आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ जानेवारी १६५७*
मराठेशाहीत राजघराण्यातील स्त्रिया राजकारणात सक्रिय भाग घेत नसल्या तरी पडद्यामागून सूत्रे हलवीत असत; प्रसंगोपात रणांगणावरही जात असत. त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्याइतका पत्रव्यवहार अन्य-मोगल अथवा राजपूत इतिहासातील स्त्रियांनी केलेला दिसत नाही. ही पत्रंच आज महत्त्वाचा दस्तावेज आहेत.
या पत्रसंभारात शिवमाता जिजाबाईंचे एखादेच पत्र मिळते. अर्थात तेही शिवाजी महाराज मोहिमांत गुंतलेले असताना रयतेच्या तक्रारींचा निवारा करण्यासाठी लिहिलेले हुकूमवजा पत्र असून ते दि. २ जानेवारी १६५७ रोजी लिहिले आहे. त्या पत्रात त्या म्हणतात,‘‘आज रख्तरबाने राजेश्री जिजाबाईसाहेब दामदौलहू बजानेवू हुद्देदारांनी व देसमुखांनी व मोकदमानी मौजे पासांबे पेठ जिजापूर सुभासबा खमसैन अलफ वेदमूर्ती राजेश्री विनायकभट जोसी त्यासी साहेबी मेहरबान होऊनु मिरासी अजरा मऱ्हामतेलंकराचे लेकरी दिधला असे पेठमजकुराची बिता सदरहू मिरासीपणे तुम्हास दिधली असे ती तुम्ही सुखी मिरासपणाचा कारभार करीत जाऊन पेठेचे मामुरी करणे म्हणोन वेदमूर्ति जोसी यास दिधली असे.. तेणेप्रमाणे साहेब चालवतील मो।’’

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ जानेवारी १६६१*
छत्रपती शिवरायांनी मोरेश्वर त्रिमल पिंगळे यांना नवे मुजुमदार नेमले. मोरोपंत पिंगळे शिवशाहीतील एक मानाचे पान. स्वकर्तुत्वाच्या बळावर पुढे आलेले एक असामान्य व्यक्तिमत्व. हिंदुपतपादशाहीच्या राजधानीचा मान ज्या दुर्गाला मिळाला, ते तीर्थक्षेत्र राजगड. या राजगडाच्या बांधणीची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणारी विभूती म्हणजे मोरोपंत पिंगळे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ जानेवारी १६७१*
१६७१ ते १६७४ युवराजांनी राजमाता जिजाऊ आउसाहेबांच्या वृद्धापकाळात मुलकी कारभार सांभाळला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ जानेवारी १६७१*
सरदार सुर्यजी काकडे यांना वीरमरण
साल्हेरच्या युद्धात जय मिळाला, पण आनंदाच्याबरोबर युद्धातील विजय दु:ख घेऊनच येतो. या युद्धात महाराजांचा एक अत्यंत आवडता, शूर जिवलग सूर्याजी काकडे हा मारला गेला. महाराजांना अपार दु:ख झाले. त्यांच्या तोंडूनउद्गार बाहेर पडले, ' माझा सूर्याराऊ पडिला. तो जैसा महा भारतातील कर्ण होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ जानेवारी १६८४*
किल्ले फोंड्याच्या बचावासाठी सुरवातीला मराठ्यांना आपला फिरंगी दारुगोळ्यासमोर निभाव लागणार नाही असे वाटले होते. मोहीम फत्ते झाल्यावर कवी कलशानी धर्माजी नागनाथला लिहून पिरास दरवर्षी ५० होणं उदफुल दिवाबत्तीसाठी दिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ जानेवारी १७३५*
मराठे व पोर्तुगीज यांच्यात १७३० सालानंतर बरेच आमनेसामने झाले. पोर्तुगीजांस पेशव्यांशी युद्ध नको होते. कारण पोर्तुगीजांना मराठ्यांची दहशत वाटत असल्याचे उल्लेख आहेत. पोर्तुगीज व मराठे यांचे चौलच्या मशिदीजवळ २ जानेवारी १७३५ ला झुंज होण्यापूर्वी काही दिवस, बाजीरावांनी सन १७३२ च्या तहास अनुसरून कल्याण व भिवंडी येथील व्यापाऱ्यांसाठी वसईत एक वखार बांधण्यास वसईच्या 'जराल' कडे जागा मागितली होती. परंतु त्याने ति जागा तर दिली नाहीच, उलट खुद्द बाजीरावांस अनुलक्षून 'निग्रो' (Negro) असा अपमानास्पद शब्द वापरला !
ह्या काळी पोर्तुगीज लोक हिंदूस सामान्यतः 'जेंतीव' (अशिक्षित) किंवा 'नेग्रु' (काळा) अशा शब्दाने संबोधीत. वासुदेव जोशी यांनी बाजीरावांना लिहिलेल्या पत्रात लिहितात, 'फिरगियांनी लबाडी केली. पत्र पाठविले त्याचे उतर मगरूरपणे लिहिले याकरिता त्याला ठेचगा द्यावा म्हणून लिहिले. निदान दोन अडीच हजार माणूस व  दीड हजार व दोन हजार स्वार सिद्ध करावे म्हणजे स्वामींचे प्रतापे कार्य सिद्धीस जाते.'
