*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*
शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष
१२ फेब्रुवारी इ.स.१५०२
एका व्यापारी जहाजातून पोर्तुगीज सरदार वास्को-द-गामा २० मे १४९८ रोजी कालिकत बंदरात येऊन दाखल झाला. गोव्याला भेट देऊन तो २९ ऑगस्टला परत गेला. त्यानंतर १२ फेब्रुवारी १५०२ ला तो मोठं आरमार घेऊन परत आला. रेशीम व सोने यांची लुटालूट करून परत गेला.
*१२ फेब्रुवारी इ.स.१६७४*
छत्रपती शिवरायांनी बेहलोलखान आणि दिलेरखान यांचा पराभव केला ज्या खाना मुळं आपण स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर काकांना गमावून बसलो त्याच बेहलोलखानाचा आणि दिलेरखानाचा छत्रपती श्री शिवरायांनी पराभव केला.
*१२ फेब्रुवारी इ.स.१६८५*
सावंताने संभाजी महाराजांवर मोहीम सुरु करून वेंगुरल्याच्या खाडीत आरमार नेऊन पुष्कळ लूट केली. हे वर्तमान संभाजी महाराजास समजताच ते त्वरेने कोकणात उतरून सावंतावर चालून आले.
*१२ फेब्रुवारी इ.स.१६८५*
*(माघ वद्य ३, त्रृतीया, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार गुरुवार)*
धरण गावाची दुसरी लुट!
अखबारातून धरणगाव मराठ्यांनी पुन्हा एकदा लुटल्याची माहिती मिळते. आधी ४ वर्षांपूर्वी सुद्धा मराठ्यांनी धरणगावात धुमाकूळ घातला होता. ४ वर्षांत याची परत पुणराव्रृत्ती होऊन मराठ्यांनी या प्रदेशात धुम माजवली. निळो मोरेश्वर व रंगराव हे ६०० ते ७०० स्वारांनिशी धरणगावला पोहोचले. त्यांनी इंग्रजांची वखार जाळली. मराठे खोलवर घुसून दहशत कशी माजवतात याचा प्रत्यय इंग्रजांना व मोगलांना धरणगावच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला.
*१२ फेब्रुवारी इ.स. १६८९*
छत्रपती संभाजी महाराज हे कैदेत पडल्याने व त्यांची सुटका ही अशक्यप्राय झाल्याने रिकाम्या झालेल्या राजसिंहासनावर वारस बसविणे हे क्रमप्राप्त झाले होते छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज हे अवघे ७ वर्षाचे होते व राजाराम महाराज हे १८-१९ वर्षाचे अशा समयी महाराणी येसूबाईसाहेब यांच्या समोर दोनच पर्याय होते एक म्हणजे आपला पुत्र शाहू महाराज यांना वारस घोषित करून छत्रपती बनवणे व सर्व राजसत्ता आपल्या ताब्यात घेणे आणि दुसरा म्हणजे राजाराम महाराज यांना वारस घोषित करून राज्यकारभाराची सूत्रे ही प्रमुख अष्टप्रधानमंडळाच्या हाती सोपविने. !
अशा वेळी दुसऱ्या कोणत्याही स्त्रीने आपल्या मुलाच्या सर्वप्रथम विचार केला असता परंतु त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सून व छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाईसाहेब होत्या त्यांनी राजाराम महाराजांना वारस म्हणून घोषित केले आणि राज्याभिषेक न करता त्यांचे मंचकारोहन केले कारण राज्याभिषेक हा निवांत वैभवाने करायचा समारंभ होय.
*१२ फेब्रुवारी इ.स.१७४२*
पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात.नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.
