अध्यात्म म्हणजे काय आणि तत्त्वज्ञान म्हणजे काय हे पाहूया.
आत्मनि इति अध्यात्मम्।
आत्म्याशी संबंधित जे काही, त्याला अध्यात्म म्हणतात.
मनुष्य हा स्वतःला देहरूप समजतो आणि हेच सगळ्या दुःखांचे मूळ आहे, स्वतःचे मूळ आत्मस्वरूप जाणण्याच्या प्रयत्नांना अध्यात्म असे म्हणतात.
तत् म्हणजे ते. That हा अर्थ असणारे, तत् हे संस्कृतमधील एक सर्वनाम आहे. या तत् ला, त्व हा प्रत्यय जोडलेला आहे.
मराठीत, सुंदर या शब्दाला ता हा प्रत्यय जोडला तर, सुंदरता हा शब्द तयार होईल. सुंदर हा शब्द कोणाचेतरी विशेषण होईल आणि सुंदरता हा शब्द मात्र, त्या सुंदर व्यक्तीचा / वस्तूचा गुणधर्म दाखवणारा शब्द होईल. तर हा ता प्रत्यय आणि वर सांगितलेला त्व हा प्रत्यय, हे दोन्ही प्रत्यय संस्कृतमधलेच आहेत, आणि दोघांचेही काम तेच आहे.
मग आता, तत् + त्व याचा अर्थ झाला = त्यामधील / त्याचे गुणधर्म.
तत्त्व + ज्ञान = त्यामधील / त्याच्या गुणधर्मांचे ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान.
आता एकच मुद्दा राहिला, या तत् शब्दाने काय अभिप्रेत आहे ?
उत्पन्न झालेली प्रत्येक अन् प्रत्येक वस्तू, ( अणूपासून ताऱ्यापर्यंत ),
या स्थूल वस्तूंच्या ( सृष्टीच्या / ब्रह्मांडाच्या ) मुळाशी असलेले चैतन्य आणि या स्थूलाचा - सूक्ष्माचा परस्परसंबंध या सगळ्या बाबींचा सखोल विचार म्हणजे तत्त्वज्ञान.
तत्त्वज्ञान हे, अध्यात्मात प्रगती करण्यात मदत करणारे एक साधन आहे. अध्यात्म हे साध्य आहे, तर तत्त्वज्ञान हे त्याचे साधन.
त्यामुळे, अध्यात्म आणि तत्त्वज्ञानात, साध्य - साधन हा संबंध आहे.
संदर्भ : अध्ययन.
Comments
Post a Comment