आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

📜 १९ एप्रिल इ.स.१६७३
छत्रपती शिवाजी महाराजांची  हुबळीवर स्वारी
अली आदिलशहा २४ नोव्हेंवर १६७२ रोजी मरण पावला. त्याचा सात वर्षांचा मुलगा सिकंदर आदिलशहा गादीवर आला. तेव्हा विजापूरचा सरदार रुस्तुम जमान याने त्याच वर्षी बंड केले. विजापूरच्या अंतर्गत गोंधळाचा फायदा घेऊन महाराजांनी विजापूर राज्यावर १६७३ मध्ये आक्रमण केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १९ एप्रिल इ.स.१६८०
(वैशाख शुद्ध प्रतिपदा, शके १६०२, संवत्सर रौद्र, वार सोमवार)

पन्हाळगडावर असंख्य सैन्याची छत्रपती संभाजी महाराजांकडे धाव! 
          महाराजांच्या निधनाची बातमी गुप्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला असला तरी इतकी संवेदनशील बातमी गुप्त राहणे शक्यच नव्हते? शंभुराजेंचेही हेर खाते प्रबळच होते. त्यामुळे कर्णोपकर्णी ही बातमी शंभुराजेंना समजली. इतकच नव्हे तर म्रुत्यूसमयी महाराजांच्या जवळ फारशी मातबर असामी नसून महाराजांचे अंतिम संस्कार साबाजी भोसले यांच्याकडून केल्याचेही कळले! महाराजांच्या महानिर्वाणाच्या बातमीनंतर शंभुराजेंना अतीव दुःख झाले याची कल्पना फक्त "तो काळ" करू शकतो! शंभुराजेंनी किल्ले पन्हाळ्यावरच महाराजांचे श्राद्ध आटोपले आणि शंभुराजेंना दुसरी बातमी समजली की, प्रधान मंडळातील काही जणांनी राजारामराजेंना गादीवर बसवून कारभार करण्याचा निर्णय घेतला आहे! मात्र प्रजेमध्ये आणि सैन्यामध्ये शंभुराजे प्रचंड लोकप्रिय असून निसर्ग न्यायानुसार महाराजांच्या नंतर राजगादीवर शंभुराजेंचाच हक्क असल्याने किल्ले पन्हाळ्यावरचे असंख्य सैन्य शंभुराजेंकडे धाव घेत होते. आता शंभुराजेंनी आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी योग्य ती पावले टाकली!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १९ एप्रिल इ.स.१७३६
 मराठे सरदारांमध्ये एकोपा नसल्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्दीचा पाडाव लांबणीवर पडला. त्यामुळे चिपळूण मधील ब्रह्मेद्रस्वामींचे हबशास जिंकण्याचे टुमणे छत्रपती शाहू महाराजांस सतत जाचू लागले. गोवळकोट आणि अंजनवेल काबीज केल्याशिवाय सिद्दी सात शरण येणार नाही व चिपळूणच्या परशुराम क्षेत्राची झालेली हानी भरून येणार नाही हे शाहू महाराजास ठाऊक होते. पण शाहू छत्रपतींच्या हुकूमाने संभाजी आंग्रे यांनी जंजिऱ्याची मोहिम तशीच चालू ठेविली. दरम्यान सिद्दी सातास
