विधीने सेवन । विषय त्यागाते समान ।।मुख्य धर्म देव चित्ती । आदि अवसान अंती ।।म्हणूनच मनुष्याने मनी देवाविषयी सतत भक्तिभाव ठेवावा, त्याविषयी जाण असू द्यावी, त्याला मनोभावे भजावे आणि असे झाले की मग देवच त्याच्यावर कृपा करतो आणि त्याला योग्य तो मार्ग दाखवतो.
विधीने सेवन । विषय त्यागाते समान ।।
मुख्य धर्म देव चित्ती । आदि अवसान अंती ।।
बहु अतिशय खोटा । तर्के होती बहु वाटा ।।
तुका म्हणे भावे । कृपा करीजेते देवे ।।
🌿🌿🌿
तुकाराम महाराज म्हणतात विधीनुसार किंवा शास्त्रानुसार विषयांचे सेवन केले असता विषय देखील मनुष्याला मग त्यागाचीच भावना देतात आणि त्यापासून त्यांना त्यागाचेच फळ मिळते, कारण ते विषयसुख न राहता ते त्यागासमान गणले जाते.
ते म्हणतात माणसाचा मुख्य धर्म हा देवाचे चिंतन करणे हा आहे. म्हणजेच जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, म्हणजेच आदी, अंती आणि अवसानी(म्हणजे भान असताना) देवाचे चित्तात ध्यान करणे, त्याची सदैव आठवण ठेवणे हाच मनुष्याचा मुख्य धर्म असून त्याने त्याविषयी नित्य जागरूक असावे. परंतु तसे न करता तो ह्याविषयी जर मनी शंका-कुशंका घेत राहील, किंवा हरिचिंतन आणि हरिभजनाविषयी त्याची बुद्धी तर्क-वितर्क करीत राहील तर त्यापासून अनेक फाटे फुटून तो मग नको त्या मार्गांकडे भरकटत जाईल.
तुकोबाराय शेवटी म्हणतात म्हणूनच मनुष्याने मनी देवाविषयी सतत भक्तिभाव ठेवावा, त्याविषयी जाण असू द्यावी, त्याला मनोभावे भजावे आणि असे झाले की मग देवच त्याच्यावर कृपा करतो आणि त्याला योग्य तो मार्ग दाखवतो.
संसारात मनुष्याने रोज घरातील पूजा करावी.
रोज मंदिरात आरती, ग्रन्थ वाचन करावे.
कीर्तन, भजन, रोज ऐकावे..
Comments
Post a Comment