विष्णू आणि शिव ही एकाच परमात्म्याची दोन रूपे असल्यामुळे त्यांच्यात कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ असा भेद करू नये. असं आवाहन खालील अभंग रचनेतून तुकाराम महाराज करतात.
हरिहरा भेद ।
नाही करू नये वाद ।।१।।
एक एकाचे हृदयी ।
गोडी साखरेच्या ठायी ।।२।।
भेदकासी नाड ।
एक वेलांटिच आड ।।३।।
उजवे वाम भाग ।
तुका म्हणे एकचि अंग ।।४।।
अर्थ -
विष्णू आणि शिव ही एकाच परमात्म्याची दोन रूपे असल्यामुळे त्यांच्यात कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ असा भेद करू नये. ।।१।।
ज्याप्रमाणे साखर आणि तिची गोडी परस्परांपासून वेगळी करता येत नाही त्याप्रमाणे शिवाच्या हृदयात विष्णू आणि विष्णूंच्या हृदयात शिव राहतात. ।।२।।
एखाद्याला तरीही दोघांमध्ये भेद करायचाच असेल तर तो केवळ एका वेलांटीचाच करता येतो. (हर हे शिवाचे नाव आहे आणि हरि हे विष्णूंचे. हर आणि हरि यात केवळ एका वेलांटीचाच फरक आहे.) ।।३।।
तुकोबा म्हणतात, ज्याप्रमाणे डावे आणि उजवे हे दोन्हीही भाग एका शरीराचेच असतात त्याप्रमाणे हर आणि हरी व शिव ही एका परमात्म्याचीच दोन रूपे आहेत. ।।४।।
त्यामुळे शिव भक्त व वैष्णव भक्त यांनी परस्पर भेद करून एकमेकाच्या मार्गाला तुच्छ लेखू नये... सत्वगुण विष्णु आणि तमोगुण शिव या दोन्ही गुणांची योग्य वेळी मानवी जीवनात आवश्यकता असतेच..
तुकोबा म्हणतात, उजवे व डावे दोन भाग एकत्र येऊन त्याचा देह बनतो.
।राम कृष्ण हरि।
Comments
Post a Comment