शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*
*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*
**********************************
*२२ मार्च इ.स.१६६६*
पोर्तुगीज हिंदुस्थानचा कॅप्टन जनरल आंतोनियू द मेलू द काश्त्रू याने सल्लागार मंडळाची बैठक बोलावली. इ.स.१६६६ रोजीच्या मार्च महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला. तो लढविण्यासाठी अंत्रूज महालातील विजापुरच्या अंकीत असलेल्या मोकासदार देसायांनी पोर्तुगिजांकडे दारुगोळ्यांची आणि शस्त्रांस्त्रांची मदत मागितली. देसायांच्या विनंतीचा विचार करण्यासाठी पोर्तुगीज हिंदुस्थानचा कॅप्टन जनरल आंतोनियू द मेलू द काश्त्रू याने राज्य सल्लागार मंडळाची बैठक बोलावली.
*२२ मार्च इ.स.१६७४*
( फाल्गुन वद्य एकादशी, शके १५९५, संवत्सर प्रमादी, रविवार )
आनंदराव काकांचे बेहलोलला सडेतोड उत्तर :-
सरनौबत प्रतापराव गुजर काका आणि ६ शूर मावळे शिवरायांच्या शब्दाखातर स्वराज्यासाठी प्राण गमावून बसले. ही बातमी आनंदरावांनी महाराजांना कळवली आणि दिलासा दिला की " सेनापती पडले तरी राग न धरणे, त्यांच्या जागी मी आहे ". महाराजांना आता प्रश्न पडला की, सरनौबत कोण करावा? आलेल्या पत्रांस महाराजांनी आनंदरावांना उत्तर दिले की, " आपण तूर्त त्यांच्या वेतनावर काम करावे. मात्र शत्रूची याद राखावी ".महाराजांच्या आज्ञेने आनंदराव काकांची हुरूप वाढली. हेरांकरवी माहिती काढत काकांनी गनिमी कावा वापरून बेहलोलच्या मुलखात घुसून त्राही माजवली. आनंदराव काका सरळ कानडी मुलखात घुसले. बांकापूरपासून २५ मैलांवर पेंच गावावर स्वारी करून संपत्ती प्राप्त केली. त्यानंतर संपगावचे संपन्न पेठेवरही स्वारी करू धनसंपत्ती प्राप्त केली. ३००० बैल लागले ही संपत्ती स्वराज्यात आणायला.
*२२ मार्च इ.स.१६८०*
महाराजांना ज्वराची बाधा!
सूर्यग्रहण आटोपले. आणि त्यानंतर दोनच दिवसांनी महाराजांना ज्वराची बाधा जानवू लागली. महाराजांचे राजवैद्य मोरेश्वर पंडीतराव शर्थ करीत होते. हकीम उपचारांची पराकाष्ठा करत होते. मात्र एकाएकी महिराजांची प्रक्रृती घसरणीसच लागली. किल्ले रायगडावर यावेळी महाराणी सोयराबाईसाहेब, युवराज राजाराम महाराज, प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत अमात्य, राहूजी सोमनाथ, हीरोजी फर्जंद, सुर्याजी मालुसरे, मोरोपंत पेशव्यांचे चिरंजीव निळोपंत आदी मुत्सद्दी हजर होते.
*२२ मार्च इ.स.१६८२*
(आधिक चैत्र वद्य नवमी, शके १६०४, संवत्सर दुदुंभी, वार बुधवार)
तब्बल पाच वर्षे मराठ्यांची झुंज!
औरंगजेब बादशहा औरंगाबदेला पोचला आणि वेळ न दवडता लढाईचे मनसूबे आखु लागला. त्याने लढाईची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती. बादशाहला वाटले होते की अगदी थोड्याच अवधित मोघली फ़ौज मराठ्यांचा हा मुलुख काबिज करील आणि म्हणुनच त्याने आधी मराठ्यांचे किल्ले घेण्याचे ठरविले.
त्याने शहाबुद्दीन फिरोजजंग याला रामसेज किल्ला जिंकण्यासाठी रवाना केले. शहाबुद्दीखान सोबत शुभकर्ण बुंदेला - रतनसिंह हे पितापुत्र, दलपत बुंदेला हे कसलेले सरदार होते. तर रामसेजच्या किल्लेदाराची शिबंदी होती केवळ ५०० मराठ्यांची !