*१२ फेब्रुवारी इ.स.१७५६*
११ फेब्रुवारी रोजी इंग्रजी आरमार विजयदुर्गवर मोर्चेदाखल झाले. इकडे जमिनीवर रामाजी महादेवांची फौज तयारच होती. इंग्रजांचे आरमार चालून येत आहे, हे पाहून आधीच दि. ८ फेब्रुवारी रोजी तुळाजींनी आपल्या मेहुण्यास विजयदुर्गाचा ताबा देऊन ते रामाजीपंतांच्या छावणीत भेटावयास आले. पण पेशवे आणि तुळाजी यांच्यातील इतक्या वर्षांच्या वैमनस्यामुळे चटकन निर्णय आणि वाटाघाटी होईना. तीन दिवस उलटले आणि चौथ्या दिवशी १२ फेब्रुवारी रोजी इंग्रजांचा विजयदुर्गावर भडिमार सुरू झाला. वॉटसनने मुंबईला कळवले, "तुळाजी आंग्र्यांचे व पेशव्यांचे (रामाजीपंतांचे) तहाचे बोलणे चालत असल्याचे मला कळले, तेव्हा तुळाजीस याबाबतीत अवकाश द्यायचा नाही, असा निश्चय करून, एकदम किल्ल्या स्वाधीन करून देण्याविषयी मी त्यास निरोप पाठविला. ठरलेल्या वेळात जबाब न आल्याने व पेशवेही जरा वेळ काढीत आहेत असे पाहून दि. १२ रोजी आम्ही किल्ल्यावर मारा सुरू केला." १२ तारखेला संध्याकाळी ४ च्या सुमारास इंग्रजांच्या तोफेचा एक गोळा आंग्र्यांच्या एका जहाजाच्या दारूखान्यावर पडून त्या जहाजाने पेट घेतला. या भडक्यात आसपासची इतरही जहाजे एकदम पेटली. आंग्र्यांच्या आरमारातील ७४ तोफांचे एक गुराब, त्याहून थोड्या लहान आकाराच्या ८ गुराबा आणि ६० गलबते उळून खाक झाली.
*१२ फेब्रुवारी इ.स.१७९४*
एप्रिल १७९३ मध्ये नाना फडणीस व महादजी शिंदे यांचा समेट झाला. १ जून १७९३ ला बावांच्या सैन्याने होळकर सैन्याचा सपशेल पराभव लाखेरी येथे केल्यावर पुणे दरबारने बावांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर महादजीबावांस ताप ज्वर येऊ लागला. आठ दिवस सारखा ज्वर येतो हे कळल्यावर खुद्द पेशवे एक वेळ समाचारास गेले होते. नानाही जाऊन आले. हरीपंत तात्या तर एक दोन दिवसाआड नेहमी जात होते. यापुढे महादजीबाबा जवळ जवळ आठ महिने थोडे थोडे आजारीच होते असे म्हणावे लागते. फेब्रुवारी १७९४ त महादजीबावांची भयंकर शीतज्वराची भावना झाली. पांच सात रोज यातच गेले, नंतर कफ झाला. वैद्य आणून औषधे चालू केली पण लागू होईना, चढ होत चालला. बोलणे राहिले. बुधवार त्रयोदशीस सायंकाळी नाना समाचारास आले. बोलणे झाले नाही. तसेच श्रीमंतांकडे जाऊन वर्तमान सांगितले, पेशवे महाराजांजवळ येऊन उभे राहिले. चिंता वाटली. सुवर्णतुला करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सुवर्णतुला केली. बोलले नाहीत. दुखणे वाढत जाऊन काल जाहला. (१२ फेब्रुवारी १७९४). मृत्युसमयी महादजींचे वय ६७ वर्षाचे होते. ते वानवडीस निवर्तले. त्या ठिकाणी दौलतराव शिंदे यांनी त्यांची छत्री बांधली. तिच्या खर्चास पेशवे यांनी ५ सप्टेंबर १७९५ रोजी १ चाहूर जमीन छत्रीचे लगत देवविली. ही छत्री पुढे माधवराव शिंद्यांनी वाढवून टोलेजंग केली. पुण्याच्या ऐतिहासिक स्मारकात त्याची गणना होते. महादजीबावांनी आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून नऊ लग्ने केली पण त्यांना पुत्र लाभ झाला नाही. मृत्यूपूर्वी काही महिने अगोदर त्यानी आपल्या चुलत भावाचा १४ वर्षाचा मुलगा दौलतराव यास दत्तक घेतले. दौलतरावाचा जन्म १७८० चा असून त्याच वर्षी त्याचा समकालीन रणजीतसिंग जन्मला.
दौलतरावांचे दत्तविधान यथाविधी झाले नव्हते असे दिसते. बावा मरण पावल्यावर तेरावे दिवशी त्याचे दत्तविधान करून पेशव्यांनी त्यास शिंद्यांचे दौलतीवर स्थापन केले. (१० मे १७९४).
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
Comments
Post a Comment