली असावी. तीन दरवाजातून बाहेर पडून सोमवार पेठेकडे जात असताना उजव्या हाताला पन्हाळगडाच्या डोंगरात एक सुंदर मारुतीची मूर्ती असून या मूर्तीच्या अवतीभोवतीच्या शिळा पाहण्यासारख्या आहेत. वरील मूर्तीशिवाय पन्हाळगडावर इतरत्रही छोटय़ा-मोठय़ा मारुतीच्या मूर्ती आपणास अभ्यासता येतात.
*तिकोना/वितंडगड*
पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी अंतरावर असणारा हा गड  समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. तुंग गड हा  ३-४ कि.मी अंतरावर दिसतो. गडाच्या या त्रिकोनी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले आहे.         गडाचा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहायाने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नर चा बराचसा प्रांत काबीज केला,  त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग  व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा गड  जिंकुन निजामशाहीत आणला. इ.स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी हा गड  जिंकून  परत स्वराज्यात आणला. पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तहात' शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक गड. नेताजी पालकर कडे काही दिवस गडाची जबाबदारी होती.
     हा गड पुणे जिल्हय़ातील  वडगाव मावळ तालुक्यात वसलेला मोठा तालेवार गड होय. *या गडाच्या बालेकिल्ल्याला जाताना डाव्या हातास भव्य या शब्दाला साजेशी अशी बलदंड हनुमंताची मूर्ती आपणास पाहायला मिळतो. ही मूर्ती अतिशय आखिव-रेखीव असल्याने हीची भव्यता पाहणाऱ्याच्या डोळ्यात भरते. तिकोना गडावर तळजाई देवीचे लेणी मंदिर, बालेकिल्ल्यावरील महादेव मंदिर अशी अनेक दैवते आहेत, पण सर्वाच्या लक्षात राहतो तो येथील बलदंड बजरंगबली.*

*विसापूर:*
    गड विसापूर म्हणजे पवन मावळच्या संरक्षक दुर्ग चौकडीपैकी एक. चौकडीमध्ये आकाराने सर्वात मोठा आणि सर्वात उंच असा हा विसापूर गड  चहूबाजूंनी कातळकडय़ांचे नैसर्गिक  संरक्षण असलेला पुराणपुरुष आहे. लोहगडपेक्षा उंचीला आणि आकाराला सुद्धा तसा मोठा पण तितका प्रसिद्ध नसलेला हा गड . गडा वर प्रशस्त पठार आहे, हीच खरी या गडाची खासियत आहे. या गडाला आगळीवेगळी, अद्वितीय आणि आजही अखंडित असलेली अशी तटबंदी आहे. विसापूरचा हा तट म्हणजे निष्ठेचा एकेक दगड चढवत विणलेला जणू भरजरी शेलाच आहे. मावळ तालुक्यामधला एक भरभक्कम गड. अगदी लोहगडच्या शेजारी वसलेला, ३०३८ फूट उंचीचा हा गड  गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा गड  ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. नव्या ट्रेकर्सना ट्रेकिंगची सुरुवात करण्यास हा गड  अगदी योग्य आहे.
मराठय़ांच्या इतिहासात लोहगड विसापूर या दुर्गजोडीस विशेष स्थान आहे. यातील लोहगडावर खूप दुर्गप्रेमी जात- येत असतात. पण विसापूर गडावर फारसे कोणी जात नाहीत. *विसापूर गडावर हनुमंताच्या अनेक मूर्ती असून प्रत्येक मूर्ती वेगवेगळी आहे. यातील पहिली मूर्ती गडवाटेवर असणाऱ्या धान्यकोठाराच्या गुहेच्या बाहेरील कातळावर कोरलेली आहे. या हनुमान मूर्तीस शेंडी असून विशेष म्हणजे या शेंडीस गाठ मारलेली आहे. या मारुतीच्या हातात मराठय़ांचे ‘भाला’ हे शस्त्र आहे. संपूर्णपणे शेंदूर फासलेल्या या मारुतीच्या सभोवतीने दगडी महिरप कोरण्यात आली आहे. दुसरा हनुमान एका पाण्याच्या टाक्यावर असून याच्या हातात फूल आहे. या मूर्तीच्या डाव्या-उजव्या बाजूला शंख, चक्र  कोरण्यात आले आहे. या दोन मूर्तीशिवाय गडावर अनेक छोटय़ा-मोठय़ा मारुतीच्या मूर्ती आपणास पाहायला मिळतात.*