संख्येने कमी असले तरी या मुठभर मर्द मावळ्यांनी शहबुद्दीखान आणि त्याच्या सगळ्या सरदारांना सळो कि पळो करून सोडले. किल्ल्याला सुरुंग लावणे. मोर्चे बंडाने असे अनेक उपाय करूनही रामसेज दाद देईना तेव्हा खानाने लाकडी धाम्धामे (बुरुज) उभे करून त्यावरून किल्ल्यावर गोळ्यांचा मारा सुरु केला. पण मराठ्यांनी शहाबुद्दीन खानाचे सगळे मनसुबे उधळून लावले.
किल्ल्यावरचे मराठे शरण येत नाहीत हे कळताच औरंजेबाने कासिमखानाला शहाबुद्दीन खानाच्या दिमतीला पाठवले.
किल्ल्यावरची अल्प शिबंदी एवढ्या मोठ्या फौजेच्या वेढ्याला किती काळ टक्कर देणार? शहबुद्दीनखानाचा वेध मोडून काढण्यासाठी शंभूराजांनी मानाजी मोरे व रुपाजी भोसले यांना पाठवले. शहाबुद्दीन खानाच्या तोफा गडाच्या बुरुजावरील दरवाजावर एकसारख्या आग ओकू लागल्या. भिंत कोसळली आणि अनेक सैनिक जखमी झाले. वेढा उठवण्यासाठी रुपाजी भोसले रामसेजच्या पायथ्याशी येऊन मोगलांना भिडले. घनघोर युद्धाला तोंड फुटले. करणसिंह या मोगली सरदारावर त्वेषाने तुटून पडलेले रुपाजी भोसले तलवार गाजवताना स्वतः जखमी झाले
इरेला पेटलेला खान आता निर्णायक विजय मिळवण्यासाठी किल्ल्याच्या दरवाजाला भिडला. त्याने मोर्चे लावले आणि लाकडी धमधमा (बुरुज) उभा करून तो किल्ल्यातील मराठ्यांवर एकसारखा गोळ्यांचा मारा करू लागला. इतक्यात वेढा फोडण्यासाठी मराठ्यांची ताज्या दमाची नवी कुमुक आली आणि त्यांनी मोगलांवर एकच हल्ला केला. किल्ल्यात येऊन घुसलेल्या चारही सैनिकांना मराठ्यांनी कापून काढले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे खानची प्रचंड मोठी हानी झाली आणि गुडघे टेकून त्याने माघार घेतली.
संतापलेल्या औरंजेबाने शहाबुद्दीन खानाला माघारी बोलवून त्याजागी बहादुर खानाची नेमणूक केली. १५,००० फौजेनिशी बहादुरखानाने रामसेजला विळखा घातला होता. मराठे आणि मोगल एकमेकांचे हल्ले चुकवून आपल्या सैनिकांना रसद पुरवत होते. शरीफखान नावाचा मोगली अधिकारी बहादुरखानाला रसद पुरवण्यासाठी निघाला होता. ७००० मराठे एकाचवेळी त्यावर तुटून पडले आणि त्यांनी जाहीरखान फैजुल्लाखान अशा अनेक सरदारांना कापून काढले. मोगलांची जबरदस्त पिछेहाट झाली.
मराठ्यांच्या शौर्याला कोणतीही माया लागू होत नाही हे पाहून बहादूर खानाने एक योजना आखली. एका बाजूने लढाईची तयारी चालू आहे असे दाखवायचे. किल्ल्याच्या या बाजूला दारुगोळा, तोफखाना आणि मोगल सैन्याची हालचाल दाखवून मराठ्यांच्या डोळ्यात धूळ फेकायची आणि दुसऱ्या बाजूने कोणतीही चाहूल लागू न देता निवडक सैन्याने गडावर चढायचे असा बेत आखला. सावध असलेल्या रामसेजच्या किल्लेदाराने बहादुरखानाचा हा डाव अचूक ओळखला.