फितविण्याचाही उपक्रम शाहू छत्रपती व स्वामी यांनी आपआपल्यापरी चालविला. पण संभाजी व मानाजी आंग्रे या आंग्रे बंधूंच्या तंट्यामुळे जंजिऱ्यावरील मोहिमेचा परिणाम निष्फल होत होता. शाहू छत्रपतींनी उदाजी पवार व पिलाजी जाधव यांस कोंकणात पाठविले. पिलाजींनी बाणकोट फत्ते करून पुढे गोवळकोट व अंजनवेलवर चाल केली. या आक्रमणास आळा घालण्याचा सिद्दी सातने चंग बांधला. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी चिमाजी आप्पांस मुद्दाम शाहू छत्रपतींनी कोंकणात पाठविले. मानाजी आंग्र्यांनी चिमाजीस साथ दिली. चिमाजी २० मार्च १७३६ रोजी कोंकणात गेले. रेवास नजीक कामारले तर्फ श्रीगांव येथे सिद्दीची व मराठ्यांची लढाई झाली. तीत सिद्दीचे १,३०० व मराठ्यांकडील ८०० लोक पडले. सिद्दी सात स्वतः कामास आला. “राज्य घेईन, नाहीतर मरून जाईन" अशा निकराने सिद्दीसात लढला. त्यास पळून जाण्याची संधी दिली असता त्याने तसे न करता तो लढला व समरांगणी पडला (१९ एप्रिल १७३६). उंदेरीचा किल्लेदार सिद्दी याकूबही वरील लढाईत मारला गेला. या विजयाने मराठा मंडळास मोठा आनंद झाला. हबशांचे दोन प्रबळ सरदार पडल्यामुळे दुसऱ्या पक्षाचा प्रमुख सीद्दी रहमान याने पेशव्यांशी पूर्वीचा तह कायम करून युद्ध थांबविले. अंजनवेल व गोवलकोट ही स्थळें तूर्त हबशांकडे राहिली.  पैकी अंजनवेल तुळाजी आंग्र्यांनी २३ जानेवारी १७४५ रोजी काबीज केली व लगेच गोवळकोटही घेतले. परशुराम क्षेत्राजवळचा हा किल्ला कबजात आलेला पहाण्याचे भाग्य ब्रह्मद्रस्वामीस लाभले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १९ एप्रिल इ.स.१७९७
रायगडावरील शिवछत्रपतींच्या सिंहासनाचा गलेफ तयार केला
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही रायगडच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची आणि गौरवशाली घटना आणि शिवछत्रपतींच्या तख्ताची म्हणजे सिंहासनाची जागा ही रायगडावरील सर्वात महत्त्वाची आणि पूजनीय जागा. दिनांक ६ जून १६७४ रोजी रायगडावर महाराज सिंहासनाधिश्वर झालें. पुढें इ.स. १६८९ मध्यें रायगड मोगलांच्या ताब्यात गेला. नंतर १७३३ मध्यें रायगड श्रीपतराव पंतप्रतिनिधींच्या करवीं छत्रपती शाहू महाराजांकडे आला. तेव्हा पासून रायगडावरील सिंहासनाची व्यवस्था चालू झाली. इ.स. १७३५ पासून १७७२ पर्यंत रायगड तालुका हुजूरचा प्रदेश होता. शत्रूने स्वारी केल्यावर, त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी पेशव्यांची होती; पण कारभारी नेमणे, तालुक्याचे जमाखर्च पाहणे वगैरे गोष्टींबाबत पेशव्यांस अधिकार नव्हता. शाहू महाराजांनी या तालुक्याचा कारभार यशवंत महादेव यांकडे दिला होता.
छत्रपतींची राजधानी रायगडाहून हलल्यामुळे रायगडाचे राजकीय महत्व कमी झाले होते. मात्र तरीही रायगडाची व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे ठेवलेली होती. शिवकालीन दप्तरातील अनेक तत्कालीन कागदपत्रें याची पुष्टी देतात. ह्या कागदपत्रांत शिवछत्रपतींच्या सिंहासनाची जी व्यवस्था आढळतें ती कौतुकास्पद आणि जाणून घेण्यासारखीच आहे.
