आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ एप्रिल १६७३*
छत्रपती शिवाजी महाराजांची हुबळीवर स्वारी
अली आदिलशहा २४ नोव्हेंवर १६७२ रोजी मरण पावला. त्याचा सात वर्षांचा मुलगा सिकंदर आदिलशहा गादीवर आला. तेव्हा विजापूरचा सरदार रुस्तुम जमान याने त्याच वर्षी बंड केले. विजापूरच्या अंतर्गत गोंधळाचा फायदा घेऊन महाराजांनी विजापूर राज्यावर १६७३ मध्ये आक्रमण केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ एप्रिल १७१९*
फारुखसियर बादशाहची हत्या
फेब्रुवारी १७१९ ला लाल किल्ल्यातली सगळी बादशाही फौज आणि पहारेकरी हटवण्यात आले, मराठे आणि हुसेन अलीने स्वतःची माणसे नेमली. २८ तारखेला हरम (शयनकक्षात) मध्ये लपलेल्या फारुखसियर बादशाहला पकडून दरबारात आणले गेलॆ कुतुब उल मुल्क सय्यद अलीने बादशहाचे डोळे काढले आणि बादशहाला बंदीखान्यात टाकले. रफी ऊत दर्जतला नवीन बादशाह घोषित करण्यात आले. फारुखसियर ने बंदीखान्यातून बंडाळी चे प्रयत्न केले, दिल्ली शहरातसुद्धा प्रचंड अशांतता माजली होती. बादशाह समर्थकांनी पुन्हा किल्ल्यावर ताबा मिळवला तर सय्यद बंधू हुसेन अली आणि हसन अलीं यांचे मरण निश्चित होते आणि मराठ्यांची मोहीम सुद्धा फत्ते होणे अशक्य झाले असते. १९ एप्रिल १७१९ रोजी बादशाह फारुखसियरचे मुंडके कापून त्याला संपवण्यात आले. नवीन बादशहा रफी ऊत दर्जतकडून मराठ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या महाराणी येसूबाईंची सुटका झाली, मराठे पुन्हा साताऱ्याला परतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ एप्रिल १७३६*
सिद्दी साताचा पराभव
छत्रपती शाहूंनी चिमाजी आप्पा, उदाजी पवार व पिलाजी जाधव यांस सिद्दी साताचा आळा घालण्यासाठी कोंकणात पाठविले. मानाजी आंग्र्यांनी चिमाजीस साथ दिली. १९ एप्रिल १७३६ ला रेवासच्या खाडीत सिद्दीची व मराठ्यांची लढाई झाली. तीत सिद्दीचे १,३०० व मराठ्यांकडील ८०० लोक पडले. सिद्दी सात मारला गेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ एप्रिल १७९७*
रायगडावरील शिवछत्रपतींच्या सिंहासनाचा गलेफ तयार केला
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही रायगडच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची आणि गौरवशाली घटना आणि शिवछत्रपतींच्या तख्ताची म्हणजे सिंहासनाची जागा ही रायगडावरील सर्वात महत्त्वाची आणि पूजनीय जागा. दिनांक ६ जून १६७४ रोजी रायगडावर महाराज सिंहासनाधिश्वर झालें. पुढें इ.स. १६८९ मध्यें रायगड मोगलांच्या ताब्यात गेला. नंतर १७३३ मध्यें रायगड श्रीपतराव पंतप्रतिनिधींच्या करवीं छत्रपती शाहू महाराजांकडे आला. तेव्हा पासून रायगडावरील सिंहासनाची व्यवस्था चालू झाली. इ.स. १७३५ पासून १७७२ पर्यंत रायगड तालुका हुजूरचा प्रदेश होता. शत्रूने स्वारी केल्यावर, त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी पेशव्यांची होती; पण कारभारी नेमणे, तालुक्याचे जमाखर्च पाहणे वगैरे गोष्टींबाबत पेशव्यांस अधिकार नव्हता. शाहू महाराजांनी या तालुक्याचा कारभार यशवंत महादेव यांकडे दिला होता.
छत्रपतींची राजधानी रायगडाहून हलल्यामुळे रायगडाचे राजकीय महत्व कमी झाले होते. मात्र तरीही रायगडाची व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे ठेवलेली होती. शिवकालीन दप्तरातील अनेक तत्कालीन कागदपत्रें याची पुष्टी देतात. ह्या कागदपत्रांत शिवछत्रपतींच्या सिंहासनाची जी व्यवस्था आढळतें ती कौतुकास्पद आणि जाणून घेण्यासारखीच आहे.