ज्या बाजूने मोगल किल्ल्यावर हल्ला चढवायचे भासवत होते तिथे मराठा किल्लेदाराने नगारे, नौबती, कर्णे अशा रणवाद्यांचा कल्लोळ सुरु केला. किल्ल्यावरून खाली दगडांचा मारा सुरु झाला. तेलाने पेटवून माखलेले कपडे पेटवून खाली फेकण्यात येऊ लागले आणि दुसरीकडे बहादूर खानाचे सैन्य ज्या बाजूने वर चढणार त्या ठिकाणी सशस्त्र मावले दबा धरून बसले. बहादूर खानाचे बेसावध मोगली सैनिक गडावर पाय ठेवतात न ठेवतात तोच ते मराठ्यांच्या तलवारीचे बळी ठरले. मोगली सैनिकांच्या किंकाळ्या आसमंतात दुमदुमल्या आणि वरून कोसळणाऱ्या सैनिकांमुळे खालून वर चढणारे हि थेट खाली आपटले. किल्लेदाराने बहादूर खानची चांगलीच फजिती केली.
बहादूर खानाने वेढा उठवण्याची तयारी सुरु केली, बादशहाच्या हुकुमानुसार खाली मान घालून तो परत फिरला. किल्ल्यावर मोर्चे बांधण्यासाठी व चढाई करण्यासाठी त्याने प्रचंड लाकडे साठवली होती. ती सगळी लाकडे त्याने परत जाताना पेटवली. पण बादशहाची हौस अजून फिटली नव्हती म्हणूनच त्याने कासीमखान किरमाणी या सरदाराची या वेढ्यासाठी नियुक्ती केली. पण तरीही रामसेज झुकला नाही. मराठ्यांच्या तळपत्या तलवारीचे चटके कासीम खानाला सहन झाले नाहीत. सगळे वार झेलून आणि सगळे हल्ले परतवून रामसेजच्या बालेकिल्ल्यावर भगवा जरीपटका अजूनही डौलाने फडकतच होता. रामसेजचा तो किल्लेदार म्हणजे मूर्तिमंत शौर्याचा धगधगता आविष्कार, त्या नररत्नाच नाव दुर्दैवाने आजही इतिहासालाच्या पानात सापडत नाही हे दुर्दैव. त्याच्या विलक्षण धैर्याचा आणि अतुलनीय शौर्याचा मनाचा पोशाख, रत्नजडित कडे आणि रोख रकमेचा पुरस्कार देवून म्हणून त्याची नियुक्ती दुसऱ्या एका प्रमुख किल्ल्यावर केली आणि रामसेज वर दुसरा किल्लेदार नेमण्यात आला.
किल्लेदाराच्या आणि मराठ्यांच्या हातून घडलेल्या या अद्वितीय पराक्रमाची किंचित सुद्धा जाणीव त्यांना स्वतःला नव्हती. राजपूत, शिख, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि अश्या अनेक शत्रूंच्या राजधान्या काही दिवसात खालसा करणाऱ्या या मोघली फौजेला अर्ध्या दशकाहुन अधिक काळ नुसत्या रामसेजने झुंजवले.
*२२ मार्च इ.स.१६८८*
छत्रपती संभाजी महाराजांचे हडकोळण येथील शिलालेख!
छत्रपती संभाजी महाराजांनी फोंड्याच्या देशाधिकारी धर्माजी नागनाथ यांस कळविले, सापनायक तिमनाय याने अंत्रूज येथे मुसलमानी राज्यात अंगभाडे घेत नव्हते त्यावेळी लोक सुखी होते. आता हिंदुराज्य आल्यावर तो कर चालू आहे तरी तो बंद करावा असे कळविले. तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी तो कर बंद केला. हडकोळण येथील शिलालेख आजही इतिहासात उपलब्ध आहे.
*२२ मार्च इ.स.१६९०*
राजाराम महाराजांचे मराठा सरदारांना पत्र
शंभू छत्रपतींच्या निर्वाणानंतर उत्साहात असलेल्या मोगली फौजेला बाल शाहू व येसूबाईंना कैदेत टाकल्यावर राजाराम महाराजांचे नेतृत्व डाचत होते. कसे का होईना पण संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर मराठी सैन्याला मुजरा करण्यास राजाराम महाराजांचे अस्तित्व हि एकच जागा होती... राजधानी पडल्यावर आणि अभिषिक्त राजा मरण पावल्यावर मोठी मोठी साम्राज्य कोलमडतात, धुळीस मिळतात पण राजाराम महाराजांचे जिंजीकडे पलायन हि तत्कालीन जनतेची प्रेरणा होती. संपूर्ण पलायनाच्या मार्गात शिवछत्रपतींची आणि शंभूछत्रपतींची पुण्याई राजाराम महाराजांच्या पाठी उभी होती. त्याच्या उदाहरणासाठी चन्नमा राणीचे उदाहरण लक्षणीय आहे. मोगलांना राजाराम महाराज हवे होते ह्यासाठी पोर्तुगीजांनाही पत्रे मोगल अधिकारी धाडत होते. केवळ एका महिन्यात मोगलांचा पाठलाग पाठीवर घेऊन राजाराम महाराज पाचशे मैलांचा पल्ला गाठून जिंजीस पोहोचले. ह्यात खंडो बल्लाळ, रुपाजी भोसले, प्रल्हाद निराजी, घोरपडे बंधू ह्यांचे योगदान अनन्य साधारण आहे.राजाराम महाराज जिंजीवर स्थानापन्न होणे ह्या घटनेचा तत्कालीन राजकीय अर्थ मोठा आहे त्यातून मराठ्यांची गादी जिवंत आहे हे दख्खनच्या पठारावर मुक्कामाला वैतागलेल्या मोगल सैन्याला खचवायला कारणीभूत होते. कायद्याने आणि वारसा हक्काने का होईना पण मराठ्यांना नेतृत्व ह्याच घटनेने प्राप्त झाले. मराठ्यांच्या अंगभूत पराक्रमाला राजाराम महाराजांनी उत्तेजनच दिले "हूकूमतपन्हा " ह्या पदावर रामचंद्रपंत आमात्य. सेनापती पदावर संताजीबाबा, परसोजी भोसलेंना "सेनासाहेब सुभा" हे पद देऊन गोंडवन, वर्हाड प्रांतात कामगिरी सांगितली. गुजरातेत खंडेराव दाभाडे नेमून त्यांस "सेनाधुरंधर" पद दिले. महाराष्ट्रात आक्रमक झालेल्या मोगलांची ताकद विभागली गेली ती ह्याच राजकारणामुळे. राजकारणाचा कोणताही प्रत्यक्ष अनुभव नसताना. हाती सत्ता मर्यादित असताना. पैश्याचा अभवा ह्या गोष्टिंवर मात करुन राजाराम महाराजांनी केवळ लोकसंग्रह, मसलत आणि चांगुलपणावर स्वराज्य तारले. २२ मार्च १६९० च्या एका पत्रात राजाराम महाराज म्हणतात, "स्वामींच्या पायाशी एकनिष्ठता करुन, स्वामिकार्य साध्य होय ते करणे. गनिमाचा हिसाब काय आहे? तुम्हि लोक जेव्हा मनावरी घेता, तेव्हा गनीम तो काय आहे ?ते तुम्हिच लोक या राज्याची पोटतिडीक धरता, तेव्हा औरंगजेबाचा हिसाब धरित नाही? ह्या पत्रातली ओळ आणि शब्द उत्तेजकच आहेत. खचलेले मराठी मन उभे केली ते ह्याच शिवपुत्र
*२२ मार्च इ.स.१७०२*
गोव्याचा हंगामी गव्हर्नरने सिंधुदुर्गचे किल्लेदार बुरानजी मोहीते यांस लिहीलेल्या पत्राची नोंद!