पुढे १७३९ सालात मराठ्यांनी वसई प्रांतातला पोर्तुगीज अंमल पूर्णपणे उठवला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ जानेवारी १७५८*
मराठी सैन्याने नळदुर्ग किल्ला जिंकला
नळ राजाने हा किल्ला बांधला व त्यावरूनच ह्याला नळदुर्ग नाव प्राप्त झाले असे म्हटले जाते. सहाव्या शतकात हा चालुक्यांकडे होता. त्यानंतर सन १३५१ पासून ते सन १४८० पर्यंत तो बहमनी राजवटीखाली होता. पुढे तो आदिलशाहीकडे गेला. सन १५५८ मध्ये स्वतः आदिलशाहने ह्याला भेट दिली व त्याची पाहाणी केल्याचे म्हटले जाते.
सध्याचे बांधकाम सुलतान अबुल मुझफ्फर अली आदिलशाहने सन १५६० च्या आसपास केल्याचे म्हटले जाते. त्यावेळी ह्याला शाहदुर्ग असे नाव दिले गेले होते. सन १६७७ मध्ये मुघलांनी हा जिंकला व नंतर औरंगजेबने तो हैदराबादच्या निजामाला दिला. २ जानेवारी १७५८ ला नानासाहेब पेशवा, विश्वासराव, सदाशिवराव व दत्ताजी शिंदे च्या मराठी सैन्याने हा किल्ला जिंकला. मराठेशाहीच्या शेवटी निजामने हा परत जिंकून घेतला.
सन १९४७ मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेलांच्या लढ्यानंतर हा किल्ला भारतात विलीन झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ जानेवारी १७६६*
छत्रपती राजारामांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरातून छत्रपती ताराराणी स्वराज्याचा कारभार पाहात होती. छत्रपती शाहू आणि ताराबाई यांच्यात झालेल्या वारणेच्या तहानुसार मालवण परिसराचा ताबा छत्रपती ताराराणींकडे आला. मालवण समुद्रावर चाचेगिरीला ऊत आला होता. मेजर गॉर्डन व कॅप्टन वॉटसन यांनी सिंधुदुर्ग  ताब्यात घेतला. त्यावेळी किल्ल्यातील दारुखाना जळून खाक झाला इंग्रजांनी किल्ल्याचे नाव ठेवले.‘‘फोर्ट ऑगस्टस‘‘ कोल्हापूरच्या राणी जिजाबाई व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील करारानुसार २ जानेवारी १७६६ रोजी सिंधुदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात आला. निपाणिच्या देसाई विरूद्ध इंग्रजांनी करवीरकरांना मदत केली. त्याच्या मोबदल्यात १७९२ ला हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ जानेवारी १८४८*
क्रांतिकारक राघोजी भांगरेंना अटक
इंग्रज अधिकारी लेफ्टनंट गेल याने चंद्रभागेच्या काठी राघोजीला अटक केली. कसलाही विरोध न करता राघोजीने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. साखळदंडात करकचून बांधून त्याला ठाण्याला आणले. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. विशेष न्यायाधीशांसमोर राजद्रोहाच्या खटल्याची सुनावणी झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या निधड्या छातीच्या शूर वीराचे वकील पत्र घ्यायला कोणीही पुढे आले नाही. वकील न मिळाल्याने राघोजीची बाजू न मांडली जाताच एकतर्फी सुनावणी झाली! राघोजीला दोषी ठरविले गेले. त्याला फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ जानेवारी १७५७*
प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ जानेवारी १८८८*
तळेगाव ढमढेरे येथे क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळेंचा जन्म झाला. 
अमेरिकेत गदर पार्टीची स्थापना झाली आणि गदर पार्टीच्या कामाने आतंरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची प्रतिमा उजळून निघाली. हे म्हणण्याच स्वच्छ कारण की आजही अमेरिकेतल्या अनेक websites वर गदर पार्टीच्या इतिहासाची माहिती उपलब्ध आहे. गदर पार्टीच्या कामामध्ये लाला हरदयाळ, सोहनसिंग भकना, भाई परमानंद, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे हे अर्ध्वयू होते. पण या सगळ्यांमध्ये खूपदा भूमिगत काम कराव लागत असल्याने महाराष्ट्रात फारसे प्रसिद्ध नसलेले पण महाराष्ट्रातील अगदी पुण्याजवळील तळेगाव ढमढेरे येथे जन्माला आलेले 'क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे' ह्यांच चरित्र अनन्यसाधारण आहे. त्यांच्या गदर पार्टीमधल्या कामाचा खुद्द सर मायकेल ओडवायर प्रशंसक होता. त्यांची दुर्दम्य स्वातंत्र्यलालसा,शस्त्रे नि स्फोटके हाताळण्यातील प्राविण्य, संकटात बेधडक उडी घेण्याची धडाडी, भविष्याविषयी प्रचंड बेफिकीर पणा, मरणाला निर्भिड पणे सामोरे जाण्याची ताकद यांमुळे ते खरोखर एक क्रांतिरत्न होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ जानेवारी १९४३*
पहाटे मुरबाड जवळील सिध्दगडाच्या पायथ्याशी एका ओढ्याकाठी वीरभाई कोतवाल त्यांचे सहकारी व इंग्रज यांच्यात रणसंग्राम सुरू होता . यामध्ये वीरभाई कोतवाल व त्यांचे सहकारी हिराजी पाटील शहीद झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४