इ.स.१७७३ मध्यें पेशव्यांनी सिंहासनाबाबत काही गोष्टी आणि रिवाज कायमचे ठरवून टाकले. सिंहासनास चार खांब होते. सिंहासन गजनी, किनखाप, ताफता अश्या बहुमूल्य कापडाने आच्छादिले जात असे. १६ मार्च १७७३ रोजीचा सिंहासनाच्या कापडाच्या खर्चाचा हिशेब उपलब्ध आहे. एकूण १६०८ रुपयांचे कापड २२८ रु. गजनी, २२० रु. ताफता, ८१२ रु. किनखाप, १६ रु. खारवे आणि ३३२ रु.ची मखमल अशा प्रकारे खर्ची पडले. सिंहासनाच्या बैठकीचा भाग व तलाव्याचा भाग यांस कापडण्यासाठी हा खर्च पडला. खर्चास सरकारी मंजुरी मिळत असे. त्यानंतर बारा वर्षांनी हा सगळा वस्त्रसंभार जीर्ण झाल्यामुळे इ.स. १७८६-८७ मध्ये पुन्हा याच स्वरूपाचा खर्च झाला. नंतर १९ एप्रिल १७९७ रोजी पुन्हा सिंहासनाचा गलेफ तयार केला. यावेळी सिंहासनाच्या खांबास लाल मखमल वापरली होती. इ.स. १७९७ मध्ये सिंहासनास २७३८ रुपयांचे कापड खर्ची पडले. त्या कापडाचा तपशील असा, १३९८ रु.चे किनखाप, ५३८ रु. गजनी, २०८ रु. ताफता, २५ रु. खारवा व ५७० रु.ची मखमल. हे कापड किती लांबीरुंदीचे लागले हेही गजवार दिले असल्यामुळे त्यावरून सिंहासनाची लांबीरुंदी अजमावता येते आणि ती आज सिंहासन म्हणून असलेल्या स्थलाच्या मोजमापाशी जमते. कागदपत्रांत सिंहासनाच्या कापडाची लांबी ५ गज ४ तसू (अदमासे १५ फूट २ इंच) व रुंदी ४ गज ४ तसू (अदमासे १२ फूट) दिलेली आहे. प्रत्यक्षात सिंहासनाच्या चौथऱ्याची लांबी १३ फूट व रुंदी १२ फूट आहे. अर्थात कागदांतील कापड अधिक आहे. पण ते सिंहासनावर घालायचे कापड आहे त्यामुळे ते साहजिकच सिंहासनापेक्षा मोठेच असणार. यामुळे सिंहासनाच्या चौथऱ्याची स्थाननिश्चिती होते.
'सिंहासन' आणि 'तख्त' ह्या दोन वेगवेगळ्या संज्ञा होय. सिंहासन म्हणजे तेरा फूट लांब व बारा फूट रुंद असा ओटा, आणि तख्त म्हणजे त्या ओट्यावरील राजाने स्वतः बसावयाचे आसन. ह्या आसनावर शेला आणि गलेफ अशी दोन प्रकारची वस्त्रें घातली जायची. गलेफांतही दोन प्रकार होते. सिंहासनावर चौखांबी मंडप होता. ह्या मंडपाच्या खांबांना खारव्याचे अस्तर असलेल्या मखमलीचे वेष्टन असे व त्याचे माप नऊ गज म्हणजे २५ फूट होते. ह्या सिंहासनाच्या मंडपास छत म्हणजे झालर असलेला चांदवा लावलेला होता. हा चांदवा किनखापी तर झालर ताफत्याची असायची. ह्या किनखापी चांदव्यास गजनीचे अस्तर असे.
रोज संध्याकाळी सरकारी माणसे सिंहासनाजवळ जमून सिंहासनास मुजरा घालीत असत व तेथे दिवटी लावीत असत. येथे रात्री सतत दिवटी असे. गडावरच्या इतर काही ठिकाणांप्रमाणेच तख्ताजवळही रात्रभर दिवा जळत असावयाचा, असा शिरस्ताच (नियम) होता. तख्ताजवळ मशालेस पोत म्हणूनही खर्च पडला आहे. ह्या सिंहासनाची दररोज पूजा होत असे. त्याचा 'तख्त पुजारी' म्हणून 'महाराजांचे तख्ताचे पूजेस फरास' असा निर्देश आला आहे.
सिंहासनाच्या व्यवस्थेचा आणखी विशेष म्हणजे सिंहासनासमोर दरवर्षी कीर्तन होत असे. हें कीर्तन करण्याचे काम बिरवाडीच्या योगी घराण्याकडे वंशपरंपरागत होते. ह्या कीर्तनकारास जमीन इनाम दिली होती. हे कीर्तन प्रतिवर्षी निरनिराळ्या तिथींस होत असे. उदाहरणार्थ, जन्माष्टमीचा उत्सव सिंहासनाजवळ होई. इ.स. १७७८ मध्ये या उत्सवास १५ रु. खर्च आला. या उत्सवास गोरेगावकर हरिदास बोलावीत. त्यास ५ रु. बिदागी मिळे.
सिंहासनाजवळ केवळ सिंहासनाचाच म्हणून नगारखाना इ.स. १७९७ पासून नाना फडणीसांनी सुरू केला. ह्यासंबंधीचा उल्लेख - "रा. बालाजी जनार्दन फडणीस माहाडास आले, ते तेथून किल्ला पाहाण्यास आले ते समई शिवाजी महाराजांचे तख्ताजवळ नगारखाना ठेवावयाची परवानगी सांगितली त्यावरून सन सवा तिसैनापासून ठेविला." सन सवा तिसैन म्हणजे शके १७१८, इ.स. १७९७. ह्या नगारखान्याच्या खर्चाची वार्षिक नेमणूक १३०० रु. असे. नाना फडणीसांनी सिंहासनासमोर नगारखाना ठेवण्याची जी खास व कायमची व्यवस्था केली, तिचे स्वरूप पुढीलप्रमाणे - २ सुर्णाजी, १ तुतारजी, २ कर्णाजी, २ दमामजी, १ डफगर, १ झांजवाला, २ घड्याळजी, ३ नगारजी व पेलेदार, १ नगारे करणार इतकी माणसे कायम नेमली. इ.स. १८०७-०८ मध्ये त्यांचे वार्षिक वेतन १२०० रुपये इतकेे होते.
तख्तापुढे सिंहासनाचा म्हणून स्वतंत्र चौघडा होता व तो ठराविक वेळीं गर्जत असे. तख्तापुढे दरवर्षी एक बकरे बळी म्हणून दिले जाई. सिंहासनाजवळ राजहुडा होता व तेथे स्वतंत्र पाहारा असे. सिंहासनाच्या चौथऱ्याची जपणूक एखाद्या दैवताप्रमाणे होत असे. अश्या प्रकारे एखाद्या जागृत व तेजस्वी देवस्थानाप्रमाणे रायगडावरील शिवछत्रपतींच्या राजसिंहासनाची व्यवस्था उत्तर पेशवाईत ठेवली गेली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ एप्रिल १८१८*
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी किल्ले आणि महत्वाची शहरे ताब्यात घेतली. त्यात १९ एप्रिल रोजी नाशिक शहराचा पूर्ण ताबा कॅप्टन ब्रिजने मिळवला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ एप्रिल १९१०*
क्रांतिवीर अनंत कान्हेरे, क्रांतिकारक कृष्णाजी गोपाळ कर्वे, क्रांतिकारक विनायक नारायण देशपांडे यांना नाशिकाचा कलेक्टर जॅक्सन याच्या हत्येसंदर्भात फाशी दिली गेली.
अनंत कान्हेरे हा गणेश(बाबाराव) दामोदर सावरकर आणि
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या अभिनव भारत ह्या अंतराष्ट्रीय सशस्त्र क्रांतीकाराक संघटनेचा एक सदस्य होता. कलेक्टर जँक्सन बाबारावांच्या अटकेसाठी
जवाबदार होता. त्याची नाशिक मधून मुंबईत बदली होणार होती. त्याच्या निरोपासाठी नाशिकमधल्या विजयानंद थिएटरमध्ये शारदा ह्या नाटकाचा प्रयोग ठेवला होता . जँक्सन मराठी नाटकाचा चाहता होता म्हणून तो नाटक पाहण्यासाठी येणार होताच. नाटक सुरु होण्याची वेळ
झाली असता सर्वजण आपापल्या जागेवर स्थानपन्न
होत असताना अनंताने जँक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जँक्सन जागीच ठार झाला. ती पिस्तुल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमधून गुप्तरीतीने पुस्तकामध्ये ठेऊन पाठवलेल्या २२ ब्राऊनी बनावटीतील
पिस्तुलांपैकी एक होती. अनंताला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे ह्या समवयस्कर साथीदारांची जोड मिळाली. जँक्सनचा वध केल्यानंतर अनंत आपल्या जागेवर शांतपणे उभा राहिला . त्याला अटक करण्यात आली . कान्हेरे , कर्वे , आणि देशपांडे ह्यांच्यावर खटला भरण्यात आला . २० मार्च १९१० रोजी त्यांना फाशी ठोठावण्यात आली . आणि १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली .
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment