आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 

*१६ मे १६४०*
छत्रपती शिवाजी महाराजांचा फलटणच्या नाईक निंबाळकरांची लेक सईबाई यांच्याशी लालमहाल, पुणे येथे विवाह.
सईबाईंना एकूण ४ संतती. ३ मुली म्हणजे सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई आणि १ मुलगा म्हणजेच छत्रपती शंभुराजे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ मे १६४८*
छत्रपती शिवरायांनी पहिली राजधानी राजगड
बांधकामास सुरुवात केली. १६४७-४८ दरम्यान छत्रपती शिवरायांनी तोरण्याबरोबर हा किल्ला ताब्यात घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ मे १६४९*
शहाजीराजेंची सन्मानपूर्वक मुक्तता
छत्रपती शिवाजी महाराजांनी फत्तेखानाचा व संभाजी राजांनी (छत्रपती शिवरायांचे मोठे बंधु) फर्रादखानाचा पराभव केला. छत्रपती शिवाजी राजांनी दिल्लीच्या मोगलांशी संधान साधून विजापूरकरांवर दबाव आणला. असे नाक दाबल्यावर, विजापूरकरांनी कैद केलेल्या शहाजी राजांना रिहा करण्याचा हुकूम सोडला व त्यांची सन्मानपूर्वक सशर्त सुटका केली. त्या बदल्यात छत्रपती शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला तर थोरले बंधू संभाजीराजेंना बेंगलोर.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 

*१६ मे १६६५*
मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण
दिलेरखानाने पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर ५००० पठाण व बहलिये यांसह सुलतानढवा केला. हा हल्ला पाहून मुरारबाजी देशपांडे यांनी ७०० चिवट मराठी वाघांसह बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडून मोगलांवर चाल केली. सर्वांचा जोश आगीसारखा भडकला होता. भयंकर रणधुमाळी उडाली. मुरारबाजींचा आवेश व हल्ला असा विलक्षण होता की जणू चक्र सुदर्शन ! पठाणांची खांडोळी उडवीत मुरारबाजींची ती प्रलयकारी झुंड दिलेरखानाच्या रोखाने घोंगावत येऊ लागली. गर्दी उडाली. मुरारबाजींचा हत्यारी सपाटा म्हणजे जणू रूद्राचे संतप्त तांडवच होते. मुरारबाजींचे शौर्य पाहून दिलेरखानाची उंगली तोंडात गेली. त्याने झुंज थांबवली. तो मुरारबाजींना म्हणाला,
“अय बहादुर ! तुम्हारी बहादुरी देखकर मै निहायत खूष हुवा हुँ ! तुम हमारे साथ चलो ! हम तुम्हारी शान रखेंगे !”
पण फितुरीचे अमिष पाहताच त्या इमानी अन् अभिमानी मुरारबाजींचा संतापाने भडका उडाला. त्यांनी खुद्द खानावरच चाल केली. तेव्हा खानाने सोडलेला तीर वर्मी लागून मुरारबाजी देशपांडे रणात कोसळले. पुरंदराच्या मांडीवर मुरारबाजींनी आपले प्राण स्वराज्यासाठी समर्पित केले.
आठवते का ? याच मुरारबाजी देशपांड्याना ऐन रणात जावळीच्या वनात महाराजांनी मागणी घातलेली होती ? तेव्हा मोर्‍यांच्या शिरपेचातील हा तुरा महाराजांना लाभलेला होता. आज याच मुरारबाजींना दिलेर खानाने ऐन रणात फितुरीचे आमिश दाखवले. पण मुरारबाजींच्या तोंडाला पाणी सुटण्या ऐवजी त्यांच्या तरवारीलाच खानाच्या रक्तासाठी पाणी सुटले.
या लढाईत मुरारबाजींसह ३०० मराठे धारातिर्थी पडले. हे सर्व मावळे चिव्हेवाडी या पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या एकाच गावातील होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ मे १६६६*
औरंगजेबाने रामसिंगास शिवाजी महाराजांसह काबुल मोहिमेवर जाण्याची आज्ञा
१३ मे रविवारी रामसिंग शंभूराजांसह बादशहाच्या दरबारी गेला व शिवाजी महाराजांना ताप आल्यामुळे ते आज दरबारी हजार राहू शकत नसल्याचे बादशहास निवेदन केले. बादशाहने शंभूराजांस सरोप्याची वस्त्रे , रत्नजडीत खंजीर व मोत्यांचा हार दिला. महाराजांच्या या वागण्यामुळे राजा जसवंतसिंह, बेगम जहांआरा, जाफरखान व दरबारातील इतर उमराव यांनी शिवाजी महाराजांच्या या उद्धट व अपमानकारक वर्तणुकीबद्दल बादशाहाकडे नाराजी व्यक्त केली. महाराजांच्या या अरेरावी व उन्मत वागणुकीबद्दल शिक्षेची मागणी केली. औरंगजेबाने शिवाजीला काय शिक्षा करावी मृत्यूदंड कि कैद हे ठरवण्यासाठी सिद्धी फौलादखानाला महाराजांना राजअंदाजखानच्या हवेलीत घेऊन जाण्याची आज्ञा केली. रामसिंगास हि बातमी कळताच त्याने औरंगजेबास कळवले कि  “बादशाहने महाराजांस मारण्याचा विचार केला आहे परंतु महाराजांना माझे वडिल मिर्झाराजांनी त्यांच्या जीविताची हमी दिली आहे व त्या वचनाच्या कौलावर महाराज येथे आले आहेत. बादशाहने पहिले मला व माझ्या मुलाला ठार मारावे नंतर महाराजांना जीवे मारावे." शिवाजी महाराजांना तत्काळ शिक्षा केल्यास मिर्झा राजे व कुंवर रामसिंग यांचा विरोध सहन करावे लागेल हे ओळखून औरंगजेबाने रामसिंगास महाराजांसाठी जमीन राहण्यास सांगितले. १५ मे मंगळवारी महाराज रामसिंगाकडे आले व त्यांनी शपथपूर्वक आपल्या चांगल्या वर्तणुकीची हमी रामसिंगास दिली. रामसिंगाने निश्चिंत होऊन जामीनपात्र औरंजेबास दिले. १६ मे बुधवार रोजी औरंगजेबाने रामसिंगास शिवाजी महाराजांसह काबुल मोहिमेवर जाण्याची आज्ञा दिली. औरंगजेब आपली हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याची जाणीव महाराजांना झाली व त्यांनी काबुल मोहिमेवर जाण्यास नकार दिला. महाराजांनी वजीर जाफरखान व अन्य बादशाही सरदार व उमराव यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी नजराणे व काही द्रव्य व रक्कम देण्यास सुरवात केली.

 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ मे १६७४*
तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमाता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ मे १६७५*
फोंडा आदिलशाही जोखडातून कायमचे मुक्त
एक महिना आठ दिवस फोंडा कोटाचा रणसंग्राम होऊन १६ मे १६७५ रोजी फोंडा आदिलशाही जोखडातून कायमचे मुक्त होऊन हिंदवी स्वराजाचे भाग बनले. फोंडा सुभा जिंकल्यामुळे आजच्या दक्षिण गोव्याचे सांगे, केपे, काणकोण हे तालुके शिवाजी महाराजांच्या राज्याचे भाग बनले. फोंडा किल्ला जिंकण्याच्या पूर्वी पाच दिवस अगोदरच एक फौजेची तुकडी कारवारला पोहोचली. या फौजेने कारवार आणि अंकोला हे दोन कोट जिंकून घेऊन हिंदवी स्वराज्याची हक्क गंगावली नदीला नेऊन भिडविली. फोंडा मोहिमेनंतर शिवाजी महाराज आता पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोवा जिंकून घेणार अशा बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ मे १७०३*
औरंगजेबाकडे अटकेत असलेले "छत्रपती संभाजीपुत्र शाहू" यांना मुस्लीम दीक्षा देण्याचा हुकुम औरंगजेबाने दिला पण आपल्या धन्याला वाचवण्यासाठी खंडेराव व जगजीवन हे दोघे गुजरबंधु मुस्लीम होण्यास तयार झाले. १६ मे च्या शुभमुहूर्तावर त्यांस मुस्लीम करून त्यांची नावे 'अब्दुरहीम' व 'अब्दुरेहमान' अशी ठेवली. 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*१६ मे १७५१*
दाभाडे घराणे नजरकैदेत
सरसेनापती उमाबाईंनी युद्धांत अलौकिक शौर्य गाजवून दिले.  एका महिला सरसेनापतीने केलेल्या या कामगिरीवर छत्रपती शाहू खूश झाले होते. त्यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबारात त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले. सोन्याचे तोडे मिळविण्याचा मान उमाबाईनंतर त्यांचा मुलगा यशवंतरावांनी सुरतेच्या लढाईत मिळविला. पेशव्यांवरील उमाबाईंची नाराजी पुढे ही नानासाहेब पेशव्यांमुळे कायम राहिली. शाहू महाराजांच्या निधनानंतर दाभाड्यांचा मुख्य आधार कोसळला. उमाबाई ताराबाईंबरोबर गेल्या. उमाबाई, ताराबाई, आणि दमाजी गायकवाड यांनी पेशव्यांच्या विरूद्ध उठाव केला. तेव्हा १६ मे १७५१ रोजी पेशव्यांनी दाभाड्यांची सर्व मंडळी पुण्यात होळकरांच्या वाड्यात नजरकैदैत ठेवली; परंतु उमाबाईंनी पेशव्यांशी समझोता घडवून आणला व ते प्रकरण संपले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ मे १८१८*
इंग्रजांचा मालेगावच्या किल्ल्याला वेढा
नारोशंकर यांनी अठराव्या शतकात मालेगावचा भुईकोट बांधला. सातारा छत्रपती दुसरे शाहू यांचा धाकटा भाऊ चतुरसिंह याने पेशव्यां विरुध्द उठाव केला. त्याने मालेगावच्या किल्ल्याचा आसरा घेतला होता. पेशव्यांचा सेनापती त्र्यंबकजी डेंगळे याने त्याला १० फ़्रेब्रुवारी १८१० रोजी कपट करुन मालेगावच्या किल्ल्यात कैद केले होते. पेशवाईच्या पाडावानंतर या किल्ल्यावर अरबांची सत्ता होती. १६ मे १८१८ रोजी इंग्रजांनी मालेगावच्या किल्ल्याला वेढा घातला. जवळजवळ एक महिना ३००-३५० अरबांनी मालेगावच्या किल्ल्याच्या मदतीने इंग्रजांशी लढा दिला. १०जुम १८१८ ला इंग्रजांच्या तोफ़ांच्या मार्‍य़ात किल्ल्यातील दारुकोठाराचा स्फ़ोट झाल्याने १३ जून रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...