 इ.स.१७७३ मध्यें पेशव्यांनी सिंहासनाबाबत काही गोष्टी आणि रिवाज कायमचे ठरवून टाकले. सिंहासनास चार खांब होते. सिंहासन गजनी, किनखाप, ताफता अश्या बहुमूल्य कापडाने आच्छादिले जात असे. १६ मार्च १७७३ रोजीचा सिंहासनाच्या कापडाच्या खर्चाचा हिशेब उपलब्ध आहे. एकूण १६०८ रुपयांचे कापड २२८ रु. गजनी, २२० रु. ताफता, ८१२ रु. किनखाप, १६ रु. खारवे आणि ३३२ रु.ची मखमल अशा प्रकारे खर्ची पडले. सिंहासनाच्या बैठकीचा भाग व तलाव्याचा भाग यांस कापडण्यासाठी हा खर्च पडला. खर्चास सरकारी मंजुरी मिळत असे. त्यानंतर बारा वर्षांनी हा सगळा वस्त्रसंभार जीर्ण झाल्यामुळे इ.स. १७८६-८७ मध्ये पुन्हा याच स्वरूपाचा खर्च झाला. नंतर १९ एप्रिल १७९७ रोजी पुन्हा सिंहासनाचा गलेफ तयार केला. यावेळी सिंहासनाच्या खांबास लाल मखमल वापरली होती. इ.स. १७९७ मध्ये सिंहासनास २७३८ रुपयांचे कापड खर्ची पडले. त्या कापडाचा तपशील असा, १३९८ रु.चे किनखाप, ५३८ रु. गजनी, २०८ रु. ताफता, २५ रु. खारवा व ५७० रु.ची मखमल. हे कापड किती लांबीरुंदीचे लागले हेही गजवार दिले असल्यामुळे त्यावरून सिंहासनाची लांबीरुंदी अजमावता येते आणि ती आज सिंहासन म्हणून असलेल्या स्थलाच्या मोजमापाशी जमते. कागदपत्रांत सिंहासनाच्या कापडाची लांबी ५ गज ४ तसू (अदमासे १५ फूट २ इंच) व रुंदी ४ गज ४ तसू (अदमासे १२ फूट) दिलेली आहे. प्रत्यक्षात सिंहासनाच्या चौथऱ्याची लांबी १३ फूट व रुंदी १२ फूट आहे. अर्थात कागदांतील कापड अधिक आहे. पण ते सिंहासनावर घालायचे कापड आहे त्यामुळे ते साहजिकच सिंहासनापेक्षा मोठेच असणार. यामुळे सिंहासनाच्या चौथऱ्याची स्थाननिश्चिती होते.
   'सिंहासन' आणि 'तख्त' ह्या दोन वेगवेगळ्या संज्ञा होय. सिंहासन म्हणजे तेरा फूट लांब व बारा फूट रुंद असा ओटा, आणि तख्त म्हणजे त्या ओट्यावरील राजाने स्वतः बसावयाचे आसन. ह्या आसनावर शेला आणि गलेफ अशी दोन प्रकारची वस्त्रें घातली जायची. गलेफांतही दोन प्रकार होते. सिंहासनावर चौखांबी मंडप होता. ह्या मंडपाच्या खांबांना खारव्याचे अस्तर असलेल्या मखमलीचे वेष्टन असे व त्याचे माप नऊ गज म्हणजे २५ फूट होते. ह्या सिंहासनाच्या मंडपास छत म्हणजे झालर असलेला चांदवा लावलेला होता. हा चांदवा किनखापी तर झालर ताफत्याची असायची. ह्या किनखापी चांदव्यास गजनीचे अस्तर असे.
    रोज संध्याकाळी सरकारी माणसे सिंहासनाजवळ जमून सिंहासनास मुजरा घालीत असत व तेथे दिवटी लावीत असत. येथे रात्री सतत दिवटी असे. गडावरच्या इतर काही ठिकाणांप्रमाणेच तख्ताजवळही रात्रभर दिवा जळत असावयाचा, असा शिरस्ताच (नियम) होता. तख्ताजवळ मशालेस पोत म्हणूनही खर्च पडला आहे. ह्या सिंहासनाची दररोज पूजा होत असे. त्याचा 'तख्त पुजारी' म्हणून 'महाराजांचे तख्ताचे पूजेस फरास' असा निर्देश आला आहे. 
    सिंहासनाच्या व्यवस्थेचा आणखी विशेष म्हणजे सिंहासनासमोर दरवर्षी कीर्तन होत असे. हें कीर्तन करण्याचे काम बिरवाडीच्या योगी घराण्याकडे वंशपरंपरागत होते. ह्या कीर्तनकारास जमीन इनाम दिली होती. हे कीर्तन प्रतिवर्षी निरनिराळ्या तिथींस होत असे. उदाहरणार्थ, जन्माष्टमीचा उत्सव सिंहासनाजवळ होई. इ.स. १७७८ मध्ये या उत्सवास १५ रु. खर्च आला. या उत्सवास गोरेगावकर हरिदास बोलावीत. त्यास ५ रु. बिदागी मिळे. 
   सिंहासनाजवळ केवळ सिंहासनाचाच म्हणून नगारखाना इ.स. १७९७ पासून नाना फडणीसांनी सुरू केला. ह्यासंबंधीचा उल्लेख - "रा. बालाजी जनार्दन फडणीस माहाडास आले, ते तेथून किल्ला पाहाण्यास आले ते समई शिवाजी महाराजांचे तख्ताजवळ नगारखाना ठेवावयाची परवानगी सांगितली त्यावरून सन सवा तिसैनापासून ठेविला." सन सवा तिसैन म्हणजे शके १७१८, इ.स. १७९७. ह्या नगारखान्याच्या खर्चाची वार्षिक नेमणूक १३०० रु. असे. नाना फडणीसांनी सिंहासनासमोर नगारखाना ठेवण्याची जी खास व कायमची व्यवस्था केली, तिचे स्वरूप पुढीलप्रमाणे - २ सुर्णाजी, १ तुतारजी, २ कर्णाजी, २ दमामजी, १ डफगर, १ झांजवाला, २ घड्याळजी, ३ नगारजी व पेलेदार, १ नगारे करणार इतकी माणसे कायम नेमली. इ.स. १८०७-०८ मध्ये त्यांचे वार्षिक वेतन १२०० रुपये इतकेे होते. 
   तख्तापुढे सिंहासनाचा म्हणून स्वतंत्र चौघडा होता व तो ठराविक वेळीं गर्जत असे. तख्तापुढे दरवर्षी एक बकरे बळी म्हणून दिले जाई. सिंहासनाजवळ राजहुडा होता व तेथे स्वतंत्र पाहारा असे. सिंहासनाच्या चौथऱ्याची जपणूक एखाद्या दैवताप्रमाणे होत असे. अश्या प्रकारे एखाद्या जागृत व तेजस्वी देवस्थानाप्रमाणे रायगडावरील शिवछत्रपतींच्या राजसिंहासनाची व्यवस्था उत्तर पेशवाईत ठेवली गेली होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १९ एप्रिल इ.स.१९१०
क्रांतिवीर अनंत कान्हेरे, क्रांतिकारक कृष्णाजी गोपाळ कर्वे, क्रांतिकारक विनायक नारायण देशपांडे यांना नाशिकाचा कलेक्टर जॅक्सन याच्या हत्येसंदर्भात  फाशी दिली गेली.

अनंत कान्हेरे हा गणेश(बाबाराव) दामोदर सावरकर आणि
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या अभिनव भारत ह्या अंतराष्ट्रीय सशस्त्र क्रांतीकाराक संघटनेचा एक सदस्य होता. कलेक्टर जँक्सन बाबारावांच्या अटकेसाठी
जवाबदार होता. त्याची नाशिक मधून मुंबईत बदली होणार होती. त्याच्या निरोपासाठी नाशिकमधल्या विजयानंद थिएटरमध्ये शारदा ह्या नाटकाचा प्रयोग ठेवला होता . जँक्सन मराठी नाटकाचा चाहता होता म्हणून तो नाटक पाहण्यासाठी येणार होताच. नाटक सुरु होण्याची वेळ
झाली असता सर्वजण आपापल्या जागेवर स्थानपन्न
होत असताना अनंताने जँक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जँक्सन जागीच ठार झाला. ती पिस्तुल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमधून गुप्तरीतीने पुस्तकामध्ये ठेऊन पाठवलेल्या २२ ब्राऊनी बनावटीतील
पिस्तुलांपैकी एक होती. अनंताला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे ह्या समवयस्कर साथीदारांची जोड मिळाली. जँक्सनचा वध केल्यानंतर अनंत आपल्या जागेवर शांतपणे उभा राहिला . त्याला अटक करण्यात आली . कान्हेरे , कर्वे , आणि देशपांडे ह्यांच्यावर खटला भरण्यात आला . २० मार्च १९१० रोजी त्यांना फाशी ठोठावण्यात आली . आणि १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली .

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४