सरदार जगताप घराण्याचे 5 नवीन शिलालेख ...प्रकाशित अनील दुधाने
सरदार जगताप घराण्याचे 5 नवीन शिलालेख ...प्रकाशित
पिंपळे जगताप शिलालेख
शिलालेख क्रमांक १
हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील चाकण शिक्रापुर रोड वरील मौजे पिंपळे जगताप गावातील मुख्य रस्त्यालगत बाजार तळातील गावठाणात श्री महादेव मंदिराच्या गाभाऱ्याच्या उजव्या बाजूस मुख्य भिंतीवर कोरलेला आहे. शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून १० ओळीचा शुद्ध मराठी भाषेत आहे शिलालेखाची अक्षरे ठळक असून सध्या रंगवलेला असली तरी सुस्पष्ट पणे सहज वाचता येतात
.गावाचे नाव :पिंपळे जगताप ता.शिरूर , जि. पुणे.
शिलालेखाचे वाचन :
१.श्री
२. श्री शिवसांभ चरणि त
३. त्पर रघुनाथराव सुत
४. विट्ठलराव पाटिल ज
५ .गताप मोकदम मौ
६ .जे पिपळे तरफ चाक
७. ण सन १२४९ शके १७६१
८. विकारिनाम संवसरे
९. श्रावण शुक्ल ३ ईदुवास
१०. र शुभं भवतु
जी.पी.एस. :१८ ७० ”९२ ’३९ ,७४ ०५ ’’९ ४ ’ ४८
शिलालेखाचे स्थान : मंदिराच्या उजव्या बाजूस मुख्य गाभारा दरवाज्यावर कोरलेला आहे
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : मंदिर बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : - शके १७६१ श्रावण शुक्ल ३ -, विकारी संवत्सर, फसली सन १२४९
काळ वर्ष : अठरावे शतक = १२ ऑगस्ट १८३९ सोमवार
कारकीर्द :- ब्रिटीश आमदनी
व्यक्तिनाम:- रघुनाथराव , विट्ठलराव पाटील जगताप
ग्रामनाम :-मौजे पिंपळे ,चाकण
शिलालेखाचे वाचक : श्री. अनिल किसन दुधाणे . श्री .अनिकेत राजपूत
प्रकाशक :राजवाडे संशोधन मंडळ धुळे –अंक २०२१
संक्षेप :- पा-पाटील. मो - मोकदम / मुक्काम, तरफ –तर्फ ,संवछरे-संवत्सरे ,
संदर्भ-(IE VII-81
अर्थ :- शालिवाहन शकाच्या १७६१ व्या वर्षी विकारी नाम संवत्सरातील श्रावण शुक्ल ३ म्हणजेच सोमवार १२ ऑगस्ट १८३९व्या दिवशी श्री शिवसांभ महादेव चरणी तत्पर असलेल्या चाकण परगण्यातील मौजे पिंपळे जगताप येथील गावाचे मोकदम रघुनाथराव सुत विट्ठलराव पाटील जगताप यांनी श्री महादेवाचे मंदिर बांधले . लेखातील कालोल्लेख शक. - संवत्सर महिना तिथी - वार असा संपूर्ण असून सन १२४९ हा उल्लेख फसली सनाचा असावा
शिलालेखाचा महत्व :- विशेष म्हणजे ब्रिटीश काळात एखाद्या ठिकाणी मंदिर बांधणे हे जनसामान्याच्या भावनेच्या आणि जीवनाच्या दृष्टीने केलेले एक पुण्यदायी कार्य आहे.या वरून हे जगताप घराणे यांचे ब्रिटीश काळात राजकीय वजन काय आहे याची माहिती मिळते शिवाय . धार्मिक वृत्तीचे होते हेच सिद्ध होते . हेच या शिलालेखाचे विशेष महत्व आहे .
