आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष 10मे
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१० मे १६२६*
मलिकअंबर याचा मृत्यू
मलिक अंबर हा निजामशाहीचा वजीर होता. हाही मूळचा गुलाम. बगदादच्या एका व्यापाऱ्याच्या गुलामीत तो होता. त्या व्यापाऱ्याने याला निजामशाहीचा वजीर चंगीजखान याला विकले. पुढे आपल्या कर्तृत्त्वाने तो त्याच निजामशाहीचा वजीर बनला. लखूजी जाधवराव, मालोजी व शहाजी भोसले, बाबाजी काटे असे अनेक सरदार त्याच्या हाताखाली पराक्रम करीत असत. हा मोठा कर्तबगार मुत्सद्दी होता. औरंगाबाद हे शहर त्याने वसविले. त्याची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे त्याची "मलिकंबरीतह' या नावाने ओळखली जाणारी वसुलीपद्धत.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१० मे १६३५*
थोरले महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांचं वार्षिक उत्पन्न त्याकाळी २० लाख ७५ हजार होन असल्याचं विजापूरच्या आदीलशहाचं अधिकृत पत्र.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१० मे १७८५*
शिखांचा बंदोबस्त-श्रीमंत महादजी शिंदे
इ.स.१७८५ च्या जानेवारी महिन्यात अंबुजी इंगळे यांना दिल्ली आणि उत्तरेकडील प्रातांच्या बंदोबस्ताकरिता महादजींनी रवाना केले,शिखांचा दिल्ली प्रातांत नेहमी उपद्रव होत असे . शिवाय बादशहाच्या गैरहजेरीत शिखांची धाड येण्याची शक्यता होती ,अफ्रासियाबखानाच्या वेळेपासून दिल्ली शहराचा बंदोबस्त नजीबखानाकडे होता,अंबूजी इंगळे ह्यांनी दि. ११ फेवारी १७८५ रोजी त्याच्याकडून ताबा काढून आपले सैन्य दिल्लीच्या बंदोबस्ताकरिता उभे केले,
नजीबखानाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात जो गोंधळ निर्माण झालेला होता, त्याचा फायदा घेऊन दिल्लीच्या आसपासच्या मुलखात,गुजर लोक लुटमार करीत होते. त्यामुळे त्या प्रांतातील लोकात खूप असंतोष निर्माण झाला होता.अंबूजी इंगळेंनी गुजर लोकांचा बंदोवस्त करून त्या प्रांतातील लोकांना दिलासा दिला. त्यामुळे साहजिकच तेथील लोकांना आनंद झाला. त्यानंतर अंबूजी इंगळेंनी आपले सर्व लक्ष शिखांकडे वळविले,
मार्च १७८५ रोजी अंबूजी इंगळे ह्यांनी दिल्लीच्या उत्तरेस तेरा मैलावर असलेल्या भक्तावरपूर येथील आपल्या छावणीत काही शिख सरदाराच्या भेटी घेतल्या . ह्या शिख सरदारात बघेलसिंग, करमसिंग, दुलजासिंग, भागसिंग, दिवाणसिंग, मोहनसिंग, गोहरसिंग, ह्यांचा समावेश होता. ह्या भेटीमध्ये मोहनसिंग आणि दुलजासिंग ह्या प्रमुख सरदारांनी महादजींना भेटून मैत्रीच्या करारावर सह्या करावे असे ठरले.
ह्यानंतर अंबूजी इंगळेनी मथुरेला येऊन एप्रिल १७८५ मध्ये महादजींची भेट घेतली, दि.१० मे १७८५ रोजी शिख प्रामुख्य सरदार मोहनसिंग, दुलजासिंग आणि महादजी शिंदे ह्यांच्यात मैत्रीच्या करारावर मथुरा मुक्कामी सह्या झाल्या,
ह्या कराराच्या काही अटी अशा होत्या -
१) शिखांनी बादशहाच्या प्रदेशात लुटमार करू नये.
२) कोणत्याही प्रदेशातून राखी(महसूल) वसूल करू नये.
३) जयपूरच्या प्रदेशात आपण दिलेल्या ठिकाणीच जहागिरी घ्याव्या, आणि पाच हजार सैन्यासह महादजींची चाकरी करावी.
४) दिल्ली किंवा महादजींच्या प्रदेशात तसेच इंग्रजांच्या व नवाब वजीर ह्यांच्या प्रदेशातही बंडाळी करू नये.
ह्या करारानंतर महादजींना शिखांकडून कधीही त्रास झाला नाही. महादजींनी शिखांच्या केलेल्या बंदोबस्तातून त्यांचे बुद्धिकौशल्य आणि शत्रुवरप्रेमाने मात करण्याची त्यांची विलक्षण चातुर्याचा प्रत्यय येतो.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१० मे १८१८*
रायगडावरचा शेवटचा रणसंग्राम !
रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला. कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता. या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान. आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता. मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते. पण अखेर दहाव्याच दिवशी म्हणजे १० मे १८१८ या दिवशी रायगडावर दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट होऊन सारा गड धडाडून पेटला. वरून सूर्याची उन्हाळी आग , खालून इंग्रजांची तोफाबंदुकांची आग अन् गडावरही आगच आग. रायगड होरपळून गेला. शत्रू कॅ. प्रॉथर गडात शिरला. भयंकर अवस्था झाली होती रायगडाची. प्रॉथर गडात आला , तेव्हा एका खुरट्या लहानग्या झुडपाच्या लहानग्या सावलीत एक स्त्री बसली होती. ती होती शेवटच्या बाजीराव पेशव्यांची पत्नी. तिचं नाव श्रीमंत वाराणसी बाईसाहेब पेशवे. कॅ. प्रॉथर वाराणसीबाईसाहेबांशी अदबीने आणि आदराने वागला. त्याने त्यांना मेण्यातून सन्मानपूर्वक पुण्याकडे रवाना केले. ब्रह्माावर्त येथे स्थानबद्ध असलेल्या श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे नंतर वाराणसीबाईंची इंग्रजांनी रवानगी केली. रायगडावर उरली फक्त राख. सारे वाडे , राजसभा आणि होतं नव्हतं ते जळण्यासारखं सारं जळून गेलं. सर्वात धडाडून जळालं असेल रायगडचं रक्षण करण्याकरता दहा दिवस झुंजलेल्या अबुल फतेखानचं आणि मराठी सैनिकांचं काळीज. पुढच्या काळात रायगडाची सारी आबाळच होती.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१० मे १८५७*
स्वातंत्र्यसमराची सुरुवात
१० मे १८५७, रविवारचा दिवस होता. उत्तर भारतातील मीरतच्या छावणीतले काही इंग्रज अधिकारी चर्च मध्ये प्रार्थनेसाठी जाण्याच्या तयारीत होते आणि काही इंग्रज शिपाई सुट्टीवर होते. भारतीय शियाई आपल्यावर सत्ता गाजवणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या विरोधात उठाव करण्याची संधीच शोधत होते आणि हा १० मे चा मुहूर्त त्यांनी साधला. जवळजवळ पन्नास पुरुष, स्त्रिया आणि मुलांची भारतीय शिपाई आणि त्यांच्यात सामील झालेल्या संतप्त स्थानिकांनी तिथे कत्तल केली.
हा उठाव काही अचानक घडलेली घटना नसून अनेक वर्षांपासून हिंदुस्थानच्या भूमीवर असलेला परसत्तेचा डाग कायमचा पुसून काढण्यासाठी केलेला एक पूर्वनिश्चित प्रयत्न होता. गाय आणि डुक्कर यांच्या चरबीचे वंगण असलेल्या कडातुसंचा भाग सर्वांना ज्ञातच आहे, पण उठावाचे केवळ काडतूस हेच एकमेव कारण नवते. केवळ धार्मिक भावना दुखावल्याबद्दल केलेला विरोध नसून, इंग्रजांनी ज्या पारतंत्र्याच्या बेड्या लादल्या होत्या आणि त्यायोगे जे अनन्वित आत्यचार केले होते त्या विरुद्ध एक महाभयंकर विस्फोट होता. भारतीयांच्या मनामध्ये इंग्रज सत्तेविरुद्ध जो निखारा धगधगत होता तो धडधडून पेटवण्यासाठी काडतूस ही केवळ एक ठिणगी होती.
१९ मार्च १८५७ ला बंगालच्या बराकपूरमध्ये मंगल पांडेला अधिकाऱ्यांविरुद्ध उठाव केल्याबद्दल फाशी देण्यात आली. २४ एप्रिल ला भारतीय शिपायांनी नवीन काडतुसंचा विरोध केला आणि ८५ शिपायांना ९ मे रोजी नोकरीवरून काढून १० वर्षांची कोठडी सुनावली. हे निमित्त साधून भारतीय शिपायांनी १० मे रोजी उठाव केला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१० मे १८५८*
वीर बाबुराव सेडमाके - १८५७ च्या उठावातील गोंडवनाचा तेज:पुंज क्रांतीसूर्य
१० मे १८५८ रोजी सलग तिसऱ्यांदा ब्रिटिश सैन्याला बाबुराव सेडमाकेविरुद्ध पराभवाच्या नामुष्कीचा सामोरे जावे लागले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment