अहंकाराचा झंझावात
🚩⚜️🌹💎 अहंकाराचा झंझावात 💎🌹⚜️🚩
🚩 संत ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदाना’ची मराठी मनाला चांगली ओळख आहे. परंतु संत नामदेवांच्या हृदयातून स्फुरलेल्या या प्रार्थनेचा परिचय वारकरी संप्रदायातील लोकांव्यतिरिक्त फार कमी लोकांना आहे.
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा।
माझिया सकला हरिच्या दासा।। १।।
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी।
ही संत मंडळी सुखी असो।। २।।
अहंकाराचा वारा न लागो राजसा।
माझ्या विष्णुदासा भाविकांसी।। ३।।
नामा म्हणे तया असावे कल्याण।
ज्या मुखी निधान पांडुरंग।। ४।।
🚩 ज्ञानदेव आणि नामदेव या दोघांचा संबंध खूपच गहिरा. एक ज्ञानाचा सागर तर दुसरा प्रेमाचा पाझर. विठ्ठल हा दोघांना एकत्र आणणारा दुवा. एकच भागवत कुल असलेल्या या दोघा संतांनी महाराष्ट्राच्या भूमीवर अपार उपकार करून ठेवले आहेत. ज्ञानोबा कोण होते, काय होते, हे नामदेव महाराजांच्या अभंगामुळे लोकांना कळले.
🚩 आजही त्यांनी लिहिलेले ‘समाधीचे अभंग’ वाचले की साक्षात ज्ञानोबा माऊली डोळ्यासमोर येते. माऊली समाधी घेणार म्हणून कावरी बावरी झालेली मुक्ताबाई समोर उभी राहते. साक्षात विठ्ठल रखुमाई समाधीप्रसंगी कसे व्याकूळ झाले होते, याचे शब्दचित्र नामदेवराय आपल्यासमोर उभे करतात. अर्थात त्याला कारणही तसे आहे.
🚩 नामदेवराय म्हणजे विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर खेळलेले लडिवाळ बाळ, त्याने फक्त हाक मारताच ते सावळे परब्रह्म त्यांच्यासमोर सगुण साकार रुपामध्ये प्रगट होत असे. असा अधिकार असणा-या नामदेवरायांमुळे भागवत धर्माची पताका चंद्रभागेच्या काठावरून गंगा-यमुनेच्या तीरावर जाऊन पोहोचली.
🚩 भीमेच्या काठी जसा वारकरी वैष्णवांचा मेळा जमत असे, तसा मेळा उत्तरेतील सुजलाम-सुफलाम परिसरात भरू लागला, तो केवळ नामदेवरायांमुळे. तर असे हे नामदेव महाराज ज्यावेळी प्रार्थना करतात, तेव्हा ती प्रार्थनाही अंतरीच्या आत्मकमळाला ‘अभंगत्व’ देऊन जाते.
जेव्हा ते सकळ कुळाच्या कल्याणाची अभिलाषा धरतात, तेव्हा अवघे विश्व सद्भावनेच्या शांत शितल प्रकाशात उजळून निघते.
🚩 हरिचे दास आणि त्यांची परंपरा मानणारे कुळ पिढय़ान्पिढय़ा टिकावे, अशी आर्त प्रार्थना नामदेवराय करतात. त्यांनी ‘आकल्प आयुष्याची’ कामना केली, म्हणूनच कदाचित महाराष्ट्रात पांडुरंग कृपेने भक्तीचा मळा फुलला. अठरा पगड जाती-जमातीमधील संतांनी पांडुरंगाच्या नावाचा गजर करत महाराष्ट्र भूमीतील आध्यात्मिक प्रवाह सतत प्रवाहित ठेवला.
🚩 नामदेवरायांची प्रार्थनापण किती गोड. ते काय मागतात तर हरिच्या दासांनी कल्पनेची बाधा, संशय पिशाच्छाचा संसर्ग आपल्या तन-मनाला होणार नाही याची दक्षता बाळगावी. "या राजस आणि राजयोगी भाविकांना अहंकाराचा थोडाही वारा लागू नये" असे मागणे मागतांना नामदेवराय एक आश्वासन स्पष्टपणे देतात की, ज्याच्या मुखात पांडुरंगाचे नाव असेल, त्याचे चिरकल्याण झालेच म्हणून समजा.
🚩 "मनातील संशय" हा देवाजवळ, सद्गुरूजवळ जाण्यापासून रोखतो, कारण संशय भ्रम वाढवतो आणि भ्रमामुळे दृष्टी अंध होते. अंधासमोर साक्षात परमेश्वर उभा असला तरी त्याला तो कसा दिसणार, शक्यच नाही. तद्वत संशय आत्मज्योतीला झाकोळून टाकतो. तीच गोष्ट अहंकाराची असते.
🚩 एकदा का अहंकाराचा झंझावात सुटला की, भले-भले योगी तपस्वी यांचा संयम अंगावरील उपरण्याप्रमाणे उडून जातो. त्यामुळे संशय आणि अहंकार या दोन गोष्टीपासून तुम्ही दूर रहा, तर तुम्हाला हरिच्या कुळामध्ये चांगले स्थान लाभेल असे नामदेवरायांचे आश्वासन आहे.
🚩 प्रत्येक मुमुक्षूने नामदेवरायांचा हा अभंग रोज किमान एकदा तरी म्हणावा असे वारकरी संप्रदायातील सर्वच संतांनी सांगितले आहे. भजन, कीर्तन, प्रवचनाच्या शेवटीसुद्धा अनेक मंदिरात हा अभंग आवर्जून घेतला जातो. कारण त्या अभंगात हरीच्या कुळाच्या अखंडत्वाची, ऐक्याची आणि अमरत्वाची प्रार्थना आहे.
Comments
Post a Comment