शिलालेख क्रमांक 2
हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील चाकण शिक्रापुर रोड वरील मौजे पिंपळे जगताप गावातील हद्दीत मुख्य रस्त्यालगत हॉटेल गीतांजलीच्या मागील पाय विहीरीवर आहे हा शिलालेख विहरीच्या मुख्य कमानीवर मध्यभागी मुख्य भिंतीवर कोरलेला आहे. शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून ४ ओळीचा शुद्ध मराठी भाषेत आहे शिलालेखाची अक्षरे ठळक असून सध्या वातावरणामुळे झिजली असली तरी सुस्पष्ट पणे सहज वाचता येतात प्रत्येक ओळीतली शेवटची काही अक्षरे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत:
गावाचे नाव : मु .पो. पिंपळे जगताप, हॉटेल गीतांजली पाठीमागे ता.शिरूर , जि. पुणे.
शिलालेखाचे वाचन :
१. श्री धर्मराज प्रसन्न चरनी तत
२. पर रघोजी वलद रात्नोजी पा जग
३. ताप मो मवजे पीपळे तर्फ चाकन सके
४. १७३१ सुकनाम सवछरे श्रावण सुध १ .
जी.पी.एस. :१८ ७० ”९६ ’७४ ,७४ ०६ ’’४७ ’ ४०
शिलालेखाचे स्थान : बारवेच्या मुख्य कमानीवर वरील बाजूस कोरलेला आहे
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : बारव बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : - शके १७३१ श्रावण शुध १ -, शुक्ल नाम संवत्सर, फसली सन १२४९
काळ वर्ष : अठरावे शतक = १२ ऑगस्ट १८०९ सोमवार-२५ ऑगस्ट १८०९ शनिवार
कारकीर्द :- दुसरा बाजीराव पेशवा ,
व्यक्तिनाम:- रघुजी ,रात्नोजी पाटील जगताप
ग्रामनाम :-मौजे पिंपळे ,चाकण
शिलालेखाचे वाचक : श्री. अनिल किसन दुधाणे . श्री .अनिकेत राजपूत
प्रकाशक :राजवाडे संशोधन मंडळ धुळे –अंक २०२१
अर्थ :- शालिवाहन शकाच्या १७३१ व्या वर्षी शुक्ल नाम संवत्सरातील श्रावण सुध १ म्हणजेच शनिवार १२ ऑगस्ट १८०९च्या दिवशी श्री धर्मराज चरणी तत्पर असलेल्या चाकण परगण्यातील मौजे पिंपळे जगताप येथील गावाचे मोकदम रात्नोजी सुत राघोजी पाटील जगताप यांनी बारव बांधली . लेखातील तिथीचा आकडा आता नष्ट झालेला असल्याने शुद्ध पक्षाचा कालावधी दिला आहे.
संक्षेप -मो.मोकदम -मुक्काम ,ततपर- तत्पर, मौ – मौजे, सके- शके ,सवछरे –संवत्सरे
संदर्भ :- -(IE VII-२१
शिलालेख क्रमांक ३
हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील चाकण शिक्रापुर रोड वरील मौजे पिंपळे जगताप गावातील हद्दीत मुख्य रस्त्यालगत स्मशान भूमीच्या मागील एका पायविहीरीवर आहे हा शिलालेख विहरीच्या मुख्य कमानीवर मध्यभागी मुख्य भिंतीवर कोरलेला आहे. शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून ५ओळीचा शुद्ध मराठी भाषेत आहे शिलालेखाची अक्षरे ठळक असून सध्या वातावरणामुळे झिजली असली तरी सुस्पष्ट पणे सहज वाचता येतात
गावाचे नाव : मु .पो. पिंपळे जगताप, स्मशान भूमी पाठीमागे ता.शिरूर , जि. पुणे.