"आमचे जे एक जहाज तुम्ही तुमच्या बंदरात अटक करून ठेवले आहे ते सोडून देण्याबद्दल मी तुम्हाला पत्र पाठविले होते. तुम्ही पत्रोत्तरी कळविले होते की, तुमचे जहाज सोडून देण्यात येत आहे. सदर्हू जहाजावरील खलाशांना चांगली वागणूक दिल्याबद्दल मी तुमचे आभारही मानले होते. परंतु त्या जहाजाच्या कॅप्टनचे मला जे पत्र आले आहे त्यावरून तुम्ही ते जहाज अद्याप मुक्त केलेले नाही असे दिसून येते. तुम्ही हे जहाज इतके दिवस का पकडून ठेवले आहे तेच आम्हाला कळत नाही"
*२२ मार्च इ.स.१८१६*
दुसऱ्या राघोजीराजांच्या मृत्यू
मराठ्यांच्या इतिहासात नागपूर हे ठिकाण खूप महत्वाचे. नागपूरचे राज्य स्थापन करणारे प्रथम रघुजीराजे भोसले. ज्यांनी स्वकर्तृत्वावर प्रचंड दौलत निर्माण केली. त्यांना चार मुले होती. परंतु त्यांच्यातील भाऊबंदकमुळे भोसल्यांच्या सत्तेचा रघुजीकालीन दबदबा राहिला नाही. यामुळे ओरिसा-बंगाल भागाकडे दुर्लक्ष झाले आणि इंग्रजांना बंगालमध्ये आपली सत्ता बळकट करता आली. दुसरे रघुजी भोसले (इ.स. १७८८ ते इ.स. १८१६) यांच्या काळात १८०३ पर्यंत भोसल्यांच्या सत्तेचा सुवर्णकाळ होता.वर्धा नदीपासून ते ओरिसातील सुवर्णरेखा नदीपर्यंत आणि उत्तरेला नर्मदापासून ते थेट गोदावरीपर्यंत भोसल्यांच्या एकछत्री राज्य होते. परंतु दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात (इ.स. १८०३) रघुजीराजांचा पराभव झाला आणि भोसल्यांच्या बराचसा मुलुख इंग्रजांना द्यावा लागला.
*२२ मार्च इ.स.१९३१*
मृत्युच्या आदल्या रात्री भगत सिंह ह्यांनी मित्रांना लिहिलेलं पत्र.
फाशीच्या एक दिवस आधी म्हणजे २२ मार्च १९३१ ला आपल्या जवळच्या मित्रांना भगत सिंह ह्यांनी लिहिलेलं हे पत्र. दुर्दम्य आशावाद आहे ह्या पत्रात. मृत्यूलाही आव्हान होती ही माणसं.
माझ्यापेक्षा जास्त सौभाग्यशाली कोण असेल?
साथीदार मित्रहो, जिवंत राहण्याची महत्त्वाकांक्षा नैसर्गिकरित्या माझ्यातही असायला हवी. मी ती लपवू इच्छित नाही. पण माझं जिवंत राहणं सशर्त आहे, मी अटक होऊन किंवा जखडून जिवंत राहू इच्छित नाही. माझं नाव हिंदुस्तानी इंकलाबी पार्टीचं मध्यवर्ती निशाण बनलं आहे आणि इन्कलाब पसंद पार्टीचे आदर्श आणि बलीदानांनी मला प्रचंड उंचीवर नेलंय, एवढ्या उंचीवर की जिवंत राहून मी ह्याहून उन्नत कदापी होऊ शकणार नाही. आज माझ्या कमजोरी लोकांसमोर नाहीत. जर मी फाशीपासून स्वतःला वाचवलं तर मात्र त्या जगजाहीर होतील आणि इन्कलाबचं निशाण निस्तेज पडेल किंवा कायमचं नष्टही होईल, परंतु माझी टेचात निर्भयपणे हसत हसत फाशीपर्यंत जाण्याची उमंग पाहून हिंदुस्तानी माता स्वतःच्या पोटच्या गोळ्यात भगत सिंह पाहतील आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांची संख्या एवढी टिपेला पोहोंचेल की इन्कलाब थांबवणं साम्राज्यवाद्यांच्या सर्वतोपरी प्रयत्नांच्याही हातात राहणार नाही. होय, एक विचार मात्र आजही (मनाला) चुटपुट लावून जातो. देश आणि मानवतेसाठी ज्या काही तीव्र इच्छा माझ्या मनात होत्या, त्याचा हजारावा हिस्साही मी पूर्ण करू शकलो नाही. जर जिवंत राहू शकलो असतो तर बहुतेक त्यांना पूर्ण करण्याची संधी मला मिळाली असती आणि त्या इच्छा मी पूर्ण करू शकलो असतो. ह्या शिवाय कोणतंही लालूच माझ्या मनात फाशीपासून वाचून राहण्यासाठी कधी आलंच नाही. माझ्यापेक्षा जास्त सौभाग्यशाली कोण असेल? मला अश्यात स्वतःचा प्रचंड अभिमान वाटतोय. आताश्या प्रचंड अधीरतेनं शेवटच्या परीक्षेची मी वाट बघतोय. इच्छा आहे ती अजून जवळ यावी.
- भगत सिंह
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
Comments
Post a Comment