*रसाळगड:*
    सह्याद्रीची रांग उत्तर-दक्षिण पसरलेली आहे. मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा पाच पंचवीस मैल लांबवर पसरलेल्या आहेत. पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे जाताना रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे तीन दुर्ग आपले लक्ष वेधून घेतात. हे सर्व गड  जावळीच्या खोर्‍यातच येतात. प्रतापगड, मधुमकरंद गड, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड हा ट्रेकही खूप प्रसिद्ध आहे.
रसाळगडाचा घेरा लहानच असल्याने संपूर्ण गडफेरीस एक ते दीड तास लागतो. रसाळवाडीतून गडा वर शिरतानाच वाटेत दोन दरवाजे लागतात. पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच तटातील मारुतीचे दर्शन होते. वळसा मारून आपण गडा च्या दुसर्‍या दरवाजात पोहोचतो. या दरवाजातून गडात प्रवेश केल्यावर समोरच तटावर एक भली मोठी तोफ दिसते.
संपूर्ण गडाचा माथा म्हणजे एक पठारच होय. समोरच झोलाई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. कोनाड्यात अनेक सापडलेल्या मूर्त्या ठेवल्या आहेत. मंदिराच्या समोर दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे. समोरच एक तोफ सुद्धा ठेवलेली आहे. मंदिराच्या बाजूला पाण्याचा मोठा तलाव आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला शिवाचे छोटेसे मंदिर आहे. पाण्याच्या टाक्याच्या वरच्या भागाला थोडासा उंचवटा आहे , यालाच बालेकिल्ला म्हणतात. यात वाड्यांचे मोठ्या प्रमाणावर अवशेष आहेत. बुरूजावर तोफा आढळतात. येथून समोरच एक दगडी बांधकाम असलेली खोली आढळते. हे धान्य 
कोठार असावे असे वाटते. बालेकिल्ल्याच्या जवळच आणखी एक पाण्याचा तलाव आहे. या दोन्ही तलावात बारामही पाणी असते. गडाच्या नैऋत्य भागात एक नंदी आहे. मात्र येथे शिवाची पिंड आढळत नाही. गडावर पाण्याची टाकी मोठ्या प्रमाणावर आहेत, म्हणजे हा गड  पूर्वी मोठ्या प्रमाणावर नांदता असावा.
 रसाळगड हा गिरिदुर्ग  १७०० फूट उंच आहे. रसाळगड हेच नाव का दिले असावे याचे पुरावे मात्र कुठेच सापडत नाहीत.जावळीच खोर म्हणजे इतिहासात प्रसिद्ध असा याच खोर्यातील हा एक गड  आहे.शिलाहार,बहामनी, अंग्रे,मराठे,पेशवे या सगळ्याच राजवटींचा रसाळगड हा मूर्तिमंत साक्षीदार आहे. गडाचा वैशिष्ट्य म्हणजे तोफा आणि पाण्याचे टाके.साधारणपणे १९ तोफा आपल्याला गडा च्या माथ्यावर विविध बुरुजांवर पाहायला मिळतात.तोफांवर विशिष्ट  पद्धतीचे अंक कोरलेले असतात त्याचा आशय अस आहे कि, कोणत्या आकाराचा दारुगोळा यात भरवायचा असून त्या तोफेचा मारा किती अंतरापर्यंत आहे.लहान मोठ्या अशा बर्याच तोफा गडावर आहेत. सतीगळ, विरगळ सुद्धा  आपल्याला या गडावर पहावयास मिळतात.
महाराष्ट्रात असणारी एकमेव स्वीवेल गन ( बंदूक) येथे पाहायला  मिळाली. लांबसडक हि गन एकमेव असून ती रसाळगडावर जतन करून ठेवली आहे.बरेच बंदुकीचे छर्रे, गोळ्या, तोफगोळे पुरातत्व खात्याने रातानागिरी येतील संग्रहालय संग्रही ठेवले आहेत. या गडावर लढाया अशा झाल्या नसल्या तरी टेहळनिसाठी आणि व्यापार मार्गावर लक्ष देण्यासाठी गडाचा वापर हा होत असे.
    खेडजवळील रसाळगड म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामांकित गड होय. या गडाचे पहिले प्रवेशद्वार पार केल्यानंतर डाव्या हातास एक दगडी घुमटी लागते. या घुमटीतील हनुमंताचे खास वैशिष्टय़ म्हणजे या हनुमंतास चक्क पिळदार मिशांची कंगले कोरण्यात आली आहेत. सहसा हनुमंताच्या मूर्तीस मिशा कोरलेल्या नसतात. पण येथे चक्क हनुमंतास मिशा कोरल्याने पाहणाऱ्यास गंमत वाटते.
          *प्रत्येक गडांवर हनुमानच का तर तो शक्तीचं प्रतीक आहे !*
    मारुती नुसते नाव जरी घेतली तरी मावळ्यांच्या त एक विलक्षण शक्ती संचारत असे.रात्री अपरात्री मावळे गडांवर पहारा देत असे , तेव्हा मारुती चे दर्शन घडले कि त्यांच्या मनात भीती राहत नसे.
हनुमानाला मारुती, महावीर, बजरंगबली, अंजनेय, महारुद्र, पवनपुत्र अशा अनेक नावांनी संबोधिले जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक गडावर कमीत कमी ५० तर जास्तीत जास्त २००० चे सैन्य असे. हे सैन्य ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अष्टौप्रहर डोळ्यात तेल घालून पहारा देत असे. रात्री-अपरात्री गडावर वावरणाऱ्या या मावळ्यांना तथाकथित भुताखेतांपासून संरक्षणासाठी हनुमंताचा मोठा आधार वाटायचा. गावोगावच्या वेशींचे रक्षण करणारा हा देव आपले गडावरही रक्षण करेल, अशी त्यांची गाढ श्रद्धा होती.

 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४