शिलालेखाचे वाचन :
१. श्री धर्मराज चरणी तत्पर आनंदराव
२. सुत देवराव पा व वीठलराव सुत
३. कृष्णराव पा जगताप मो पींपळ ता चा
४ .कन सके १७३५ श्रीमुखनाम सवछरे
५. माघ सुध १३ गुरुवार समोप्त ती
जी.पी.एस. :१८. ७१”१३ ’८५ ,७४ .०५ ’’९२ ’ २१
शिलालेखाचे स्थान : बारवेच्या मुख्य कमानीवर वरील बाजूस कोरलेला आहे
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : बारव बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : - शके १७३५ माघ शुध १३ श्रीमुखनाम संवत्सर,
काळ वर्ष : अठरावे शतक = २ फेब्रुवारी १८१४ गुरुवार
कारकीर्द :- दुसरा बाजीराव पेशवा ,
व्यक्तिनाम:- आनंदराव ,देवराव ,विठ्ठलराव ,कृष्णराव पाटील जगताप
ग्रामनाम :-मौजे पिंपळे ,चाकण
शिलालेखाचे वाचक : श्री. अनिल किसन दुधाणे ,श्री .अनिकेत राजपूत
प्रकाशक :राजवाडे संशोधन मंडळ धुळे –अंक २०२१
अर्थ :- शालिवाहन शकाच्या १७३६ व्या वर्षी श्रीमुख नाम संवत्सरातील माघ सुध १३ म्हणजेच गुरुवार २ फेब्रुवारी १८१४ च्या दिवशी श्री धर्मराज चरणी तत्पर असलेल्या चाकण परगण्यातील मौजे पिंपळे जगताप येथील गावाचे मोकदम आनंदराव सुत देवराव पाटील व ,विठ्ठलराव सुत कृष्णराव पाटील जगताप यांनी बारव बांधली .
संक्षेप –पा –पाटील मो.मोकदम -मुक्काम ,तरफ – तर्फ , मौ – मौजे,
संदर्भ :- -(IE VII-२९
शिलालेख क्रमांक ४
हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील चाकण शिक्रापुर रोड वरील मौजे पिंपळे जगताप गावातील हद्दीत मुख्य गावठाणात जगताप वाड्या शेजारी असलेल्या धर्मराज मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या बाह्य भिंतीवर उजव्या बाजूस कोरलेला आहे शिलालेख उठावाचा स्वरूपाचा असून ८ ओळीचा शुद्ध मराठी भाषेत आहे शिलालेखाची अक्षरे ठळक असून त्यावर रंगरंगोटी मुळे तसेच वातावरणामुळे झिजली असली तरी सुस्पष्ट पणे सहज वाचता येतात
गावाचे नाव : मु .पो. पिंपळे जगताप,धर्मराज मंदिर ता.शिरूर , जि. पुणे.
शिलालेखाचे वाचन :
१. ।। श्री ।।
२.।। श्रीधर्मराजश्रींचे चरण अर्पन राघोजी बीन र ।।
३।। लोजी पाटील जगताप मोकदम मौजे पींपळे तर्फ ।।
४ ।। चाकन प्रांती श्रीमती गोदाबाई गाईकवाड यांचा ।।
५ ।। सुत सयाजीराव बीन गोवींदराव गाईकवाड ते ।।
६ ।। ना सदास पेलेस मनेरपा(मानेजा ) शहर कसबे बड़ोंदे ।।
७ ।। भाद्रपद ५ सेके १७०६ (१७०१ पाहिजे) वीकारीनामसं।।
८. ।। वंसरे (अधिक) श्रावण मासे सुक्ल पक्षे १३ ईदवासरे ।।
जी.पी.एस. :१८. ७१”१३ ’८५ ,७४ .०५ ’’९२ ’ २१
शिलालेखाचे स्थान : मंदिराच्या मुख्य गाभार्यावर उजव्या बाजूस कोरलेला आहे
अक्षरपद्धती :- उठावाचा स्वरूपाचा लेख आहे
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : मंदिर बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : - शके १७०१ विकारी नाम संवत्सर (अधिक) श्रावण शुद्ध १३, ईद [ सोम] वासर.. काळ वर्ष : अठरावे शतक = २४ ऑगस्ट १७७९.
कारकीर्द :- सवाई माधवराव पेशवे.
व्यक्तिनाम:- राघोजी रत्नोजी पाटील जगताप, श्रीमती गोदाबाई गाईकवाड, सयाजीराव बीन गोविंदराव गायकवाड.
ग्रामनाम :-मौजे पिंपळे ,चाकण बडोदे
शिलालेखाचे वाचक : श्री. महेश तेंडूलकर
प्रकाशक :शिलालेखच्या विश्वात - पान २५८
अर्थ :- शालिवाहन शकाच्या १७०१ व्या वर्षी विकारीनाम संवत्सरातील (अधिक) श्रावण शुद्ध त्रयोदशी या दिवशी इंदुवारी [सोमवारी] चाकण तर्फातील पिंपळे या गावातील राघोजी रत्नोजी जगताप पाटील यांनी हे मंदिर बांधून पूर्ण केले किंवा बांधायला सुरुवात केली.
शिलालेखाचे महत्व :- या शिलालेखात सयाजीराव गायकवाड यांच्या नावाबरोबरच त्यांची आई श्रीमती गोदाबाई (गोदावरीबाई) व वडील गोविंदराव यांच्या नावांचा उल्लेख अनुक्रमे ओळ क्र. ४ व ५ । मध्ये आला आहे. यापूर्वी टोके येथील घाटावरच्या शिलालेखात नाना फडणीसाच्या आई व वडील यांचा उल्लेख आलेला आहे. सर्वसाधारणपणे मुलाच्या नावाबरोबर वडिलांचे नाव येते, पण आईचे नाव मात्र अगदी क्वचित येते. हा शिलालेख त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. शिवाय सयाजीराव गायकवाड यांच्या नावाचा उल्लेख असलेला हा दुसरा शिलालेख आहे. याच्या आधी दावडी- निंबगाव येथील दीपमाळेवर असलेल्या शिलालेखात 'गायकवाड सरकार सयाजी महाराज' असा उल्लेख (ओळ क्र. ४ ते १०) असून तो शके १८०५ मधील आहे.
संक्षेप –सेके –शके ,पेलेस –राजवाडा ,
संदर्भ :- -(IE VI-३६१
शिलालेख क्रमाक. ५
हा लेख महादेव मंदिराच्या बाजूच्या गणपती मंदिराच्या समोरील चौकोनी विहीरीवर कोरलेला आहे. लेख आता पूर्णपणे नष्ट झालेला असून पहील्या व दुसऱ्या ओळीतील शेवटची दोन, तीन अक्षरे दिसतात. लेखाचा फक्त फोटो सोबत दिला आहे
इतिहासातील असलेले जगताप घराणे माहिती .
१ .जगताप घराणे हे शिवपूर्वकालीन पाटील घराणे आहे .
२.पिंपळे जगताप गावात एकूण पाच शिलालेख आढळून आले. यापैकी एक शिलालेख तेंडुलकरांनी प्रकाशीत केलेला असून उर्वरीत चार लेख अप्रकाशीत आहेत. यापूर्वी याचा उल्लेख कोठेही आढळून आला नाही. हे सर्व लेख श्री अनिल दुधाने. यांनी उजेडात आणले. चारपैकी तीन लेख विहीरीवर व एक लेख मंदिरात असून विहीरीवरील लेखापैकी एक शिलालेख पूर्णपणे नष्ट झालेला आहे.
३.पिंपळे जगताप येथील जगताप घराण्याचे कुळदैवत हे धर्मराज तसेच श्री सांब असावे वरील शिलालेखात तशी नोंद आलेली आहे .
४.जगताप पाटलांना पिंपळे गावच्या पाटीलकीचे वतन (बडोदा संस्थान) गायकवाडाकडून आंदण म्हणून मिळाले होते .त्या गावची पिढीजात पाटीलकी आजही या घराण्याकडे चालत आहे
५.या घराण्याकडे पूर्वी गावची वसुली ,न्याय निवाडे जगताप यांच्या वाड्यात होत असत .पूर्वीच्या काळी या वाड्यामध्ये न्याय निवड्या करिता सदर भरत असे, याच बरोबर शेजारचे धामरी हे गाव सुद्धा त्यांच्या कडे इनामी गाव होते .
६.बडोदेकर गायकवाडांशी तसेच कोल्हापूरकर छ्त्रपतीशी या घराण्याचे सोयरे संबध आहेत
७.पुणे जिल्ह्यातील पिंपळे जगताप या गावात बडोदेकर (बडोदा संस्थान गुजरात )गायकवाड सरकारांचे सोयरे सरदार जगताप होत .आज ही त्यांचा गावात मोठा वाडा आहे. हा भव्य वाडा सन १७०६ मध्ये बांधण्यात आला . बांधकामासाठीच सर्व खर्च बडोदा संस्थान तर्फे करण्यात आला . या मध्ये त्याकाळी ६० हजार खर्चून हा भव्य चिरेबंदी वाडा बांधण्यात आला व ४० हजार मध्ये वाड्या शेजारील मंदिर बांधण्यात आले .
७. वाड्याचा महादरवाजा पूर्वेकडे आहे हा दरवाजा १० फूट उंच व ५ फूट रुंद असून याची दारे अजूनही सुस्थित आहेत . दरवाज्याला लागून दोन्ही बाजूस २० फूट उंचीचे बुरुज अजूनही खंबीरपणे उभे आहेत .
८.अश्या प्रकारे एक मात्तबर घराणे गेली काही शतके या गावात एका राजेशाही वाड्यात गावाचे मुकादम पाटील म्हणून नांदत आहेत .
९.तुंग (तुंगार/जगताप/प्रमुख)
थोरल संभाजी राजे (कर्नाटक) हे चाकणकर जगताप यांना तुंग या नावाने संभोदित करायचे.श्री क्षेत्र त्रबकेश्र्वर नासिक ( बारा जोतिरलिंग पैकी एक) येथील पुजा व गाभारातील सोहळ(हक्क) हे तुंगार (जगताप-चाकणकर) परिवाराकडे आहे.
१०-जगताप म्हणजे
जय जगत - जगालाताप.. सूर्या प्रमाण तळपणारे..सुर्य वंशी.. सुर्य फुल ही नाव आहे जगाला ताप सुर्य देतो तो तापमान संतुलीत ठेवतो म्हणून सृष्टी ची निर्मिती व पोषण.करणारे एक उच्च घराणे . तीही एक पदवी असु शकते ..मराठीत ताप म्हणजे तळपणे ... सुर्याप्रमाणे प्रखर असणे
११.जगताप परिवार
कुळदैवत :-म्हाळसाकांत,भैरवनाथ ,गोत्र –अत्री ,देवक -वटवृक्ष
१२.जगताप घराण्याच्या कित्येक शाखा या महाराष्ट्रात विस्तरीत झाल्या आहेत त्यापैकी शाहजी राजे यांच्या जहागीरीतील सासवड कर्याती मधील १० गावांची देशमुखी जगतापाकडे होती .त्यात बारामती परिसरातील जवळच्या काही गावाचा समावेश आहे .त्यात होळ ,मुरूम ,वाकी ,वाणेवाडी, पणदरे,आंबी ,सासवड ,मावडी कडेपठार ,कोथाळे ,लोणी भापकर जवळचे सायंबाची वाडी या गावात आजही जगताप घराण्यातील काही शाखाचे वास्तव्य आहे.
13.पंढरपूर मंदिरात ईशान्य कोपरा बोधले परिवारातील संत श्रेष्ठ हे धामणगाव जगताप लावतात त्यांचे कुलदैवत सोनारी भैरवनाथ! आहे
14. मुखई ( चाकण) हे कुलदैवत असलेले तीन जगताप तेथुन बाहेर पडुन एक वाकी चोपडज, दुसरा मावडी व तिसरा कोथाळ बेलसर. वाकी चोपडज अमृतराय पालखीचे मानकरी तर मावडीचे यशवंतराव भीम ध्वज धारी .आहेत.
© माहिती व संकलन...अनिल दुधाणे
टीप ..सदर कार्यात .. सुभाष जगताप ,प्रशांत जगताप यांची मदत व सहकार्य लाभले..
Comments
Post a Comment