त्यांचा डेबू ते गाडगे महाराज हा प्रवास विलक्षण वेदनादायी असला तरी महत्त्वाचा होता. कारण ते आधुनिक महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतील मैलाचा दगड ठरले.

शेंडगाव नावाच्या एका खेड्यात त्याचा जन्म होतो. धडधाकट बाप व्यसनापायी पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो. बायकोपोराला मागे सोडून तो जगाचा निरोप घेतो. ऐन बालपणातच त्याचं छत्र हरपलं. संसाराला कुठे नुकतीच सुरुवात झालेली असताना त्या माउलीच्या कपाळीचं कुंकू पुसलं जातं. मन सैरभैर होतं. पोराकडे बघून ती अवसान गोळा करते आणि माहेराच्या आश्रयाला जाते. तोही आपल्या माउलीचा पदर पकडतो आणि तिच्या मागे चालू लागतो. या प्रवासात त्याचं कोवळं मन वेदनांनी व्यापून जातं. मामाकडे आश्रय मिळतो; पण शाळेऐवजी गोठा आणि अक्षरांऐवजी जनावरं त्याच्या वाट्याला येतात... मात्र त्याच्या मेंदूत वादळ पेलण्याची शक्ती असते. त्याचा जन्म जरी काळोखात झाला असला तरी त्याच्या मेंदूत मात्र उजेडाचे साठे असतात. तो परिस्थितीपुढे वाकत नाही; तर परिस्थितीलाच तो वाकवायला निघतो. 

ज्या रूढी व परंपरांनी त्याच्या दोन पिढ्या गारद केल्या, त्या रूढी व परंपरांविरुद्ध तो ऐन तारुण्यात बंड करून उठतो. पायाला भिंगरी बांधून
वेड्यागत फिरतो. त्याला प्रत्येक कोपरा अंधारलेला दिसतो. या कोपऱ्यांना उजेड देऊ, हा ध्यास त्याच्या मनी असतो. म्हातारी आई, गर्भवती पत्नी व मुलांना जगाच्या हवाली करून तो निघतो समाजप्रबोधनाच्या वाटेन. अस्पृश्यता, अज्ञान, रूढी, परंपरा, खोटी प्रतिष्ठा व अंधश्रद्धा यांचे काटे तुडवीत तो एक नवा रस्ता तयार करायला निघतो. परिस्थितीने त्याच्या पावलात ते सामर्थ्य परलेल असतं. १९०५ ते १९५६ या ५१ वर्षांच्या काळात तो लाखो मैलांचा प्रवास करतो. हा अनंत वेदनांचा प्रवास लोकांच्या वेदनामुक्तीसाठी असतो. या प्रवासात त्याला प्रचंड संकटांचा सामना करावा लागतो. सुरुवातीच्या काळात टिंगल करणारी माणसं पुढे मात्र या वेड्या माणसावर जीव ओवाळून टाकत होती. त्याच्या प्रबोधन दिंडीत सहभागी होत होती, कारण त्याचं हृदय करुणेनं भरलेलं होतं. त्याचं हृदय तथागताचं होतं. त्याच्या मेंदूत मार्क्स सळसळत होता. त्याच्या डोळ्यांना दृष्टी होती तुकोबा अन् कबीराची. सामाजिक निरीक्षणातून त्याला लोकांसमोरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर सापडली होती. भारताचा जणू तो सॉक्रेटीसच होता.

या वेड्या माणसाच्या ठायी प्रामाणिकपणा होता. अवतीभोवती अंधार असताना समाजाला प्रकाशाचे दान द्यावे यासाठीच त्याची धडपड सुरू होती. तो जर गावखेड्यात हिंडला नसता, तर हा महाराष्ट्र पुन्हा शेकडो वर्षं अज्ञान, अंधश्रद्धा, पशुहत्या, रूढी, आणि परंपरेच्या क्रूर सावटात सापडला असता. कपडे धुण्याच्या पिढीजात व्यवसायातील या तरुणाने खराट्याने गावं स्वच्छ केली आणि कीर्तनाने लोकांच्या मनातील घाण काढली. चिंध्या चिंध्यांचे वस्त्र, हातात एक गाडगे, कानात फुटकी कवडी अन् वाणीत प्रचंड ताकद. या माणसाने महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, आचार्य प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे अशी किती तरी मोठी माणसं त्यांच्या प्रेमात पडली होती, नव्हे हा माणूस त्यांना सामाजिक क्रांतीचा आधार वाटत होता. महाराष्ट्राचा विविध भाग या माणसाला वेगवेगळ्या नावांनी ओळखत होता. विदर्भात त्याला डेबूजी किंवा वठ्ठी साधू म्हणत, तर कोकणात गोधडे महाराज, साताऱ्याकडे लोटके महाराज, गोकर्णमध्ये चिंधे बुवा; खान्देश, मुंबई, बडोदा या भागात गाडगे महाराज म्हणून लोक त्यांना ओळखायचे. अक्षरज्ञानाचा अभाव असलेल्या घरात जन्मलेल्या या डेबूजी उर्फ गाडगे महाराजांनी गावोगावी अक्षरयज्ञ पेटविले. त्यांचा डेबू ते गाडगे महाराज हा प्रवास विलक्षण वेदनादायी असला तरी महत्त्वाचा होता. कारण ते आधुनिक महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतील मैलाचा दगड ठरले.

काफ़िला या ग्रुपवर उपलब्ध झालेली माहिती 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४